आज देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमेमुळे भारत देश तिरंगामय झाला आहे. एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालेली असताना आपल्या देशात याच दिवशी १९७२ साली पिन कोड अर्थात पोस्टल आयडेन्टिफिकेशन नंबर ( IPN) ची सुरुवात करण्यात आली होती. पिन कोड सुरू करण्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया देशात पीन कोडची सुरुवात कशी झाली? पीन कोडच्या माध्यमातून पत्रव्यहार कसा केला जायचा?
पिन कोडची गरज का निर्माण झाली ?
पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार भारत स्वातंत्र होण्याच्या काळात शहरी भागात साधारण २३ हजार ३४४ पोस्ट ऑफिसेस होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात विकासाला चालना मिळाली. या विकासासोबतच पोस्ट खात्याच्या विस्ताराची गरज भासू लागली. तसेच पत्रे निर्धारित वेळेत पोहोचण्यासाठी एका विशिष्ठ प्रणालाची गरज भासू लागली. याच कारणामुळे पीन कोडची निर्मिती करण्यात आली. पिन कोडच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात वस्तू, सामन किंवा पत्रे पाठवली जाऊ लागली. पिन कोडमुळे पत्रांची, सामानांची वर्गवारी करणे सोपे होते. आपल्या देशात अनेक ठिकाणांची सारखी नावे आहेत. व्यक्ती किंवा सामानांचीदेखील सारखीच नावे असतात. मात्र पिन कोडमुळे या सर्वांचे वर्गीकरण करणे सोपे झाले.
पिन कोडचा वापर कसा होतो ?
भारत देशात पिन कोड हा सहा अंकी असतो. पहिले दोन अंक देशातील क्षेत्र दर्शवितात एखादी वस्तू, सामान किंवा पत्रे हे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील आहे, हे पहिल्या दोन अंकांवरून समजते. त्यानंतर पुढच्या दोन अंकांच्या माध्यमातून उप विभाग दर्शविला जातो. तर पुढच्या दोन अंकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वर्गवारी केली जाते. अशा पद्धतीने पिन कोडचा वापर होतो.
पिन कोड संकल्पना कोणी आणली?
देशात पिन कोड ही यंत्रणा श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी आणली. ते केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव तसेच पोस्ट आणि टेलिग्राफ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य होते. वेलणकर हे ख्यातनाम कवीदेखील होते. त्यांना १९९६ साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वेलणकर यांनी एकूण १०५ पुस्तकं लिहिली. यातील विलोमा काव्य या संस्कृत भाषेतील पुस्तकाला साहित्याचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. यामध्ये भगवान राम आणि श्रीकृष्णाची स्तुती करणारे श्लोक लिहलेले आहेत.
जगभरात कोणत्या प्रणाली वापरल्या जातात?
अमेरिकेत झोन इम्प्रूव्हमेंट प्लॅन (ZIP) कोड वापरला जातो. याची सुरुवात १ जुलै १९६३ रोजी करण्यात आली होती. पत्रव्यहार अधिक सुलभ आणि गतीने व्हावा यासाठी पोस्टल सर्व्हिस नेशनवाइड इम्प्रूव्ह्ड मेल सर्व्हिस योजनेच्या अंतर्गत ही झिप कोड प्रणाली सुरू करण्यात आली होती. अमेरिकेतील काँग्रेस लायब्रेरीनुसार झिप कोड प्रणाली अगोदर पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवले जाणारे सामान वर्गीकरणासाठी एकूण १७ ठिकाणी थांबायचे. झिप कोडच्या माध्यमातून तुलनेने कमी वेळ लागत होता.