– प्रथमेश गोडबोले
जमीन मोजणी ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर होणार आहे. रोव्हर या जमीन मोजणी यंत्रामुळे आता एक हेक्टर जमिनीची मोजणी केवळ अचूक आणि कमी वेळेत म्हणजेच केवळ एका तासात करता येणे शक्य होणार आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी २००० ते २२०० जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येतील.
जमीन मोजणी म्हणजे काय?
गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपली जमीन किती आणि कुठवर आहे? याची माहिती जमीनधारकाला असणे आवश्यक असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत असतो. स्वत:च्या मालकीची किंवा वडिलोपार्जित जमीन असेल, तर त्याची मोजणी करावीच लागते. जमिनीचा वाद असो अथवा मालमत्तेचा या सर्व वादावर निर्णय देण्यासाठी देखील मोजणी करावी लागते. सध्या या मोजणीसाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाच्या (जमाबंदी) तालुकास्तरावर असलेल्या कार्यालयात जाऊन नागरिकांनी लेखी अर्ज दाखल करावा लागतो.
जमिनीची मोजणी कशी केली जाते?
दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर यासह आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात. मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करून संबंधित रकमेचे चलन बँकेत भरावे लागते. हे चलन घेऊन पुन्हा कार्यालयात जमा केल्यानंतर कार्यालयाच्या वतीने मोजणीचा महिना, तारीख देण्यात येते.
मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस पद्धती काय आहेत?
टेबल प्रक्रिया करताना प्रत्येक दोनशे मीटरवर टेबल लावावे लागते. मात्र, त्यामध्ये उंच झाडांचे निरीक्षण घेण्याला मर्यादा होत्या. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. उंच गवत असेल, तर मोजणी करताच येत नाही. ईटीएस यंत्र साडेचार फुटावर लावण्यात येत असल्यामुळे यापेक्षा जास्त उंचीची झाडे असली, की अडथळा येतो. टेबल प्रत्येक ठिकाणी उचलून न्यावे लागत असल्यामुळे प्लेन टेबलने मोजणी करण्यासाठी एक दिवस लागतो. ईटीएस यंत्राने देखील झाडे किंवा चढ-उतार भागाचे अडथळा येतोच. या पद्धतीने मोजणीसाठी अर्धा दिवस लागतो.
जमीन मोजणीची अत्याधुनिक रोव्हर पद्धत काय आहे?
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ७७ स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत. या स्थानकांचा थेट संपर्क उपग्रहाशी येतो आणि रोव्हर हे यंत्र आपण सहज शेतात घेऊन जाऊ शकतो. हे यंत्रही उपग्रहाशी जोडलेले असल्याने स्थानकांच्या आधारे (कॉर्स) जीपीएस मोजणी काही वेळात घेता येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये संकलित होणार असून पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत.
ईटीएस आणि रोव्हर यांमधील फरक काय?
जमीन मोजणीसाठी सध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जीपीएस रीडिंग काही सेकंदात घेता येते. त्यामुळेच एक हेक्टर जमिनीची मोजणी केवळ एका तासात करता येणे शक्य होणार असल्याचा दावा भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येत आहे.
रोव्हरमुळे मोजणीला गती कशी मिळेल?
रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) मोजणी करावयाच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश दर्शविते, त्या अक्षांश-रेखांशवरून ऑटोकॅडसारख्या संगणकप्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करून मोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी साहित्यातून मोजणीकाम सुलभ, अचूक व अत्यंत जलदगतीने होण्यास मदत होते. यापूर्वीचे मोजणी साहित्य सरळ टेबलने साधारण दहा एकर मोजणी करण्यासाठी एक दिवस वेळ लागत असे. तसेच ई. टी. एस. यंत्राच्या सहाय्याने तेवढ्याच क्षेत्राच्या मोजणीसाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता.
हेही वाचा : विश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय?
आता केवळ एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तेवढी मोजणी शक्य होणार आहे. त्यामुळे एक हजार रोव्हर यंत्रांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात आहे. मे महिनाअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ही यंत्रे उपलब्ध होतील. या यंत्रांकरिता भूमी अभिलेख विभागाला ८० कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.
prathamesh.godbole@expressindia.com