– संदीप कदम
भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात ड्युक्स चेंडूचा वापरला गेला. हा चेंडू सामन्यात निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही देशांमध्ये तो फारसा वापरला जात नाही. हा चेंडू कितपत सामन्यात प्रभावी ठरेल, त्या सामन्यावर काय परिणाम होईल तसेच, या चेंडूचा गोलंदाजांना फायदा कसा होईल, याचा घेतलेला हा आढावा.
ड्युक्स चेंडूची निर्मिती कोण करतो?
ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड ही क्रिकेट साहित्य बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी विशेषकरून इंग्लंड क्रिकेट संघांकडून वापरण्यात येणारा चेंडू ड्युक्स ब्रँडची निर्मिती करते. ड्युक्स चेंडू १७६० मध्ये प्रथम तयार करण्यात आला. ड्युक चेंडूचा वेस्ट इंडिजचा संघही आपल्या मायदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यात करतो.
ड्युक्स आणि इतर चेंडूंमध्ये फरक काय आहे?
ड्युक्स चेंडूचा वापर इंग्लंडमध्ये केला जातो. तर, एसजी चेंडू भारतात व कोकाबुरा चेंडू ऑस्ट्रेलियात वापरला जातो. ड्युक्स आणि एसजी चेंडूची शिलाई ही हाताने तयार करण्यात येत. त्याचा फायदा गोलंदाजांना अधिक काळ होतो. त्याविरुद्ध कोकाबुराची शिलाई मशीनने तयार केली जाते. त्याची ‘सीम’ ही काही काळाने विरळ होते आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. ड्युक्सची इतर चेंडूंशी तुलना केल्यास त्याच्यावर ‘लाखेचे’ प्रमाण अधिक असल्याने एका बाजूची चकाकी बराच काळ टिकू शकते. त्याचा फायदा गोलंदाजांना ‘स्विंग’ करताना होतो. ‘‘हाताने तयार केलेली चेंडूची शिलाई ही नेहमीच चांगली असते आणि त्यामुळे त्याचा आकारही वेगळा असतो. उंचावलेल्या शिलाई चेंडूला हवेत हालचाल करण्यास मदत मिळते,’’ असे ड्युक्स चेंडू तयार करणाऱ्या कंपनीचे मालक दिलीप जजोदिया यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये तयार होणाऱ्या कोकाबुरा चेंडूचा वापर जगातील सर्वाधिक देश करतात. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व झिम्बाब्वे हे कोकाबुराचा वापर करतात.
ड्युक्स चेंडू वेगवान गोलंदाजांना सहायकारक का?
इंग्लंडमधील बदलत्या वातावरणामुळे तेथे फलंदाजी करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामधील आणखी एक कारण म्हणजे, ड्युक्स चेंडू होय. या चेंडूंच्या मदतीने गोलंदाजांना चांगली ‘स्विंग’ मिळते. त्यातच गोलंदाजांना वातावरणाचेही सहकार्य लाभते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्याचा सर्वाधिक फायदा होतो. चेंडूवरील चकाकी फार काळ टिकल्याने ‘स्विंग’ अधिक प्रमाणात मिळतो. सर्व गोलंदाजांना ड्युक्स चेंडूने विशेषकरून इंग्लंडच्या वातावरणात गोलंदाजी करणे आवडते, असे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितले. ड्युक्स चेंडूचा वापर हा गेल्या सत्रातील ‘डब्ल्यूटीसी’च्या साउदम्प्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघाच्या फलंदाजांना इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना अडथळे येत होते. परिणामी भारतीय संघाला तो सामना गमवावा लागला.
दोन्ही संघातील कोणते वेगवान गोलंदाज प्रभाव पाडू शकतात?
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांकडे चांगले वेगवान गोलंदाज असल्याने फलंदाजांची चांगलीच कसोटी या सामन्यात पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज आहेत. या दोघांनीही इंग्लंडमध्ये अनुक्रमे ३३ व २९ बळी मिळवले आहेत. तसेच, त्यांना स्कॉट बोलँड व युवा कॅमेरून ग्रीन यांची साथ मिळेल. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा चांगला कस लागेल. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारताकडेही चांगला गोलंदाजी मारा आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांनीही इंग्लंडच्या खेळपट्टयांवर आपला प्रभाव पाडला आहे. त्यांनी अनुक्रमे ३८, १९ आणि ९ गडी बाद केले आहेत. या तिघांनाही शार्दूल ठाकूरची साथ मिळणार आहे.
ड्युक्स चेंडूसमोर फलंदाजी करताना अडथळे का?
ड्युक्स चेंडूमुळे गोलंदाजांना चांगले ‘स्विंग’ मिळत असल्याने फलंदाजांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे फलंदाजी करताना अनेक मर्यादा येतात व फलंदाजांना संयमाने खेळ करावा लागतो. वेगवान गोलंदाजांना चांगला ‘स्विंग’ मिळत असल्याने फलंदाजांना फटके खेळताना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे फलंदाजीसाठी आखण्यात आलेल्या योजनांना फटका बसतो. अशा स्थितीत काही फलंदाज खेळपट्टीवर अधिक वेळ घालवून चेंडूला सोडणे पसंत करतात आणि चेंडू नवीन असताना आपल्या फटक्यांवरही मर्यादा आणतात, असे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता याने सांगितले.
हेही वाचा : विश्लेषण : यशस्वीला भारतीय संघात स्थान मिळेल का?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील फलंदाजांची इंग्लंडमधील कामगिरी कशी?
भारताकडून विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. विराटने इंग्लंमध्ये १७ सामन्यांत १०३३ धावा, पुजाराने १६ सामन्यांत ८२९ धावा, रोहितने ७ सामन्यांत ४६६ धावा तर, रहाणेने १६ सामन्यांत ७२९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची मदार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्न आणि मार्नस लबूशेन यांच्यावर असेल. स्मिथने इंग्लंडमध्ये १७ सामन्यांत १७३९ धावा, वॉर्नरने १४ सामन्यांत ६९४ धावा तर, लबूशेनने ५ सामन्यांत ३७९ धावा केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांतील कोणते फलंदाज गोलंदाजांचा मारा झेलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.