द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगाशी करून सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबतचे विधान केले. ज्यावरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. ‘हिंदू धर्माचे निर्मूलन करणे’ हा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या द्रमुक पक्षाचा छुपा मनसुबा असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शनिवारी (दि. २ सप्टेंबर) तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या बैठकीत बोलत असताना मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी म्हणाले, “सनातनचा अर्थ काय? तर ते शाश्वत आहे, म्हणजेच ते बदलता येणार नाही. कोणीही त्याविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सनातनने जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. ज्याप्रमाणे डेंग्यू, मलेरिया आणि करोना या रोगाचा संसर्ग पसरतो, त्याप्रमाणे सनातन धर्मामुळे अनेक आजार समाजाला झाले आहेत.”
सनातन धर्मावरील विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर उदयनिधी यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन धर्मावर खोलवर अभ्यास करून जे लेख लिहिले ते मी जाहीर करण्यास तयार आहे. सनातन धर्माचे नकारात्मक परिणाम झाले असल्याचे या दोन्ही महापुरुषांनी सांगितले आहे.”
हे वाचा >> उदयनिधींचे ‘सनातन धर्मा’वरील विधान काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार? जाणून घ्या …
‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (DMK) पक्षाचा इतिहास काय?
तमिळनाडूतील ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान आंदोलनातून वर्तमान सत्ताधारी पक्ष ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (DMK) ची पाळेमुळे रोवली गेली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जात आणि धर्म यांच्या विरोधात विवेकवादी चळवळीची सुरुवात पेरियार यांनी केली. पेरियार रामास्वामी यांच्या विचारांचा वर्षानुवर्ष तमिळनाडूच्या राजकारणावर आणि राजकीय पक्षांवर प्रभाव टाकलेला आहे. ज्यामध्ये ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (DMK) आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) या पक्षांचा समावेश आहे, जे याच चळवळीतून वर आले.
तमिळनाडूमधील पेरियार यांची ‘स्वाभिमान चळवळ’ काय होती?
पेरियार रामास्वामी यांनी १९२५ साली जातीव्यवस्था आणि धर्मातील चुकीच्या रुढी-परंपराविरोधात ‘स्वाभिमानी’ आंदोलन सुरू केले. जात, लिंगावर आधारीत विषमतेविरोधात त्यांनी सामाजिक सुधारणांना वाव दिला. हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडत असताना तमिळ राष्ट्राच्या वेगळ्या सांस्कृतिक अस्मितेवर त्यांनी जोर दिला.
१९३८ साली जस्टिस पार्टी (ज्याचे पेरियार सदस्य होते) आणि स्वाभिमान चळवळ (आंदोलनकर्ते) एकत्र झाली. १९४४ साली या संघटनेला द्रविडार कळघम असे नाव देण्यात आले. द्रविडार कळघम पक्षातील लोक ब्राह्मण, काँग्रेस आणि आर्य विरोधक होते. संघटनेची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र द्राविडराष्ट्राची (द्राविडनाडू) संकल्पना मांडण्यात आली. तथापि, या मागणीला लोकप्रियता न मिळाल्यामुळे हळूहळू द्राविडनाडूचा मुद्दा मागे पडला.
भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पेरियार यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. १९४९ साली, पेरियार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सीएन अन्नादुराई यांचे वैचारिक मतभेद उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी पेरियार यांची साथ सोडली. अन्नादुराई यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक (DMK) पक्षाने निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची घोषणा केली. सामाजिक लोकशाही आणि तमिळ संस्कृतीचा राष्ट्रवाद हे पक्षाचे राजकीय अधिष्ठान होते.
करुणानिधी आणि एमजीआर यांचा उदय
१९६९ साली द्रमुकचे सर्वेसर्वा अन्नादुराई यांचे निधन झाले आणि त्यानंतर द्रमुक पक्षाचा ताबा एम. करुणानिधी यांच्याकडे आला. मात्र १९७२ साली करुणानिधी आणि त्यावेळचे लोकप्रिय अभिनेते-राजकारणी एमजी रामचंद्रन ऊर्फ ‘एमजीआर’ यांच्यात वाद निर्माण झाले. ज्यामुळे रामचंद्रन यांनी द्रमुकमधून बाहेर पडत स्वतःचा अण्णाद्रमुक (AIADMK) हा पक्ष स्थापन केला. रामचंद्रन यांच्यासह पक्षातील काही नेते बाहेर पडले, तसेच त्यांच्या चाहत्यांनी या पक्षाला भरभरून पाठिंबा दिला.
१९७७ साली एमजीआर यांनी तमिळनाडूची सत्ता मिळवली आणि १९८७ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सत्तेवर राहिले. सत्ताप्राप्तीनंतर एमजीआर यांनी पक्षाच्या विचारधारेत बदल करून ब्राह्मणविरोध आणि विवेकवाद यांचा अतिरेक कमी केला आणि आपले लक्ष कल्याणकारी योजनांवर वळविले.
हिंदू धर्म आणि जातीव्यवस्थेबाबत पेरियार यांचे मत
इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात लिहिले की, तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यात काहीसे साधर्म्य होते. ब्रिटिशांच्या राजवटीत या राज्यातील ब्राह्मणांनी सुरुवातीलाच इंग्रजीच्या शिक्षणाचा लाभ घेतला. शिक्षक, वकील, डॉक्टर, कारकून आणि नागरी सेवेतील विभागांमध्ये ब्राह्मण समाजातील लोक ब्रिटिशांच्या नोकरीत रुजू झाले. तसेच काँग्रेस पक्षाचा उदय झाल्यानंतर या पक्षातही सुरुवातीला त्यांचे बऱ्यापैकी प्रतिनिधित्व होते आणि त्यांनी पांरपरिकपणे समाजात उच्च सामाजिक दर्जा प्राप्त केला होता.
हे वाचा >> सनातन धर्म म्हणजे काय? उत्पत्ती आणि ऐतिहासिक संदर्भ काय आहे?
गुहा यांनी पुढे लिहिले की, अपघाताने असो किंवा रचनाबद्ध पद्धतीने, पण ब्राह्मणांना ब्रिटिशांच्या धोरणामुळे आर्थिक आणि राजकीय अर्थाने प्रबळ बनविले. पुढे जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे सर्व क्षेत्रातील ब्राह्मण वर्चस्वाला धोका निर्माण झाला. महाराष्ट्राचे हे प्रारुप दक्षिण भारतात ई. व्ही. रामास्वामी यांनी पुढे नेले. फुले आणि आंबेडकर यांच्याइतकाच त्यांच्या विचारांचा पगडा तेथील लोकांवर होता. पेरियार यांनी आपल्या लिखाणातून आणि भाषणांद्वारे समाजातील काही घटकांना उपेक्षित ठेवणाऱ्या हिंदू धार्मिक रुढी-प्रथांवर कठोरपणे टीका केली.
डॉ. कार्तिक राम मनोहरन यांनी “फ्रिडम फ्रॉम गॉड: पेरियार अँड रिलिजन” या लेखात लिहिल्याप्रमाणे, सुरुवातीच्या काळात पेरियार यांनी नास्तिकता आणि समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या काही प्रमुख पुस्तकांचे भाषांतर करून ते प्रकाशिते केले. यामध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांचे “द कम्युनिस्ट मेनिफेस्टो”, भगतसिंग यांचे “मी नास्तिक का आहे”, बर्ट्रांड रसेल यांचे “मी, ख्रिश्चन का नाही” या पुस्तकांचा समावेश होता.
गुहा यांनी आपल्या पुस्तकामध्ये पेरियार यांचे लेखन आणि भाषणे उद्धृत केले आहेत. १९२७ सालच्या एका भाषणात पेरियार म्हणाले, “आम्ही धर्मावर जेवढे पैसे खर्च करतो, तेवढा इतर कोणताही धर्म करत नाही. ख्रिश्चनांनी भारतात पाऊल ठेवताच अतिशय कमी कालावधीत लोकांना एकत्र केले, त्यांना शिक्षण दिले आणि स्वतःला या लोकांचा मालक बनविले. पण आपला धर्म जो खुद्द देवाने लाखो वर्षांपूर्वी तयार केला असल्याचे सांगितले जाते, तरीही या धर्मातील बहुसंख्य लोकांना धर्मशास्त्र वाचू दिले जात नाही. जर कुणी याचे उल्लंघन केले तर वाचणाऱ्याची जीभ हासडली जाते, त्यांच्या कानात उकळते शिसे ओतले जाते. अशा भयंकर शिक्षा देऊन शिक्षणापासून वंचित ठेवले गेले.”
पेरियार यांनी समाजातील काही विशिष्ट जातीसमूहांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याचा संबंध धर्माच्या अस्तित्त्वाशी जोडला. डॉ. मनोहरन यांच्या मते, “पेरियार यांनी ७ जून १९३१ रोजी पक्षाचे मुखपत्र ‘कुडियारसू’मध्ये लिहिले की, ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य जाती, गरीब आणि कामगार वर्ग यांना जर समता आणि समाजवाद हवा असेल तर त्यांनी सर्वात आधी हिंदू धर्म नष्ट करणे आवश्यक आहे.” तसेच पेरियार यांनी रामायणासारख्या हिंदू काव्य ग्रंथावरही टीकात्मक लेख लिहिले होते.
१९६९ साली पेरियार यांनी आपल्या आयुष्याच्या ध्येयाचे वर्णन करताना म्हटले, “मी मानवी समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. हे करताना मी देश, देव, धर्म, भाषा आणि कोणत्याही सत्तेची तमा बाळगळी नाही. मानवी समाजाचे कल्याण व्हावे, त्यांचा विकास व्हावा एवढाच उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला.”
पेरियार यांच्यानंतरच्या द्रमुक नेत्यांची भूमिका काय होती?
सीएन अन्नादुराई यांनी मात्र धर्माच्या बाबतीत पेरियार यांच्यापेक्षा थोडी वेगळी पण संयत भूमिका मांडली. ते म्हणाले होते, मी गणेशाची मूर्ती तोडणार नाही (तमिळनाडूतील मूर्तीभंजन आंदोलनाचा संदर्भ) किंवा नारळही फोडणार नाही (धार्मिक नैवेद्याचा संदर्भ) अन्नादुराई यांचे राजकीय वारसदार आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी हे नास्तिक होते. कवि आणि चित्रपट पटकथा लेखक असणाऱ्या करुणानिधी यांनी आपल्या लोकप्रिय नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून ब्राह्मण आणि धर्मावर कडाडून टीका केली. करुणानिधी यांच्या नाटक आणि चित्रपटांना एक मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला होता. त्यांनी आपले सर्व लिखाण मातृभाषेतच केले.
कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?
उदयनिधी स्टॅलिन हे करुणानिधी यांचे नातू आहेत. करुणानिधी यांचा वारसा त्यांचा मुलगा एमके स्टॅलिन आणि मुलगी कनिमोळी पुढे नेत आहेत. उदयनिधी यांनी शनिवारी (२ सप्टेंबर) बोलत असताना पेरियार यांनी यापूर्वी जी मांडणी केली होती, तिच पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “सनातन्यांनी महिलांशी चुकीचा व्यवहार केला. पती गमावलेल्या स्त्रीयांना पतीच्या चितेवर आगीत ढकलून सती जाण्यास भाग पाडले. इतर विधवा महिलांना केशवपन करण्याची बळजबरी केली आणि त्यांना पांढऱ्या साड्या नेसण्यास लावून अडगळीत टाकले. याउलट द्रविडमने (द्रविड विचारधारा आणि द्रमुक पक्षाची राजवट) काय केले? तर महिलांना सार्वजनिक बसेसमध्ये मोफत प्रवासाची संधी दिली. विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी १,००० रुपयांची मासिक मदत दिली.”
आपले वडील मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यानंतर द्रमुकमध्ये पाय जमविण्यासाठी उदयनिधी यांना सनातन धर्माच्या वादाचा लाभ मिळू शकतो, असे तमिळनाडूमधील राजकीय जाणकार सांगतात. अभिनेते आणि चित्रपट निर्माते असलेले उदयनिधी २०२१ साली पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले होते. सुरक्षित मतदारसंघातून विजय प्राप्त केल्यानंतर त्यांचा २०२२ साली राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. द्रविड विचारांच्या पायावर उभ्या असलेल्या द्रमुक पक्षात असे अचानक बढती दिल्यामुळे थोडा विरोध होत होता, पण उदयनिधी यांनी थेट पेरियार यांचा वारसा सांगितल्यानंतर पक्षांतर्गत विरोध मावळण्याची शक्यता आहे. पण देशभरात मात्र त्यांनी अनेक टीकाकार यानिमित्ताने तयार केले.