– ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिना आणि फ्रान्स हा अंतिम सामना जगभरातील फुटबॉलरसिकांना कायम लक्षात राहील असा झाला. या सामन्यात नियमित वेळ आणि ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेअंती ३-३ अशी बरोबरी झाल्याने विजेता ठरवण्यासाठी ‘पेनल्टी शूटआऊट’चा अवलंब करावा लागला. यात लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने ४-२ अशी बाजी मारताना विश्वविजेतेपद पटकावले; परंतु शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझच्या हालचाली ‘फिफा’च्या नजरेतून सुटल्या नाहीत. टायब्रेकरमध्ये त्याने गोलपोस्टमध्ये केलेल्या हालचाली किक घेणाऱ्या खेळाडूला अस्थिर करण्यासाठी पुरेशा होत्या. याची दखल ‘फिफा’ने घेतली आणि भविष्यात शूटआऊटसाठी गोलरक्षकांवर निर्बंध आणले.

अंतिम लढतीत मार्टिनेझने नेमक्या काय कृती केल्या?

अंतिम सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात गोल करण्याची स्पर्धा लागली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये सामना शूटआऊटमध्ये गेला. मार्टिनेझने अनेकदा पंचांशी वाद घालत वेळकाढूपणा केला. पेनल्टी किक घेणाऱ्या खेळाडूंना सातत्याने छेडण्याचा प्रयत्न केला. किक अडवल्यावर अधिक आक्रमकपणे आनंद साजरा केला. इतकेच नाही, तर फ्रान्सचा खेळाडू ऑरेलियन चुआमेनी याने प्रयत्न करण्यापूर्वी मार्टिनेझने चेंडूही फेकून दिला. पुढे चुआमेनी आपली संधी साधू शकला नाही. अशाच काही कृती मार्टिनेझने प्रत्येक वेळेस केल्या. त्यामुळे या हालचाली नैतिकतेला धरून आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. ‘फिफा’ने यामध्ये लक्ष घातले आणि गोलरक्षकांसाठी नियम आणण्याचा निर्णय घेतला.

गोलरक्षकांसाठीचे नवे नियम काय?

‘फिफा’च्या कार्यकक्षेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळाने (आयएफएबी) शूटआऊटदरम्यान गोलरक्षकांसाठी असलेल्या नियमांमध्ये सुधारणा सुचवल्या आहेत. या नियमातील बदलासंदर्भात २०२३/२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात हे नियम दाखवण्यात आले आहे. यातील नियम १४ हा गोलरक्षकांच्या हालचालींवर बंधने आणतो. ‘गोलरक्षकाने खेळ आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर दाखवणे आवश्यक. किक घेणाऱ्या खेळाडूचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे या नियमात म्हटले आहे.

अहवालात नेमके स्पष्टीकरण काय आहे?

नियमात बदल सुचवताना सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शूटआऊटमध्ये बचाव करताना गोलरक्षकाने किकचा सामना करताना गोलपोस्ट किंवा नेटला स्पर्श करू नये, चेंडूला किक बसेपर्यंत गोलरक्षकाने गोलरेषेवरच राहणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर किक घेण्यास उशीर करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा नियम १ जुलैपासून लागू होईल.

गोलरक्षकांना कोणत्या गोष्टी करण्यास मज्जाव?

गोलपोस्ट, नेटला स्पर्श : शूटआऊटच्या दरम्यान आधी किंवा निर्णायक पेनल्टीपूर्वी गोलरक्षक गोलपोस्ट किंवा नेटला ओठाने स्पर्श करतात. ही आता परंपरा झाली आहे. जर्मनीचा गोलरक्षक ऑलिव्हर कान आणि इटलीचा जिआनलुईजी बुफॉन यांनी ही परंपरा सुरू केली असे मानले जाते. पण आता असे करता येणार नाही. गोलरक्षकाला आता थेट गोलरेषेवर जाऊन थांबावे लागेल.

किक घेण्यास उशीर : अलीकडच्या काळात शूटआऊट ही मुख्यतः मानसिक लढाई झाली आहे. मैदानावरील आणि टीव्हीवरून बघणारे सर्व प्रेक्षक खेळाडूंइतकेच दडपणाखाली असतात. किक मारणारा खेळाडू किकसाठी आधीच वेळ घेतो. त्यामुळे दडपण अधिक वाढलेले असते. गोलरक्षकांना याची पूर्ण जाणीव असते. त्यामुळे अनेकदा गोलरक्षक किक आणखी लांबविण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा : Lionel Messi ने जिंकला Fifa सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब: Kylian Mbappe चा पराभव करत रोनाल्डोच्या विक्रमाची केली बरोबरी

किक घेणाऱ्याचे चित्त विचलित करणे : किक अचूक साधण्याचे दडपण आधीच असताना गोलरक्षकाने काही हालचाली केल्या, तर त्यामुळे चित्त अधिक विचलित होऊ शकते. नव्या नियमानुसार गोलरक्षकाला अशा हालचाली करता येणार नाहीत.

प्रतिस्पर्धी खेळाडूचा अनादर करणे : किक मारणाऱ्या खेळाडूचा आदर करणे केव्हाही आवश्यक आहे. मात्र अनेकदा गोलरक्षक किक घेणाऱ्या खेळाडूचा आदर करताना दिसत नाहीत. ते सातत्याने त्याला डिवचत असतात. मात्र आता गोलरक्षकांना अशी कृत्ये करता येणार नाहीत.

नव्या नियमांबाबत प्रतिक्रिया काय?

फुटबॉल चाहत्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग करून या नव्या नियमामुळे गोलरक्षकाचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एसी मिलानचा गोलरक्षक मैगननने यावर उपहासात्मक टीका केली. तो म्हणतो, ‘शूटआऊटमध्ये गोलरक्षकांनी पाठ करून उभे राहायला हवे. किक वाचवली गेली तर प्रतिस्पर्धी संघासाठी ती अप्रत्यक्षपणे फ्री-किक मिळेल.’ ज्याच्या कृतीमुळे हा नियम आला त्या मार्टिनेझने मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ‘मी फ्रान्सला रोखू शकलो आणि संघाला विजयी केले हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘फिफा’ला काय हवे आहे समजून घ्यावे लागेल. त्यांनी घालून दिलेल्या नियमांशी जुळवून घ्यावे लागेल. वेळ लागेल, पण अडचण येणार नाही,’ असे त्याने म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know need of new rules for football penalty shootouts print exp pbs
Show comments