भारतासाठी आज मोठा दिवस आहे. चांद्रयान-३ चे लँडर मोड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. लँडरचे यशस्वी अवतरण केल्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. आजवर एकही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नव्हता. चांद्रयान-३ चा विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर हे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स (BRICS summit) परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत असून तिथून ते ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यात सहभागी झाले. आज भारताला चंद्रावर उतरण्यात यश मिळाल्यामुळे चंद्रावर लँडिंग करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत युनायटेड स्टेट्स, चीन आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनने चंद्रावर पाऊल ठेवलेले आहे.
भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला असून यासाठी आपल्याला इस्रोच्या वैज्ञानिकांचे आभार मानायला हवेत. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी मेहनत घेतली, त्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. फस्टपोर्स्ट या संकेतस्थळाने ही माहिती गोळा केली असून त्याबद्दलचा सविस्तर लेख प्रकाशित केला आहे.
हे वाचा >> रशियाचे लुना-२५ कोसळले; चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण आहे का?
एस. सोमनाथ
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली चांद्रयान-३ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे काम हाती घेण्यात आले आहे. एरोस्पेस इंजिनिअर असलेले एस. सोमनाथ यांनी २०२२ साली इस्रोचा कारभार हाती घेतला होता. केरळमध्ये जन्म झालेल्या सोमनाथ यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळण्यासाठी बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेमध्ये प्रवेश घेतला.
लँडिंग करण्यापूर्वी सोमनाथ यांनी चांद्रयान मोहीम यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. “आम्हाला पूर्ण खात्री आहे की, यावेळी आम्हाला यश मिळेलच. आतापर्यंत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. आम्ही सर्व तयारी पूर्ण केली असून सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण केल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, यावेळी लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आम्ही अतिरिक्त उपाय योजले आहेत. अपयश टाळण्यासाठी नवीन उपकरणे जोडण्यात आलेली आहेत.
चांद्रयानचे प्रक्षेपण करण्याच्या एक दिवस आधी सोमनाथ यांनी आंध्र प्रदेशमधील श्री चेंगलम्मा मंदिरात दर्शन घेतले होते. तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांनी प्रक्षेपणाआधी तिरुपती मंदिराला भेट दिली होती. यावेळी वैज्ञानिकांच्या पथकाने चांद्रयान-३ चे लघू मॉडेल मंदिराला अर्पण केले.
पी. विरामुथूव्हेल
पी. विरामुथूव्हेल हे तामिळनाडू राज्यातील व्हिलूपूरम जिल्ह्यातील आहेत. चांद्रयान-३ मोहिमेचे ते प्रकल्प संचालक आहेत. न्यूज-९ च्या माहितीनुसार, १९८९ मध्ये त्यांनी इस्रोचे वैज्ञानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मद्रास आयआयटीचे माजी विद्यार्थी असलेल्या विरामुथूव्हेल यांच्याकडे २०१९ साली भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचे काम आले होते. तसेच चांद्रयान-२ मध्ये जे प्रकल्प संचालक असलेल्या मुथुया वनिथा यांच्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. चांद्रयान-२ मोहिमेवेळी विरामुथूव्हेल हे इस्रो आणि नासा यांच्यादरम्यान वाटाघाटी करणारे महत्त्वाचे व्यक्ती होते. विरामुथूव्हेल यांनी याआधी इस्रो मुख्यालयात स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमाचे सह संचालक पद भूषविले होते.
एम. शंकरन
एम. शंकरन यूआर राव सॅटेलाईट सेंटरचे (URSC) संचालक आहेत. या केंद्राकडे इस्रोचे उपग्रह तयार करणे आणि त्याचे डिझाईन करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखालील पथक सॅटेलाईट कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट वर्किंग, हवामान अंदाज वर्तविणे आणि नव्या ग्रहांचा शोध करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
एम. शंकरन यांनी १९८६ साली भारतीदासन विद्यापीठ, तिरुचिरापल्ली येथेून भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर ते इस्रोच्या उपग्रह केंद्राशी जोडले गेले, ज्याचे नाव “यूआर राव सॅटेलाईट सेंटर” आहे.
डॉ. के. कल्पना
डॉ. के. कल्पना या चांद्रयान-३ च्या मोहिमेत सहप्रकल्प संचालक आहेत. डॉ. कल्पना अनेक काळापासून इस्रोच्या चंद्र मोहिमेवर काम करत आहेत. करोना महामारीच्या काळातही त्यांनी या मोहिमेवर काम सुरू ठेवले होते. मागच्या चार वर्षांपासून त्या या प्रकल्पावर काम करत आहेत. डॉ. कल्पना सध्या “यूआर राव सॅटेलाईट सेंटर” च्या सहप्रकल्प संचालक आहेत.
एस. उन्नीक्रिष्णन नायर
एस. उन्नीक्रिष्णन नायर हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) संचालक आहेत. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार नायर आणि त्यांचे सहकारी चांद्रयान-३ च्या मोहिमेत विविध कामामध्ये सहभागी आहेत. नायर यांनी चेन्नई आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. बंगळुरूमधील ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरचे ते संस्थापक संचालक आहेत.
व्हीएसएससीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नायर यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि एलव्हीएम ३ या प्रक्षेपकांच्या एरोस्पेस सिस्टिम आणि यंत्रणेच्या विकासात योगदान दिलेले आहे. एलव्हीएम ३ प्रक्षेपकावर (रॉकेट) इस्रोचा अधिक विश्वास आहे. चांद्रयान-३ उपग्रहाचे चंद्रावर प्रक्षेपण करण्यासाठी याच प्रक्षेपकाचा उपयोग केला होता.
ए. राजाराजन
बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, प्रक्षेपणाला मान्यता देणाऱ्या लाँच ऑथोरायजेशन बोर्डाचे (LAB) ते अध्यक्ष आहेत. श्रीहरीकोटा येथे असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्राचे (SHAR) ते विद्यमान संचालक आहेत. उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन यंत्रणेमध्ये विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात राजाराजन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, असे SHAR च्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.
छायन दत्ता
चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपण नियंत्रण ऑपरेशन्सचे पर्यवेक्षण करण्याचे काम छायन दत्ता यांनी केले आहे. छायन दत्ता मुळचे आसाम राज्यातील लखीमपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तेजपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. यूआर राव सॅटेलाईट सेंटरच्या अंतरीक्ष विभागाचे ते वैज्ञानिक आणि अभियंते असल्याची माहिती ईस्ट मोजो संकेतस्थळाने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ च्या लँडरवरील “ऑन बोर्ड कमांड टेलेमेट्री, डेटा हँडलिंग आणि स्टोरेज सिस्टम”चे प्रमुख म्हणून दत्ता काम करत आहेत.
तेजपूर विद्यापीठाशी बोलताना दत्ता म्हणाले की, चांद्रयान-३ ची जबाबदारी मिळाल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. ही मोहीम आपल्या राष्ट्रासाठी आणि जागतिक वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल.
इतर
आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, एस. मोहन कुमार हे चांद्रयान-३ चे मोहीम संचालक आहेत; तर बिजू सी. थॉमस हे व्हेईकल/प्रक्षेपक संचालक आहेत.
आणखी वाचा >> चांद्रयान-३ : चंद्रावर संशोधन करण्यासाठी इस्रोने दक्षिण ध्रुवाची निवड का केली? इतर देश इथे का गेले नाहीत?
चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ मोहिमेतील फरक असा की, चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व महिलांनी केले होते. वनिता या चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रकल्प संचालक होत्या, तर रितू करिधल मोहीम संचालक होत्या. “चांद्रयान-३ मोहिमेमध्ये ५४ महिला अभियंता आणि वैज्ञानिकांचा समावेश आहे. या महिलांनी विविध स्तरावर आपले योगदान दिले आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी आयएएनएसशी बोलताना दिली.