देशाच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत येणारी संशोधन संस्था डीआरडीओमधील (DRDO) एका वैज्ञानिकाने दिल्लीतील रोहिनी न्यायालयात थेट टिफीन बॉम्ब ठेवला आणि स्फोट घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात या वैज्ञानिकाने आपल्या शेजारी वकिलाला मारण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. मात्र, संरक्षण विभागातील एका वैज्ञानिकाला आपल्याच शेजाऱ्याला का मारावं वाटलं आणि त्यासाठी त्याने थेट न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा निर्णय का घेतला असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांच्या उत्तरांचा हा आढावा.
संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डीआरडीओ या संस्थेत वैज्ञानिक असलेल्या भारत भुषण कटारिया यांनी शेजारी राहणाऱ्या वकिलाला वैतागून त्याला थेट मारण्याचा कट रचला. यासाठी थेट दिल्लीतील रोहिनी कोर्टात टिफीन बॉम्ब ठेवला. मात्र, या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वेगाने आरोपीचा शोध घेतला. आरोपी वैज्ञानिक कटारियाला अटक केल्यानंतर हा स्फोट करण्यामागील कारणं धक्कादायक आहेत.
संरक्षण विभागातील वैज्ञानिकाने दिल्लीतील न्यायालयात बॉम्बस्फोट का घडवला?
अटकेनंतर आरोपी वैज्ञानिक कटारियाने शेजाऱ्याला मारण्यासाठी थेट कोर्टात बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागील घटनाक्रमच सांगितलाय. यानुसार, “आरोपी कटारियाच्या शेजाऱ्याने १० वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात ३ मजली इमारतीत लिफ्ट बसवण्यावरून एक खटला दाखल केला. यानंतर दोघांकडूनही एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल होत राहिल्या.
शेजाऱ्याकडून वैज्ञानिकाविरोधात कामाच्या ठिकाणीही तक्रारी आणि RTI
शेजाऱ्याने आरोपी कटारियाविरोधात पाण्याची टाकी बसवण्यावरूनही तक्रार दाखल केली. याशिवाय शेजारी वकिलाने वैज्ञानिक कटारिया काम करत असलेल्या डीआरडीओ या संस्थेत अनेक RTI दाखल केले. तसेच कटारियाविरोधात कामाच्या ठिकाणी तक्रारी देखील केल्या.”
हेही वाचा : स्फोटप्रकरणी ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञास अटक
खटल्यांच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी कार्यालयाकडून सुट्टी नाही
शेजारी राहणाऱ्या वकिलाने केलेल्या या सर्व प्रकारांना वैज्ञानिक कटारिया वैतागला. अखेर त्याने आपलं स्वतःचं घर सोडून भाड्याने दुसरं घर घेऊन राहू लागला. या घरासाठी त्याला ५०,००० रुपये द्यावे लागत होते. दुसरीकडे शेजारी वकिलाने कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी वैज्ञानिकाला त्याच्या कार्यालयाकडून सुट्टी देखील मिळत नव्हती.
पत्नीला कॅन्सर आढळला, अखेर शेजाऱ्यापासून सुटकेसाठी बॉम्बस्फोट
अशा परिस्थितीतच कोर्टाने कटारिया सुनावणीला हजर राहत नसल्याने जाणीवपूर्वक दिरंगाईचा ठपका ठेवत त्यांना दंड ठोठावला. याशिवाय वैज्ञानिक कटारिया यांच्या पत्नीलाही कर्करोग (Cancer) असल्याचं समोर आलं. यानंतर अशा स्थितीत तुरुंगात जावं लागतं की काय अशी भीती कटारियाला वाटू लागली आणि त्याने या त्रासाचं कारण ठरलेल्या शेजाऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं.
हेही वाचा : दिल्ली कोर्टातील स्फोटाचं रहस्य उलगडलं, DRDO च्या वैज्ञानिकाला अटक, कारण ऐकून पोलीसही अवाक
बॉम्बसाठी ऑनलाईन साहित्य मागवलं, यूट्यूबचाही वापर
शेजारी वकिलाची हत्या करण्यासाठी डीआरडीओच्या या वैज्ञानिकाने ऑनलाईन काही वस्तू मागवल्या. याशिवाय स्थानिक दुकानांमधून अमोनियम नायट्रेट देखील घेतलं. जवळपास ५ हजार रुपयांची सामग्री गोळा करून या वैज्ञानिकाने बॉम्ब बनवला. यासाठी त्याने यूट्यूबचाही आधार घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.