– मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्ग संशोधकांच्‍या एका चमूला भ्रमंती करताना अमरावती जिल्‍ह्यात सातपुडा पर्वतरांगांत २००७मध्‍ये अश्‍मयुगीन चित्रगुहांचा शोध लागला. आदिमानवांचे हे वसतिस्‍थान सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज आधी वर्तवण्‍यात आला होता. पण, सखोल संशोधनातून हे वसतिस्‍थान ३५ हजार वर्षांपूर्वीचे असल्‍याचा निष्‍कर्ष काढण्‍यात आला आहे. याच परिसरात एक शिवलिंग आढळून आले. त्याची लाल रंगाने पूजा होत असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असल्‍याचा दावा संशोधकांच्‍या चमूने केला आहे. त्‍यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

अश्‍मयुगीन चित्रगुहांमध्‍ये काय आहे?

मोर्शी तालुक्‍यातील या ठिकाणी तीनशेहून अधिक शैलगृहे आणि हजाराहून जास्त शैलचित्रे व कोरीव चित्रे आहेत. लोहयुगातील भैरव किंवा भूतनाथ; तसेच काही युद्धचित्रांचाही तेथील संपदेत समावेश आहे. आदिमानवाने या भागात ३४ हजार वर्षे वास्तव्य केले असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. चित्रगुहांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रा, वाघ, बिबट्या या प्राण्यांसह जिराफासारख्या प्राण्यांची चित्रे काढलेली आढळून येतात. आदिमानवांनी निवाऱ्यासाठी या गुहांचा वापर करताना ही चित्रे रेखाटली आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागानेदेखील या परिसरात संशोधन केले आहे.

चित्रगुहांचा शोध कसा लागला?

ज्‍येष्‍ठ संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले, प्र. सु. हिरूरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे, कुमार पाटील आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे या सहा निसर्गप्रेमींच्‍या चमूने सातपुड्यातील तापी खोऱ्यात धारूळ गावानजीक चित्रगुहांचा शोध प्रथम जानेवारी २००७मध्ये लावला. भटकंतीदरम्‍यान त्‍यांना या गुहा दिसल्‍या. या गुहा जगप्रसिद्ध भीमबेटकासारख्‍याच असल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. सहा वर्षांतच अशा ३० चित्रगुहा या चमूने शोधून काढल्या. ‘मुंगसादेव चित्रगुहा’ असे एका गुहेला नाव देण्‍यात आले आहे. समुद्रसपाटीपासून ही गुहा ५७५ मीटर उंचीवर आहे. गुहेसमोर दगडांमध्‍ये खड्डे खणले आहेत. त्‍याचा उपयोग झाडे, मूळे, फळे, पाने, प्राण्यांची चरबी इत्यादी एकत्र घोटून रंग तयार करण्यासाठी केला जात असावा. गुहेची निवड करताना पाण्याचा स्रोत, अन्न आणि सुरक्षित निवारा यांचा विचार केल्याचे दिसून आले.

शिवलिंग कसे आढळून आले?

चित्रगुहांच्‍या परिसरातच एका ठिकाणी चमूने केलेल्‍या अभ्‍यासादरम्‍यान २०१२ मध्‍ये त्‍यांना एक शिवलिंग आढळून आले. त्याची लाल रंगाने पूजा झाल्‍याच्या स्पष्ट खुणा दिसतात. मात्र, त्‍याची प्रसिद्धी केल्‍यास आणि लोकांना त्‍या जागेची माहिती मिळाल्‍यास जागेचे नुकसान होऊ शकते, या भावनेतून संशोधकांनी ही माहिती समोर आणली नव्‍हती. आता या चमूने शिवलिंगाची माहिती जाहीर केली आहे. हे ठिकाण शोध घेईपर्यंत अज्ञातच होते, असे चमूचे म्‍हणणे आहे. चित्रगुहेतील दगडावर काल भैरवाचे नृत्य करतानाचे तपकिरी रंगात चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एक शैलगृहात पांढऱ्या रंगातील ‘ॐ’ आकृती आहे. आमचे याबाबतचे हे संशोधन संक्षिप्त असून ते खोलवर आणि व्यापक स्वरूपात होणे आवश्यक असल्‍याचे संशोधकांचे म्‍हणणे आहे.

शिवलिंग वैदिकपूर्व काळातील कसे?

संशोधक डॉ. व्‍ही. टी. इंगोले यांच्‍या मते वैदिक कालखंडाच्‍या बाबत निश्चित असे सांगता येत नसले, मॅक्‍स म्‍युलरने तो ख्रिस्‍तपूर्व १५०० वर्षे असा ठरवला. भारतीयांच्‍या मते तो ख्रिस्‍तपूर्व ३ हजार वर्षे आहे. सिंधू संस्कृतीचा काळ सखोल संशोधनानंतर ख्रिस्तपूर्व ७ हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. मोर्शी तालुक्‍यात आढळून आलेले शिवलिंग हे त्‍यापूर्वीचे आहे. डॉ. व्‍ही.टी. इंगोले यांनी भारतातील मानवी वसाहती आणि त्‍यांच्‍या संस्‍कृतीविषयी संशोधन केले असून अनेक निष्‍कर्षही काढले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: एअर इंडियाच्या विमानातील बॉम्बस्फोट ते ऑपरेशन ब्लू स्टार- खलिस्तानी चळवळीचा रक्तरंजित इतिहास

मोर्शीजवळील चित्रगुहांचे वैशिष्‍ट्य काय?

मोर्शीजवळील चित्रगुहा म्‍हणजे भारतातील त्‍या काळातील अश्‍मयुगीन आदिमानवांची सर्वात मोठी वसाहत मानली जात आहे, कारण भागात अश्मयुगीन, कांस्य युगीन वसाहतीचे पुरावे आढळले आहेत. कोरीव तसेच तपकिरी आणि पांढऱ्या रंगातील चित्र तेथे आहेत. संशोधनाच्या दृष्टीने हा परिसर मौल्यवान आणि विस्तीर्ण असून त्यावर अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक असल्‍याचे तसेच या अतिप्राचीन वारशाचे संरक्षण करणेही अत्यावश्यक आहे, असे संशोधकांचे मत आहे. राजकीय इच्छाशक्ती, पुरातत्त्व विभाग आणि मध्य प्रदेश सरकार यांच्या प्रयत्नामुळे भिमबेटका जगप्रसिद्ध झाले. युनोस्कोने तर भीमबेटकाला जागतिक वारसा स्‍थळ घोषित केले. या स्‍थळालाही तो दर्जा मिळावा, अशी संशोधकांची अपेक्षा आहे.

mohan.atalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know how a pre vedic shivling found in satpura mountain range print exp pbs
Show comments