शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवलेले असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांची नजर प्रत्येक घडामोडींवर असते. एखादी मोठी घटना घडली की, त्याचा थेट परिणाम हा शेअर बाजारावर होतो. अनेक शेअर्सच्या किंमती निच्चांकी स्तरावर पोहोचतात. लाखाची खाक एका दिवसात होऊन जाते. यावर उपजिविका असणारे लोकांची पुरते हाल होऊन जातात. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्धस्थिती आहे. या युद्धाच्या संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजार ते कच्चं तेल या सर्वांचं गणित बिघडलं आहे. भारतीय शेअर बाजाराच नाही तर संपूर्ण जागातील शेअर बाजारावर या युद्धाचा परिणाम दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजार गुरुवाती २७०१ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर रशिया शेअर बाजारही ५० टक्क्यांनी खाली होता. पण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घटनेचा शेअर बाजारावर कसा परिणाम होतो.
शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ‘शेअर बाजारात पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले’, अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत. शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. युद्ध दुसऱ्या देशात होत असताना त्याचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर का? असा विचार तुम्ही करत असाल. दुसरीकडे एखादा सकारात्मक निर्णय आला तर बाजारात उत्साहाचं वातावरण देखील असतं. मग या मागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊयात.
गुंतवणूकदार देशांच्या संबंधांनुसार पैशांची गुंतवणूक करतात
सामान्यत: जेव्हा जास्तीत जास्त गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात किंवा कमी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतात, तेव्हा शेअर्सची किंमत वाढते. असं असलं तरी शेअर्सच्या चढ-उतार होण्यामागे आणखीही कारणं आहेत. दोन देशांमधील व्यापार आणि धोरणात्मक संबंध सुधारण्याची आशा असल्यास, अर्थव्यवस्थेच्या वाढीनुसार गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवतात.
या कारणांमुळे शेअर बाजारावर होतो परिणाम
- आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही शेअर्सच्या किमतीवर परिणाम होतो. रशिया-युक्रेन वादाप्रमाणेच भारत-चीन वादामुळे गुंतवणूकदार स्टॉकमधून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे शेअर्सच्या किमतीत चढ-उतार होत असतात.
- अर्थसंकल्प सादर करताना सरकारने केलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक घोषणांमुळे शेअर्सच्या किमतीतही चढ-उतार होत असतात.
- देशातील राजकीय स्थैर्य (बहुसंख्य सरकार किंवा युती), राजकीय वातावरण यासारख्या घटकांचाही गुंतवणूकदारांच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. राज्यांच्या विधानसभा निकालांचा शेअर बाजारावरही परिणाम होतो. सध्याच्या सरकारच्या विजयामुळे आपली धोरणे सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास कायम आहे, त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी सुरू करतात, ज्यामुळे बाजाराला उभारी मिळते.
- भारत हा कृषीप्रधान देश आहे. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला तर शेअर बाजारात तेजी येते. चांगल्या पावसामुळे अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल, असा गुंतवणूकदारांचा अंदाज असतो. म्हणजे कृषी आधारित उद्योगाची वाढ अधिक होईल, या दृष्टीने गुंतवणूक केली जाते.
- या उद्योगांमध्ये ट्रॅक्टर, खते, बियाणे, कीटकनाशके, बाइक्स आणि एफएमसीजी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचा व्यवसाय आणि नफा वाढेल, असे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी वाढते.
- रिझव्र्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना व्याज दर कमी केल्यास कर्जावरील व्याज स्वस्त होतील. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि शेवटी बँकांचा नफा वाढेल. यामुळे गुंतवणूकदार बँका आणि NBFC चे शेअर्स खरेदी करतात आणि त्यांच्या किमती वाढतात.
- आरबीआयच्या आर्थिक आढाव्यात (व्याजदरात कपात किंवा वाढ), सरकारचे राजकोषीय धोरण (कर दरात कपात), वाणिज्य धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण इत्यादी कोणत्याही बदलामुळे किमतीत चढ-उतार होतात.
विश्लेषण: वायरलेस चार्जिंग कसं काम करतं? मोबाईल बॅटरीवर परिणाम होतो का? जाणून घ्या
लोअर सर्किट म्हणजे काय?
ठराविक दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली किंवा बाजारीने उसळी घेतल्यास लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्यास लोअर सर्कीट लावले जाते. कमी कालावधीमध्ये सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लावले जाते. लोअर सर्किट म्हणजे एका ठराविक किंमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आणखीन पडझड होत नाही.
अपर सर्किट म्हणजे काय?
या उलट दुसरीकडे शेअर बाजाराने अनपेक्षितपणे उसळी घेतल्यास अपर सर्किट लावले जाते. अशावेळेस प्रत्येक शेअरचा दर एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढवता येत नाही. शेअर बाजारामध्ये समतोल कायम रहावा म्हणून हे सर्किट लावले जातात.