– दत्ता जाधव
भारतात आणि विशेष करून महाराष्ट्रात कांदा कवडीमोल झाला असला तरीही फिलिपिन्स, मोरोक्को, ताजिकिस्तान, कझाकस्तान, तुर्कस्तानमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या कांदा टंचाईकडे जागतिक अन्न संकटाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. हे अन्न संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, त्या विषयी..
फिलिपिन्सला कांदा रडवतोय?
फिलिपिन्समध्ये सप्टेंबर २०२२पासून कांद्याची दरवाढ सुरू आहे. किंमत जागतिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. फिलिपिन्समध्ये गेल्या चार महिन्यांत कांद्याच्या किमती चौपटीने वाढल्या आहेत. ही दरवाढ इतकी उच्चांकी आहे की, मांसापेक्षा कांद्याची किंमत जास्त आहे. लाल कांद्याची किंमत एप्रिल २०२२ मध्ये सुमारे ७० पेसो ( १०५.१८ रुपये) प्रति किलोवरून डिसेंबर २०२२ मध्ये ७०० पेसो ( ३५१२ रुपये) पर्यंत वाढल्या आहेत, असे रॉयटर्स वृत्त संस्थेने म्हटले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार कांद्याची किंमत प्रति किलो ५५० पेसो (२,४७६ रुपये) आहे. कांद्याच्या या किमती बाजारात मिळणाऱ्या चिकनपेक्षा तिप्पट आणि गोमांसापेक्षा २५ टक्क्यांनी जास्त आहेत. फिलिपिन्समध्ये डिसेंबर २०२२ मध्ये देशाचा महागाई दर ८.१ टक्क्यांवर होता, जो मागील १४ वर्षांतील सर्वाधिक आहे. कांद्याची इतकी टंचाई आहे की, कांद्याची चीन आणि इतर देशांतून तस्करी सुरू आहे. फिलिपिन्सला दर महिन्याला सतरा हजार टन कांदा लागतो. त्यामुळे चीनसह आग्नेय आशियायाई देशातून कांद्याची आयात होत असते. सामान्य लोकांच्या पाकगृहासह हॉटेल व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
कांदा आणीबाणी आणखी कुठे?
तुर्कस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान आणि मोरोक्कोमध्येही कांद्याची भाववाढ झाली आहे. मध्य आशियातील या देशांमध्ये कांद्याचे उत्पादन होत असले तरीही संभाव्य भाववाढ टाळण्यासाठी त्या-त्या देशांनी कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे कांद्याच्या नियमित आयातदार देशांना कांदा टंचाईचा सामना करावा लागत आहे. ब्रिटनमध्ये कांद्यासह अन्य पालेभाज्यांची टंचाई जाणवत आहे.
जागतिक तापमान वाढीचा फटका?
मागील वर्षी आफ्रिका, अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक देशांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला होता. परिणामी एकूण सर्वच शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. नेदरलँड्स हा कांद्याचा निर्यातदार आहे, त्यालाही फटका बसला होता. फिलिपिन्सला मागील वर्षी ऑगस्टमध्ये वादळाचा फटका बसला होता. मोरोक्कोमध्ये पूर आला होता. पाकिस्तानच्या सिंध, पंजाब प्रांतातील काद्यांचे पीक महापुरात उद्ध्वस्त झाले होते. जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या चीनमध्येही मागील वर्षी दुष्काळजन्य स्थिती होती. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षी कांदा उत्पादन घटले होते. दर्जाही खालावला होता. महापूर, वादळ, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा परिणाम म्हणून कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांत जानेवारीच्या अखेरीपासून दरवाढ सुरू आहे. वातावरणातील बदलांमध्ये उझबेकिस्तान, ताजिकीस्तान, कझाकस्तान आणि किर्गिझस्तानमधील कांदा पीक नष्ट झाले होते. परिणामी आता कझाकस्तानने किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकीस्तानसह देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. टंचाईच्या भीतीने तुर्कस्ताननेही निर्यात थांबवली आहे. शिवाय विनाशकारी भूकंपाचा सामना करत असलेल्या तुर्कस्तानमध्ये कांद्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
जगाची अन्नसुरक्षा धोक्यात?
मोरोक्कोमध्ये पूर आणि वादळामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे आफ्रिकी देशांना होणारी नियमित कृषी मालाची निर्यात बंद आहे. विशेषकरून कांदा, टोमॅटो आणि बटाटे निर्यात बंदी होती. युरोपने आपल्या अन्न सुरक्षेला प्राधान्य देत निर्यातीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे जगभरात गहू आणि तांदळाचे दर नियंत्रणात असले तरीही पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ब्रिटनमध्ये टोमॅटो, काकडी आणि इतर घटकांची दरवाढ झाली आहे. सुपरमार्केटमध्ये भाज्यांची कमतरता दिसत आहे. भाज्यांचा तुटवडा आणि वाढत्या महागाईमुळे सकस जेवण परवडत नाही. सामान्य लोकांनी कांदे, टोमॅटो, बटाटे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे डाळी, कडधान्यांचा आहारातील वापर वाढवला आहे. त्याला ब्लूमबर्गच्या अहवालाने दुजोरा दिला आहे. ब्लूमबर्गने संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या आकडेवारीचा हवाला देत जगातील तीन अब्ज लोक पौष्टिक जेवण घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. महागाईमुळे जगात पौष्टिक अन्नापेक्षा पिष्टमय धान्य, साखर आणि वनस्पती तेलांचा आहारात वापर वाढला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम काय?
मागील वर्षीही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक अन्नधान्यांच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला होता. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगात भाजीपाल्यांच्या दरात झालेली वाढ हा पाकिस्तानमधील विनाशकारी पूर, मध्य आशियातील अतिवृष्टी आणि रशिया- युक्रेनमधील युद्धाचा परिणाम आहे. युद्धामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. महागड्या खतांचा वापर करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्याचा परिणाम उत्पादनांवर झाला आहे. रशियासोबतच्या संघर्षामुळे युक्रेनमधील कांदा उत्पादनाला फटका बसला. युक्रेन पोलंड, रोमानिया, मोल्दोव्हा, कझाकिस्तान आणि तुर्कस्तानला कांदा निर्यात करीत होता. आता कांदा आयात करावा लागत आहे.
भारतातील कांद्याचे काय?
भारत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक शेत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२२च्या तुलनेत यंदा उत्पादनात १६.८१ टक्क्यांनी वाढ होऊन देशात ३१.१२ दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होईल. मागील वर्षी २६.६४ दशलक्ष टन कांदा उत्पादन झाले होते. चालू आर्थिक वर्षांत देशातून कांद्याची विक्रमी निर्यात होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात १३.५४ लाख टन काद्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ही निर्यात ३८ टक्क्यांनी जास्त आहे. भारतीय कांद्याचे दर कमी असल्यामुळे निर्यात वेगाने झाली आहे. बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि नेपाळला कांदा निर्यात झाली आहे.
हेही वाचा : विश्लेषण : कांद्याचे भाव का झाले कवडीमोल?
राज्यात आता उशिराच्या खरीप हंगामातील काद्यांची काढणी सुरू आहे. हा लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही. जास्तीत-जास्त महिनाभर टिकतो. तो शेजारच्या देशांना म्हणजे बांगलादेश आणि श्रीलंकेला निर्यात होतो. ही निर्यात अत्यल्प असते. उन्हाळ कांद्याची निर्यात जास्त होते. तो कांदा एप्रिलअखेर काढणीला येईल. सध्या बाजारात येत असलेला कांदा देशांतर्गत बाजारात विकला जातो. यंदा बहुतेक राज्यांत थोड्याफार प्रमाणात कांदा उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच गरज भागली आहे. परिणामी मागणी नाही आणि मागणीअभावी दर पडले आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा व्यपारी संघाचे अध्यक्ष खंडू काका देवरे यांनी दिली.
dattatray.jadhav@expressindia.com