– निमा पाटील
प्रसारमाध्यमांमध्ये खाद्यपदार्थांच्या जाहिराती करताना आकर्षक मांडणीबरोबर टोलेजंग दावेही केले जातात. सर्वसामान्य प्रेक्षकांना या दाव्यांची पडताळणी करणे तितकेसे सोपे नसते. मात्र, हे दावे नेहमी खरेच असतात असे नाही. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अलीकडेच काही खाद्य व्यावसायिकांवर कारवाई केली. या घडामोडीशी संबंधित निरनिराळे पैलू जाणून घेऊ या.
काय आहे प्रकरण?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) या संस्थेने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात खाद्य व्यावसायिकांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दावे केल्याची ३२ प्रकरणे नोंदवली आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये हा आकडा आता तब्बल १७० इतका झाला आहे. ‘एफएसएसएआय’च्या जाहिरात देखरेख समितीला असे आढळले की, या खाद्य व्यावसायिक कंपन्यांनी अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिराती आणि दावे) विनियम, २०१८ चे उल्लंघन केले आहे. व्यावसायिकांनी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अशा प्रकारचे अवैज्ञानिक तसेच अतिशयोक्त दावे आणि जाहिराती करू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे ‘एफएसएसएआय’ने स्पष्ट केले. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ५३ अंतर्गत फसवे दावे किंवा जाहिराती करणे हे दंडनीय गुन्हे आहेत.
नियमांचे उल्लंघन कोणी केले?
‘एफएसएसएआय’ने कोणत्याही विशिष्ट व्यावसायिकाचे नाव घेतले नाही, मात्र यामध्ये आरोग्यवर्धक पूरक आहार, सेंद्रिय उत्पादने, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश असल्याची त्यांनी पुष्टी केली. यापैकी प्रत्येक कंपनीने आरोग्य आणि उत्पादनाविषयी विशिष्ट दावे केले होते. त्यामध्ये पोषक आहार उत्पादने, शुद्ध तेल, कडधान्ये, पिठे, तृणधान्ये आणि तूप यांचे निर्माते आणि वितरकांचा समावेश आहे.
‘एफएसएसएआय’ने काय उपाययोजना केली?
ही प्रकरणे नोटिसा बजावण्यासाठी आणि नंतर दिशाभूल दावे मागे घेण्यासाठी किंवा त्यांना वैज्ञानिक आधार मागण्यासाठी संबंधित परवाना अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहेत. जर समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर हे दावे आणि जाहिराती एक तर काढून घ्यावे लागतील अन्यथा त्यामध्ये बदल करावे लागतील. त्यानंतर तरतुदींचे पालन केले नाही तर १० लाखांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, तसेच गुन्ह्याची पुनरावृत्ती घडल्यास परवाना निलंबित केला जाऊ शकतो अथवा रद्द केला जाऊ शकतो.
‘एफएसएसएआय’नुसार जाहिराती व दावे कसे असावेत?
जाहिराती आणि दावे या सत्य, अस्पष्ट, अर्थपूर्ण, दिशाभूल न करणाऱ्या आणि ग्राहकांना माहिती समजण्यास मदत करणाऱ्या असाव्यात असे ‘एफएसएसएआय’चे म्हणणे आहे. केलेल्या दाव्यांना वैज्ञानिक आधार असावा. दाव्याचा आधार असलेले घटक पदार्थ अथवा पदार्थ यांचे गुणधर्म किंवा प्रमाण मोजण्यासाठी प्रमाणित पद्धती असाव्यात. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या नियमाअंतर्गत विशिष्ट परवानगी असल्याशिवाय कोणतेही उत्पादन कोणताही आजार, व्यंग किवा विशिष्ट मानसिक अवस्था प्रतिबंधित करण्याचा, दूर करण्याचा, त्यावर उपचार करण्याचा किंवा ते बरे करण्याचा दावा करू शकत नाही.
फसव्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणते नियम आहेत?
फसव्या जाहिराती आणि दावे करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी विविध नियम आहेत. त्यापैकी काही व्यापक आहेत, तर काही विशिष्ट उत्पादनाशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, ‘एफएसएसएआय’कडून अन्न आणि संबंधित उत्पादनांशी संबंधित जाहिराती व दाव्यांसाठी अन्न सुरक्षा व मानके (जाहिराती व दावे) नियमन, २०१८ च्या तरतुदींचा वापर केला जातो. तर, इतर वर्गांतील वस्तू, उत्पादने आणि सेवांच्या जाहिराती व दावे यांच्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) नियमांचा आधार घेतला जातो. याबरोबरच केबल टेलिव्हिजन नेटवर्क विनियमन, १९९४ नुसार सिद्ध करण्यास अवघड असलेल्या कोणत्याही विशेष किंवा अद्भुत किंवा अलौकिक शक्ती अथवा गुणधर्म असल्याचे जाहिरातीमधून दाखवता येणार नाही.
पदार्थ नैसर्गिक असल्याचा दावा कधी करता येतो?
जेव्हा एखादे खाद्य उत्पादन हे मान्यताप्राप्त नैसर्गिक उत्पादनापासून मिळवलेले असते आणि त्यामध्ये काहीही टाकलेले नसते तेव्हा त्याला नैसर्गिक म्हणता येते. ते मानवी सेवनासाठी योग्य व्हावे यासाठीच केवळ त्यावर प्रक्रिया केलेली असावी. पॅकेजिंग करतानासुद्धा रसायने आणि प्रीझर्व्हेटिव्हचा वापर केला जाऊ नये. विविध घटक पदार्थ एकत्र मिसळून तयार केलेल्या पदार्थाला नैसर्गिक म्हणता येत नाही. अशा पदार्थांचा उल्लेख ‘नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले’ असा करता येतो.
हेही वाचा : “चित्रपट पहा आणि पैसे कमवा”चा मोह नडला; तुम्हीही करता का ही चूक?
पदार्थ ताजा असल्याचा दावा कधी करता येतो?
पदार्थातील मूलभूत गुणधर्म कायम राहून ते सेवन करण्यासाठी सुरक्षित राहील अशा प्रकारे तो धुणे, सोलणे, थंड करणे, बारीक करणे, कापणे किंवा प्रमाणित आयनायझिंग रेडिएशनने (आयनीकरण किरणोत्सर्ग) विकरण करणे याशिवाय अन्य कोणतीही प्रकिया न केलेल्या खाद्य उत्पादनांना ताजे म्हणता येते. किरणोत्सर्ग विकरण हे मोड येणे, उशिरा पिकणे आणि त्यातील कीटक व पदार्थ नासवणाऱ्या सूक्ष्म जंतूंचा नाश करणे यासाठी केले जाते. खाद्यपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली असेल तर त्यासाठी ताजा हा शब्दप्रयोग वापरता येत नाही.