– संदीप नलावडे

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ (BF.7) या उपप्रकाराने धुमाकूळ घातला असतानाच एक्सबीबी १.५ (XBB.1.5) हा ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार चिंता वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे याचे नामकरण क्राकेन असे केले आहे. अमेरिकेत या नव्या उत्परिवर्तित विषाणूमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतातही या नव्या प्रकाराचे पाच रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा हा नवा उपप्रकार नेमका काय आहे आणि तो किती घातक आहे, याबद्दल…

एक्सबीबी १.५ (XBB.1.5) म्हणजे नेमके काय?

एक्सबीबी १.५ हा ओमायक्रॉनचा नवा अवतार आहे. चीनमध्ये सध्या करोनाचा हाहाकार उडाला असून बीजिंगसारख्या शहरातही रुग्णांसाठी खाटाही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. मात्र चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ.७ या उपप्रकाराची साथ पसरली आहे. अमेरिकेत मात्र एक्सबीबी १.५ या नव्या प्रकाराने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या ओमायक्रॉनच्या नव्या प्रकारामुळे अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) माहितीनुसार अमेरिकेत आढळत असणाऱ्या करोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण या उपप्रकाराचे आहेत. एक्सबीबी १.५ हा स्ट्रेन ओमायक्रॉन ‘एक्सबीबी’ प्रकाराशी संबंधित आहे, जो ओमायक्रॉन ‘बीए २.१०.१’ आणि ‘बीए २.७५’ या उपप्रकारांचे पुनर्संयोजक आहे. ‘एक्सबीबी’ आणि ‘एक्सबीबी १.५’ या दोन्ही प्रकारांचे अमेरिकेत ४४ टक्के रुग्ण आहेत.

‘एक्सबीबी १.५’ या उपप्रकाराचे भारतात किती रुग्ण?

तज्ज्ञांच्या मते ‘एक्सबीबी १.५’ हा ओमायक्रॉनचा उपप्रकार भारतासाठी चिंताजनक ठरण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सध्या या उपप्रकाराचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. या पाचपैकी तीन गुजरातमध्ये, तर कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या पाचही रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली ठेवले असून त्यांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉन आणि त्याचे उत्परिवर्तित विषाणू हे भारतात सर्वात जास्त आढळत आहेत. त्यामुळे या उपप्रकाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार किती धोकादायक?

हा उपप्रकार केवळ रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करत नाही तर शरीराचा कमकुवत बनवतो. बीक्यू आणि एक्सबीबी या उप्रकारांपेक्षा प्रतिकारशक्तीवर अधिक परिणाम करणारा आणि संसर्ग पसरवण्यात अधिक मदत करणारा हा विषाणू आहे. ‘बीक्यू१’ या उपप्रकारापेक्षा ‘एक्सबीबी १.५’ हा १२० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अमेरिकेत एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण या उपप्रकारातील असल्यामुळे हा विषाणू किती वेगवान असल्याचे दिसून येत आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचे मते ‘एक्सबीबी’ सारखे उपप्रकार करोना लसीकरणाचा प्रभावही कमी करू शकतात. लसीच्या अकार्यक्षमतेमुळे संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. एक्सबीबी १.५ हा प्रकार अन्य जुन्या प्रकारांपेक्षा वेगळा असून तो सहजपणे मानवी शरीरात प्रवेश करतो आणि पेशींवर हल्ला करून संसर्ग पसरवतो.

हेही वाचा : भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर! जाणून घ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात किती रुपये मोजावे लागणार

भारताला काळजी वाटण्याचे कारण आहे काय?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये ओमायक्रॉनच्या या उपप्रकाराचे रुग्ण आढळले होते. मात्र त्यानंतर तो तीन महिन्यांत अमेरिकेत वेगाने पसरला. भारतात सध्या या प्रकाराचे पाच रुग्ण असले तरी हा प्रकार वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. राष्ट्रीय कोविड कृती दलाचे सहअध्यक्ष राजीव जयदेवन यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अमेरिकेनंतर अनेक देशांमध्ये ‘एक्सबीबी १.५’ आढळून आला आहे. सिंगापूरनंतर भारतातही या प्रकाराचे रुग्ण आढळले असून त्याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वी संसर्ग झाला आहे किंवा लसीकरण झालेलेही बाधित होऊ शकतात, असे जयदेवन म्हणाले. भारतातील नव्या जनुकीय तपासणी अहवालानुसार या स्ट्रेनचे प्रमाण २० टक्के आहे, तर ‘बीए२.७५’ हा जुना प्रकार अजूनही प्रबळ आहे. मात्र यात बदल होऊ शकतो. भारतातील बहुतेक नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्यामुळे या नव्या प्रकाराला घाबरण्याचे कारण नाही, असे काही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र करोनाचे नियम पाळणे आणि मूखपट्टी घालणे याकडे लक्ष देणेही गरजेचे असेल्याचा सल्ला हे तज्ज्ञ देतात.

Story img Loader