– नीलेश पानमंद
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असे आवाहन केले आहे. तसेच खाद्यपदार्थ टाकताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासंदर्भात पालिकेने शहरभर लावलेल्या फलकांमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणे बंदी योग्य आहे का, कायदा काय सांगतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
ठाण्यात कबतुरखाने कुठे आहेत?
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हरिनिवास सर्कल आणि जांभळी नाक्याजवळील धान्य बाजारपेठ या ठिकाणी कबुतरखाने आहेत. याठिकाणी कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जात असल्यामुळे कबुतरे मोठ्या संख्येने येथे दिसून येतात. अशाच प्रकारे वागळे इस्टेट परिसरात काही ठिकाणी कबुतरखाने आहेत. उपवन येथील पायलादेवी मंदिर परिसर, बाळकुम, कळवा, खेवरा सर्कल अशा भागांमध्ये कबुतरखाने दिसून येतात. याच कबुतरखाना परिसरात पालिकेने फलक लावले असून त्याद्वारे कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास मनाई केली आहे.
ठाणे महापालिकेने फलकाद्वारे काय इशारा दिला?
ठाणे महापालिका क्षेत्रातील काही चौक तसेच मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जाते. इमारतींच्या खिडक्यांमध्येही कबुतरे आसरा घेत असून त्याठिकाणी कबुतरांना अनेक रहिवाशी खाद्यपदार्थ टाकतात. परंतु याच कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असे आवाहन पालिकेने फलकांद्वारे केले आहे. तसेच खाद्यपदार्थ टाकताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यापूर्वी करोना काळातही पालिका प्रशासनाने अशा प्रकारचे फलक लावले होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत पालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसून आली नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता पुन्हा अशाच प्रकारची फलकबाजी सुरू केली असून त्याची चर्चा शहरात होताना दिसून येत आहे.
कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास बंदी का?
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार बळवण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुप्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’ हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास मनाई केली आहे. तसे पालिकेने फलकांद्वारे स्पष्टही केले आहे.
डॉक्टर काय म्हणतात?
कबुतरांनी केलेली विष्ठा सुकल्यानंतर त्यातून धुळीकणासारखे कण हवेत पसरतात. त्याचबरोबर कबुतरांच्या पिसांमधूनही असेच कण बाहेर पडतात. हे कण नागरिकांच्या फुप्फुसामध्ये जातात आणि त्यामुळे श्वसननलिकेला सूज येऊन तिचा आकार आतून कमी होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. धुलीकण हे वजनाने हलके असल्यामुळे फुप्फुसाच्या आत शेवटपर्यंत जात नाहीत. परंतु विष्ठा आणि पिसांमधून निघणारे कण हे वजनाने जड असल्याने ते फुप्फुसाच्या आत शेवटपर्यंत जातात. त्यातूनच ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार बळवतो. ३ ते ५ वर्षांत फुप्फुसांमध्ये फायब्रोसिस होण्याचे दिसून येते. या आजारावर ठोस औषधेही उपलब्ध नाहीत. काही औषधांनी मात्र फुप्फुस निकामी होण्याचा वेग कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे कबुतर पिसे आणि विष्ठेतून हवेत पसरणारे कण ही आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या आहे, असे ठाणे महापालिकेचे फुप्फुस रोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.
कायदा काय सांगतो?
ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे या उद्देशातून पालिका प्रशासनाने आरोग्य उपविधि किंवा कायदा तयार केला आहे. त्याअंतर्गत रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शौच करणे, लघुशंका करणे, रस्त्यावर व्यावसायिकपणे वाहने धुणे, असे करण्यास मनाई आहे. असे करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. या उपविधि क्रमांक ४१ मध्ये सार्वजनिक ठिकाणी प्राणी, पक्षी यांना अन्न खाऊ घालणे, असे उपद्रव केल्यास ५०० रुपये दंडाची तरतुद आहे. याच नियमांतर्गत पालिकेकडून कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येते. पालिका प्रभाग समितीच्या पथकांकडून ही कारवाई करण्यात येते.