– अमोल परांजपे
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला फेब्रुवारीमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. या काळात युरोपमध्ये मोठा बदल झाला आहे. आपला देश युद्धात ओढला जाणार नाही, याची शाश्वती आता कुणालाही नाही. त्यामुळे अनेक देशांनी आपली लष्करी ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी युक्रेनला सर्वतोपरी मदत केली पाहिजे, अशी युरोपची भूमिका आहे. जर्मन बनावटीचे ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला उपयुक्त ठरू शकतात, असे अमेरिकेसह युक्रेनच्या बहुतांश मित्रराष्ट्रांचे मत आहे. त्यासाठी जर्मनीवर दबाव वाढविला जात आहे.
युक्रेनमध्ये ‘लेपर्ड-२’ अधिक उपयुक्त का?
अमेरिका आणि ‘नाटो’मधील अन्य देश रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला सर्व प्रकारची मदत करत आहेत. मात्र युक्रेनची मुख्य मागणी आहे ती रशियाच्या रणगाड्यांना टक्कर देणाऱ्या रणगाड्यांची… जर्मन बनावटीचे लेपर्ड-२ हे रणगाडे त्यासाठी सर्वात योग्य आहेत. ते जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम रणगाडे आहेत. जलद हालचाल आणि शत्रूच्या वाहनांचा अचूक वेध घेण्याची क्षमता लेपर्डमध्ये आहे. या रणगाड्यांशिवाय रशियावर निर्णायक विजय मिळवणे कठीण असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सध्या युक्रेनकडे असलेले रणगाडे हे सोव्हिएट काळातील आहेत. रशियाच्या अत्याधुनिक रणगाड्यांचा मुकाबला करण्यास ते असमर्थ आहेत.
युक्रेनला रणगाडे देण्यास जर्मनीची परवानगी का हवी?
युरोपमधल्या १३ देशांना जर्मनीने हे रणगाडे निर्यात केले आहेत. असे जवळजवळ २ हजार रणगाडे सध्या या देशांकडे आहेत. मात्र जर्मनीने त्यांना रणगाडे देताना अशी अट टाकली आहे की ते पुढे कुणालाही फेरनिर्यात करायचे असतील, तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलंडसह अनेक देशांकडे निर्यातक्षम रणगाडे असून आणि ते देण्याची त्यांची इच्छा असून जर्मनीच्या परवानगीअभावी ही फेरनिर्यात रखडली आहे.
रणगाडे पाठविण्याबाबत जर्मनीची भूमिका काय आहे?
युक्रेनला या युद्धात सर्वतोपरी मदत करण्याची जर्मनीची तयारी असली, तरी अमेरिकेनेही आपल्याकडील रणगाडे युक्रेनला दिले पाहिजेत अशी भूमिका जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांनी घेतली आहे. जोपर्यंत अमेरिका आपल्याकडील अद्ययावत रणगाडे युक्रेनला देत नाही, तोपर्यंत लेपर्ड पाठविण्याची परवानगीही देण्यास ते तयार नाहीत. पाश्चिमात्य देशांनी एकत्र येऊन लेपर्डसह अन्य (पक्षी अमेरिकेचे) रणगाडे युक्रेनला देण्याचे धोरण आखले पाहिजे असा शोल्झ यांचा आग्रह आहे.
एकमत घडविण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
गेल्या शुक्रवारी बर्लिनमध्ये युक्रेनच्या पाठीशी उभ्या असलेल्या युरोपीय देशांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जर्मनीवर रणगाडे पाठविण्यासाठी दबाव आणण्यात आला. जर्मनीला स्वत: रणगाडे पाठवायचे नसतील, तर किमान इतरांना तशी परवानगी द्यावी या मागणीला जर्मनीने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. युक्रेन आणि लेपर्ड रणगाड्यांच्या मध्ये जर्मनी उभा असल्याचा पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांचा आरोप मात्र जर्मनीचे नवनियुक्त संरक्षणमंत्री बोरीस प्रिस्टोरियस यांनी फेटाळला. ‘रणगाडे पाठविण्याची सबळ कारणे आहेत तशीच न पाठविण्याचीही आहेत. याचा साधकबाधक विचार करून अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे, असेच बहुतांश मित्रराष्ट्रांचे मत आहे,’ असा दावा प्रिस्टोरियस यांनी केला.
लेपर्ड रणगाडे युद्धभूमीत उतरविण्यास जर्मनीची टाळाटाळ का?
जर्मनीने आतापर्यंत युक्रेनला मोठ्या प्रमाणात लष्करी मदत केली आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक युद्धसाहित्य पाठविणारा जर्मनी हा तिसरा देश आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीत आपली शस्त्रास्त्रे पाठवायची नाहीत, हे धोरण जर्मनीने केवळ युक्रेनसाठी बदलले आहे. मात्र अत्यंत ताकदवान असे लेपर्ड रणगाडे पाठविल्यास रशियाकडून याचा वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो. हे जर्मनीने रशियाविरुद्ध उचललेले सर्वात मोठे पाऊल ठरेल. रणगाडे पाठविण्याची अन्य देशांना परवानगी देणेही रशियाला दुखावणारे ठरू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी जर्मनी सावधगिरी बाळगत आहे. एका अर्थी युक्रेन आणि रशियामध्ये समतोल साधण्याचे हे धोरण आहे.
हेही वाचा : युक्रेन युद्धात भारताची मध्यस्थी निर्णायक ठरेल?
जर्मनीला लवकरात लवकर निर्णय का घ्यावा लागेल?
पोलंडकडे लेपर्ड-२ रणगाड्यांची मोठी कुमक तयार आहे. आता जर्मनीने परवानगी दिली नाही, तरीही रणगाडे युक्रेनला देण्याची भाषा युक्रेनने सुरू केली आहे. ‘रणगाडे पाठवावेत’ या मताच्या थोड्या राष्ट्रांचा गट एकत्र आला, तरीही आपण लेपर्ड युक्रेनकडे धाडून देऊ असे पोलंडचे पंतप्रधान मातेओझ मोराविकी यांनी म्हटले आहे. आपण परवानगीसाठी जर्मनीकडे अर्ज करू, मात्र समविचारी देश तयार झाल्यास परवानगीशिवाय रणगाडे पाठवू असे त्यांनी म्हटले आहे. एका अर्थी जर्मनीला बाजूला सारून रणगाडे युक्रेनला देण्याची तयारी युरोपमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक रेंगाळत न ठेवता जर्मनीला निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय शक्यतो रणगाडे पाठविण्याच्या बाजूने असेल, असे मानले जात असून तसे झाल्यास युक्रेन युद्धाला निर्णायक कलाटणी मिळू शकेल.
amol.paranjpe@expressindia.com