– भक्ती बिसुरे
करोना नामक एका अक्राळ-विक्राळ आणि जीवघेण्या संकटातून आपण तरलो, असे वाटू लागले होते. मात्र आता करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकारामुळे जगातील चीन, जपान, ब्राझील, अमेरिका आणि फ्रान्स अशा देशांमध्ये मोठी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. त्यामुळेच जगातील सगळ्या देशांवर चिंतेचे सावट आहे. करोना महासाथ सुरू झाल्यापासूनच भारतातील करोना साथीची तीव्रता ही नेहमी अधिक राहिली आहे. त्यामुळे आता बाहेरील देशांमध्ये दिसत असलेली रुग्णवाढ भारताला किती प्रमाणात डोईजड होईल, याबाबतची चिंता सर्वच स्तरांतून व्यक्त होते आहे. भारतात करोनाच्या नवनवीन प्रकारांमुळे येऊ लागलेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) सुरू करण्यात आले. ते अद्यापही सुरूच असल्याने आपण रुग्णसंख्या आणि त्यातील चढ-उतारांकडे बारकाईने पाहात असल्याचे तज्ज्ञ आणि अधिकारी स्पष्ट करत आहेत. ही नवी लाट भारतासाठी किती धोकादायक, याविषयीचे हे विश्लेषण.
चीन आणि विदेशातील सद्य:स्थिती काय?
ज्या चीनमधून पसरलेल्या करोना विषाणूने जगभर थैमान घातले त्या चीनमधील करोनाची सद्य:स्थिती हे सातत्याने एक गूढ राहिले आहे. सध्या चीनमधील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या ही २४ तासांमध्ये सुमारे ३० हजारांवर जात आहे. ताज्या माहितीनुसार चीनमधील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत गुरुवारी ३१,४४४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येचा उच्चांक ताज्या आकड्यांनी मोडल्याचे चीनमधील ‘मॉर्निंग पोस्ट’ या वर्तमानपत्राने नमूद केले आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी येथेही दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जर्मनीतही सुमारे ३० हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली आहे, मात्र चीनकडून राबवण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही रुग्णसंख्या धक्कादायक मानली जात आहे.
संक्रमित होणारा विषाणू प्रकार कोणता?
गेल्या सुमारे वर्षभरात जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लाटा निर्माण करणारा विषाणू हा प्रामुख्याने ओमायक्रॉनचाच उपप्रकार असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा या करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारानंतर सर्वाधिक वेगवान संक्रमण करणारा प्रकार म्हणून ओमायक्रॉन हा प्रकार पुढे आला. डेल्टाक्रॉनसारखे इतरही काही प्रकार आले, मात्र ते तुलनेने क्षीण आणि तात्पुरते ठरले. ओमायक्रॉन आणि त्याचे उपप्रकार मात्र तग धरून ठेवण्यात यशस्वी झाले. चीनमध्ये सध्या दिसणाऱ्या रुग्णवाढीस कारणीभूत ठरणारा प्रकारही ओमायक्रॉनचा उपप्रकार असून ‘बीएफ.७’ असे त्याचे जनुकीय नामकरण करण्यात आले आहे.
बीएफ.७ ची पार्श्वभूमी काय?
बीएफ.७ हा आत्ता अचानक उद्भवलेला ओमायक्रॉनचा उपप्रकार नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये बीएफ.७ सर्वात प्रथम जगाच्या नकाशावर आला. अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्ये या उपप्रकाराचे रुग्ण दिसून आले होते. त्याचदरम्यान चीनमध्ये बीएफ.७ आणि बीए.५.१.७ अशा दोन उपप्रकारांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. ओमायक्रॉनचाच उपप्रकार असल्याने ११, १२ ऑक्टोबरला सुमारे १८०० नव्या रुग्णांची नोंद चीनमध्ये करण्यात आली होती, तसेच रुग्णसंख्या वाढीस नजीकच्या भविष्यात हा प्रकार कारणीभूत ठरेल, असे अनुमानही जागतिक स्तरावर वर्तवण्यात आले होते.
बीएफ.७ किती त्रासदायक?
करोना विषाणूचे डेल्टा हे उत्परिवर्तन सर्वाधिक त्रासदायक होते. त्यानंतर आलेला ओमायक्रॉन हा संक्रमण करण्याबाबत सर्वात वेगवान, मात्र लक्षणे आणि उपाय या निकषांवर सर्वात सौम्य असल्याचे दिसून आले. ओमायक्रॉनचा बीए.२.७५ हा एक उपप्रकार सोडल्यास बहुतांश उपप्रकार हे वेगवान प्रसारक तरीही सौम्य म्हणून नोंदवण्यात आले आहेत. अमेरिकेतील सुमारे पाच टक्के आणि ब्रिटनमधील सुमारे ७.२६ टक्के रुग्ण हे बीएफ.७ चे असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार आढळून आल्यानंतर त्याचे बारकाईने निरीक्षण संशोधन स्तरावर करण्यात आले, मात्र त्यामुळे त्या वेळी कोणतीही नाट्यमय रुग्णवाढ दिसून आलेली नाही. साहजिकच गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज असलेले रुग्णही त्यादरम्यान कमी होते, ही बाब दिलासादायक ठरली.
हेही वाचा : विश्लेषण: ताप आल्यावर लगेच गोळी का खाऊ नये? रक्तचाचणी कधी करावी?
बीएफ.७ भारतात किती सक्रिय?
ओमायक्रॉन या करोना प्रकाराने आणि त्याच्या उपप्रकारांनी २०२२ च्या सुरुवातीलाच भारतात करोनाची नवी लाट निर्माण केली. एक-दोन महिन्यांपासून ती लाट ओसरली असे म्हणता येईल. बीएफ.७ या सध्या चीनमधील रुग्णवाढीस कारणीभूत ठरत असलेल्या उपप्रकाराचे तीन रुग्ण भारतात आढळले. दोन रुग्ण गुजरात तर एक रुग्ण ओदिशामध्ये नोंदवण्यात आला आहे. चीनमधील रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापरण्याचा आग्रह धरण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वर्धक मात्रा लसीकरण पूर्ण करण्याकडेही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. देशातील रुग्णवाढीला चालना मिळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांच्या तपासण्या, गरजेप्रमाणे विलगीकरण आणि लसीकरणाचा आग्रह धरण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ओमायक्रॉनमध्ये सातत्याने उत्परिवर्तन होऊन त्याचे निर्माण होणारे उपप्रकार हे चिंतेचे कारण असून त्याचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी दैनंदिन रुग्णसंख्येच्या नमुन्यांचे वेगवान जनुकीय क्रमनिर्धारण सुरू ठेवण्याची गरज तज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात आली आहे.