ब्रिटनमध्ये (युनायटेड किंग्डम) सध्या राजकीय उलथापालथ होत आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी सरकारी नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्यावर राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या खासगी मेलवरून सरकारी कागदपत्रे पाठवली. त्यांनी आपल्या राजीनाम्यात पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि टीका केली. आता ब्रिटनचे नवे गृहमंत्री ग्रँट शॅप्स हे असणार आहे. विशेष म्हणजे ग्रँट हे तेच नेते आहेत ज्यांनी लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला नव्हता. तसेच यानंतर त्यांची वाहतूकमंत्री म्हणून हकालपट्टी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रॅव्हरमॅन यांनी नुकतीच भारत-यूके व्यापार करारावर जोरदार टीका केली होती. यात त्यांनी भारतीय स्थलांतरित त्यांच्या व्हिसाच्या मुदतीपेक्षा जास्त काळ यूकेत राहतात अशी तक्रार केली होती.

सुएला ब्रेव्हरमन कोण आहेत?

ब्रिटनमधील राजकीय उलथापालथीनंतर आधीचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून नव्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाली. या निवडणुकीत सुएला ब्रेव्हरमनही स्पर्धेत होत्या. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यांचा पराभव झाला. यानंतर सप्टेंबरमध्ये लिझ ट्रस यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर सुएला यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी चॅन्सलर क्वासी क्वारटेंग यांनाही स्थान मिळालं, मात्र १४ ऑक्टोबरला त्यांनाही पदावरून हटवण्यात आलं.

ब्रेव्हरमन यांच्या पालकांचा भारताशीही विशेष संबंध आहे. त्यांच्या आई भारतीय वंशाच्या आहेत, मात्र १९६० मध्ये त्या ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्याआधी त्यांची आई मॉरिशिअसमध्ये राहत होती. त्यांचे वडील केनियाचे आहेत.

ब्रेव्हरमन यांनी ब्रिटीश वसाहतवादाचंही समर्थन केलं आहे. तसेच ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरिकांबाबत कठोर भूमिका घेतलीय. त्यांनी या स्थलांतरिकांना रवांडाला पाठवण्यालाही पाठिंबा दिला.

ब्रेव्हरमन यांनी आपल्या राजीनाम्यात ट्रस सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “आपण केवळ आपल्या मतदारांना दिलेल्या प्रमुख आश्वासनांचा भंग केला नाही, तर हे सरकार आपल्या जाहीरनाम्याप्रमाणे किती काम करेल याबद्दलही मला साशंकता आहे. यात स्थलांतरितांची संख्या कमी करणे आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे हे मुद्दे आहेत. छोटछोट्या बोटिंमधून ब्रिटनमध्ये धोकादायक स्थलांतरण हा कळीचा मुद्दा आहे.”

लिसेस्टरमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात झालेल्या हिंसाचारालाही त्यांनी अनियंत्रित स्थलांतरणाला आणि त्यांची ब्रिटनशी नसलेली एकात्मता याला जबाबदार धरलं.

ब्रेव्हरमन यांनी भारताबद्दल काय वादग्रस्त वक्तव्य केलं?

ऑक्टोबरमध्ये स्पेक्टॅटर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रेव्हरमन म्हणाल्या होत्या, “भारताबरोबर व्यापारी करार केल्याने ब्रिटनमध्ये होणारं स्थलांतरण वाढेल. आधीच ब्रिटनमध्ये भारतातून आलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. भारताबरोबर मुक्त स्थलांतरण धोरण ठरवण्याविषयी मला काळजी वाटते. कारण ब्रेक्झिट होताना लोकांनी त्यासाठी मतदान केलेलं नाही. विद्यार्थी आणि उद्योजकांना सवलत देण्याविषयी माझं वेगळं मत आहे.”

“ब्रिटनमधील स्थलांतरितांची संख्याही लक्षात घेतली पाहिजे. ब्रिटनमध्ये मुदतीपेक्षा अधिक राहणाऱ्यांमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे. अधिक चांगल्या सहकार्यासाटी मागील वर्षी याबाबत भारत सरकारबरोबर एक करारही करण्यात आला. मात्र, त्याचा आवश्यक परिणाम होताना दिसत नाही,” असं मत ब्रेव्हरमन यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : विश्लेषण: लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी कारकीर्द अल्पजीवी का ठरली? ट्रस यांच्यानंतर पंतप्रधानपदाची धुरा कुणाकडे?

ब्रेव्हरमन यांनी भारतातून ब्रिटनमध्ये स्थालंतरण करणाऱ्यांवर टीका केल्यानंतर बराच वाद झाला. त्यानंतर त्यांनी सारवासारवही केली. तसेच भारतातून होणाऱ्या स्थलांतरणामुळे ब्रिटन समृद्ध झाल्याचं म्हटलं. दुसरीकडे भारताने ब्रिटनमध्ये मुदतीपेक्षा अधिक काळ राहणाऱ्या स्थलांतरितांच्या प्रत्येक तक्रारीवर काम केल्याचं म्हटलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know controversial statement of uk interior minister suella braverman who resign after sparked row pbs
Show comments