– ज्ञानेश भुरे
भारतात होणाऱ्या विविध टेनिस स्पर्धांपैकी टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी २५० ही सर्वांत मोठी स्पर्धा. दक्षिण आशियात होणारी एटीपी मालिकेतील ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे केवळ खेळच नाही, टेनिसचा चहुबाजूंनी देशातील प्रसार होण्यास चालना मिळाली. हा प्रसार नेमका कसा आणि याचा फायदा काय झाला याचे हे अवलोकन.
एटीपी २५० स्पर्धा म्हणजे नेमके काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या एटीपीच्या स्पर्धा मालिकेतील ही एक स्पर्धा. एटीपीच्या मालिकेत चार ग्रँड स्लॅम स्पर्धा, एटीपी फायनल्स, एटीपी १०००, एटीपी ५०० आणि एटीपी २५०, एटीपी चॅलेंजर्स अशा स्पर्धा होतात. टेनिसच्या एका हंगामात एटीपी २५० मालिकेच्या साधारण २० ते ३० स्पर्धा होतात. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूस २५० मानांकन गुण मिळतात. हे गुण खेळाडूच्या कारकीर्दीसाठी खूप महत्त्वाचे असतात. या स्पर्धेचे आयोजन करणे हेदेखील त्या देशासाठी अभिमानाचे असते. हा मान सहजासहजी मिळत नाही.
भारतात अशा किती स्पर्धा होतात?
महाराष्ट्र टेनिस ही एटीपी २५० मालिकेतील एकमेव स्पर्धा भारतात होते. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील ही भारतात होणारी एकमेव स्पर्धा आहे. भारतात चेन्नईतून ही स्पर्धा सुरू झाली आणि आता गेली पाच वर्षे ही स्पर्धा पुण्यात महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने होत आहे. बोरिस बेकरपासून अनेक आघाडीच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. या वर्षी जागतिक मालिकेत १७ व्या स्थानावर असणारा मरिन चिलीच हा प्रमुख खेळाडू सहभागी झाला होता.
भारतातील या स्पर्धेच्या आयोजनाने नेमके काय साधले?
भारतात या स्पर्धेमुळे टेनिसच्या प्रसाराला वेग मिळाला असे म्हणता येईल. भारतात टेनिसचे वातावरण निर्माण होण्यासाठी या स्पर्धेच्या आयोजनाचा मोठा वाटा आहे. गेली पाच वर्षे पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनामुळे महाराष्ट्राला टेनिसमध्ये खूप मोठा फायदा झाला. केवळ कोर्टवरील खेळच नाही, तर आयोजन, पंच, तंत्रज्ञ या आघाडीवरही भारतात चांगले अधिकारी तयार होऊ शकले. कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी चांगली कोर्ट निर्माण झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ पाहूनही प्रेक्षकांमधून खेळ पाहणाऱ्या भविष्यातील खेळाडूंना आपल्याला काय आणि कशी प्रगती करायची आहे याची कल्पना येते. खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला.
खेळाडूंना या स्पर्धेचा किती फायदा झाला?
भारतातील टेनिस खेळणाऱ्यांची संख्या या स्पर्धेच्या सलग आयोजनाने वाढली आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव भारतीय खेळाडूंना मिळाला. आतापर्यंत एकेरी, दुहेरी मिळून भारताचे १५ खेळाडू या स्पर्धेत खेळत होते. या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारताचे १७ खेळाडू खेळले. या खेळाडूंना एरवी कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायलाही मिळत नाही. थेट प्रवेशाच्या माध्यमातून भारतीय टेनिस संघटनेने ही संधी भारतीय खेळाडूंना उपलब्ध करून दिली. या स्पर्धेतील कामगिरीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे चांगल्या कामगिरीनंतर खेळाडूंना जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात स्थान मिळते आणि हे खेळाडू जगात कुठल्याही स्पर्धेत खेळू शकतात. रामकुमार रामनाथन-रोहन बोपण्णा, एम. बालाजी-जीवन नेंदुचेझियन या दोन दुहेरीतील जोड्या हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
या वर्षीच्या स्पर्धेचे खास काय म्हणता येईल?
या वर्षी पुण्याच्या १५ वर्षीय मानस धामणेला स्पर्धेत खेळण्यासाठी थेट प्रवेश मिळाला. मानसला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला, तरी त्याने आपल्या खेळाने निश्चितपणे प्रभाव पाडला आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडतोय अशा प्रतिक्रिया टेनिसविश्वातून उमटल्या आहेत. त्याचबरोबर या वर्षी स्पर्धेसाठी कार्लोस रामोस हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पंच उपस्थित होता. हा योग साधून महाराष्ट्रातील २५ ते ३० अशा पंचांचे तीन दिवसांचे मार्गदर्शन शिबीर रामोस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. त्याचबरोबर स्टिफन व्हिव्हिएर हा सर्वोत्तम दर्जाचा फिजिओ या स्पर्धेसाठी उपलब्ध होता. स्टिफनने यापूर्वी रॉजर फेडररचा फिजिओ म्हणून काम केले आहे.
भविष्याचा चेहरा म्हणून कुठल्या खेळाडूंकडे बघितले जाते?
पुण्याचा अर्जुन कढे हादेखील अशाच स्पर्धांमधून मिळालेला गुणी खेळाडू आहे. कुठलाही खेळाडू लगेच तयार होत नाही. यासाठी किमान कालावधी जावा लागतो. मानस धामणे, वैष्णवी आडकर, मधुरिमा सावंत, सोनल पाटील, संदेश कुर्ले अशा काही खेळाडूंची नावे घेता येतील. विशेष म्हणजे यातील बहुतांश खेळाडू हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांना टेनिस सुविधा पुरविण्याचे आणि स्पर्धेचा अनुभव मिळणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत देशातील १८ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन होते. आज ही संख्या ३६ पर्यंत गेली आहे.
हेही वाचा : टाटा खुली महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीवर तीन सेटमध्ये विजय
एटीपी २५० खेरीज अन्य कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होतात?
भारतीय टेनिस संघटना आपल्या खेळाडूंसाठी सातत्याने स्पर्धा आयोजनावर भर देत आहे. या वर्षी भारतात ऑक्टोबर २०२२ पासून मार्च २०२३ पर्यंत व्यावसायिक पातळीवरील तब्बल २१ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुमार गटातील ११ आयटीएफ स्पर्धा भारतात होणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी भारत एकूण ५ कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे देशातील विविध १३ राज्यांत या स्पर्धा होतील.