डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर मानवी मुल्यांसाठी लढा दिला. भारतातील विषमता आणि भेदभाव यावर सडकून टीका केली. तसेच हा भेदभाव बंद होण्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी केली. यासाठी आंबेडकरांनी विविध आयुधं वापरली. यापैकी एक म्हणजे पत्रकारिता. डॉ. आंबेडकरांनी या काळात समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकार म्हणून ताशेरे ओढले. बहिष्कृत भारतमध्ये त्यांनी तत्कालीन अनेक विषयांवर विपूल लेखन केलं. यात अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्याचाही समावेश आहे. या मुद्द्यावर आंबेडकरांनी तत्कालीन धर्ममार्तंडांना देव पुजाऱ्यांचा आहे की भक्तांचा असा थेट सवालच केला होता. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशावर काय मांडणी केली याचा हा आढावा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १२ एप्रिल १९२९ रोजी बहिष्कृत भारतमध्ये लिहिलं, “मद्रास इलाख्यातील एरोड देवस्थान कमिटीने आपल्या ताब्यातील पाच तालुक्यांमधील देवालये अस्पृश्यांसह सर्व हिंदुंना मुक्तद्वार करण्याचा ठराव केला आहे. परंतु जीर्णमतवाद्यांना अर्थातच हा ठराव नापसंत आहे. ते त्याविरूद्ध खटपट करीत आहेत. त्या ठरावाला विरोध होणार ही अटकळ होतीच. या ठरावाची बातमी समजली तेव्हा एरोड येथील ‘ईश्वरा’च्या देवळात जाण्यासाठी बहिष्कृत वर्गातले काही लोक ४ एप्रिल १९२९ रोजी जमावाने निघाले. त्याची गुणगुण कळल्याबरोबर देवळाच्या पुजाऱ्यांनी देवळाच्या गाभाऱ्याच्या दरवाज्याला कुलुपे लावली आणि बहिष्कृतांना देवदर्शन होऊ नये अशी व्यवस्था केली.”
“तेव्हा बहिष्कृत वर्गातली मंडळी मुखशाळेत बसून राहिली आणि नारळ वगैरे नैवेद्याच्या वस्तु तेथेच देवाला अर्पण करून घंटा वाजवू लागले. कमिटीने हा ठराव रद्द केला नाही, तर आपण राजीनामे देऊ, अशी धमकी पुजाऱ्यांनी दिली आणि जीर्णमतवादी लोकांनी या ठरावाविरूद्ध चळवळ चालवून मारामाऱ्या करण्याचीही तयारी केली अशी बातमी आहे. एरोड देवस्थान कमिटी आपल्या ठरावाला चिकटून राहण्याचे धैर्य कितपत दाखविते ते आता पहावयाचे आहे. देव पुजाऱ्यांचा, नुसत्या वरिष्ठ वर्गाचा की अस्पृश्यांसह सर्व हिंदूंचा, हा प्रश्न जितक्या लवकर धसाला लागेल तितके चांगले.”
“अस्पृश्यांसाठी खास देवालय”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी खास देवालय निर्माण करण्याच्या निर्णयाला विरोध केला. ते म्हणाले, “रत्नागिरी येथे तेथील रा. कीर नावाच्या एका धनिक हिंदु गृहस्थांनी अस्पृश्यांसाठी पतितपावन मंदिर नावाचे एक खास देवालय बांधण्याचे ठरविले आहे. त्या देवळाची कोनशीला बसविण्याचा समारंभ डॉ. कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. डॉ. कुर्तकोटी यांची धार्मिक व सामाजिक मते रबरासारखी लवचिक आहेत आणि अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत आतापर्यंत अनेकवेळा त्यांनी धरसोडीची मते प्रदर्शित केली आहेत हे, प्रसिद्धच आहे. आम्हाला फक्त रा. कीर यांच्या गैरसमजुतीबद्दल वाईट वाटते. त्यांनी आपला पैसा अशाप्रकारे खर्च करण्याऐवजी अस्पृश्य वर्गातील लोकांच्या शिक्षणासाठी आणि अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीमध्ये खर्च केला असता, तर तो सत्कारणी लागला असता.”
“बहिष्कृत वर्गासाठी खास देवळांची जरूरी आहे असे मला वाटत नाही, इतकेच नव्हे तर अशी खास देवळे बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणे अधिक लांबणीवर पडेल अशी आमची पक्की समजूत आहे. अस्पृश्यांची मागणी मुख्यतः अस्पृश्यता निवारणासंबंधाची आहे. अर्थात सध्या अस्तित्वात असलेल्या इतर हिंदु समाजाच्या भजणुकीच्या देवळात त्यांना प्रवेश हवा आहे. देवळे नाहीत म्हणून देवाची भक्ति करता येत नाही असे नाही. घरी बसूनही देवाची पूजा करता येते, देवाचे स्मरण करता येते, त्याला देऊळच पाहिजे असे नाही. मात्र अस्पृश्यांसाठी खास देवळे बांधल्याने स्पृश्य व अस्पृश्य यांच्यामधील भेदरेषा कायम होणार आहे. रत्नागिरीचे नवीन देऊळ महार-चांभारांचे देऊळ म्हणून मानले जाईल. यामुळे केवळ सोवळ्या लोकांना आपली देवळे विटाळापासून सुरक्षित राहिल्याबद्दल समाधान वाटेल, याविषयी माझी खात्री आहे. रा. कीर यांनी नकळत व सद्धेतूने का होईना, परंतु कुर्तकोटींसारख्यांच्या नादी लागून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याची स्वतःचे पैसे खर्जून मोठी हानी केली असेच माझे मत आहे. रा. कीर यांनी देऊ केलेली ही खास देवळाची देणगी रत्नागिरी येथील आमच्या बहिष्कृत वर्गीय बंधूनी आताच साभार नाकारावी,” अशी सूचना डॉ. आंबेडकरांनी केली.
“हिंदु देवालयांचे संरक्षण करणारे अस्पृश्य”
डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यांबरोबर भेदभाव होऊनही त्यांनीच दंगलीच्यावेळी हिंदु देवळं वाचवली, असंही नमूद केलं. ते म्हणाले, “हिंदु समाजात बहिष्कृत वर्गाला समतेचे हक्क नाहीत. इतकेच नव्हे, तर परधर्मातल्या लोकांपेक्षाही अस्पृश्यांना हिंदु समाज तुच्छ लेखतो. देवळाच्या आवारात मुसलमान जाऊ शकतात, परंतु अस्पृश्यांना आसपासही पाऊल टाकता येत नाही, मग देवदर्शनाची गोष्ट बाजूलाच राहिली. अशाप्रकारे हिंदु समाजात बहिष्कृत वर्गाची स्थिती असता मुंबईतील हिंदु मुसलमानांच्या मोठ्या दंग्याच्या वेळी त्या वर्गातील लोकांना, ते हिंदु धर्मास चिकटून राहिल्यामुळे इतर हिंदूंबरोबर मुसलमानांच्या क्रोधाला बळी पडण्याचा प्रसंग आला.”
“इतकेच नव्हे, तर ज्या देवालयात त्यांना देवदर्शन घेण्यासही मोकळीक नसते, त्या देवालयातल्या देवाच्या त्यांना अदृश्य असलेल्या मूर्तीचे संरक्षण करण्यासही भायखळा वगैरे भागांत अस्पृश्य वर्गातले लोक केवळ पूर्वजांच्या धर्माचा अभिमान बाळगून आणि आपल्यावर हिंदु समाजात होत असलेला जुलूम घटकाभर विसरून, हातात काठ्या घेऊन तयार झाले. त्यांनी अशी मदत केल्यामुळेच मुसलमानांच्या हल्ल्यापासून त्या हिंदु देवालयांचा बचाव झाला. या प्रसंगी आमच्या अस्पृश्यवर्गीय लोकांनी आपले प्राण धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहिले नाही. अस्पृश्यांनी या आणीबाणीच्या वेळी हिंदु समाजाची जी बहुमोल कामगिरी बजावली त्याबद्दल हिंदु संघटनावाल्यांनीही त्यांची स्तुती केली. परंतु एरव्ही त्यांना अस्पृश्यांच्या धार्मिक व सामाजिक हक्कांची कधी आठवण होत नाही,” असं आंबेडकरांनी सुनावलं.
हेही वाचा : ग्रंथवाचन ते पत्रलेखन, बाबासाहेबांचे महापरिनिर्वाणाआधीचे सहा दिवस कसे होते?
आंबेडकर पुढे म्हणाले, “अस्पृश्यांनी हिंदु धर्मातून बाहेर जाऊ नये, हिंदु समाजाच्या खांद्याला खांदा भिडवून परधर्मीयांशी सामना करावा, परंतु हिंदु समाजात समतेची हक्काची मागणी त्यांनी करू नये, अशी या धर्माभिमानी म्हणविणाऱ्या आकुंचित बुद्धीच्या लोकांची इच्छा असते. अस्पृश्य लोक समतेची मागणी करू लागले, तर तुम्हाला आम्ही वागवतो तसे वागवून घ्यायचे असेल, तर हिंदुधर्मात राहा. अन्यथा तुम्ही खुशाल परधर्मात जा. आम्हाला त्याची बिलकुल पर्वा नाही’ असे उघड म्हणण्यासही हे धर्माभिमानी म्हणवणारे लोक कमी करीत नाहीत. दंग्याच्या वेळी अस्पृश्यांची हिंदु समाजाला जरूरी होती, म्हणून मुंबईच्या कित्येक भागात त्या दिवसांमध्ये हिंदु उपहारगृहांमध्येही अस्पृश्यांना घेण्यात येत असे.”
“असे सांगतात. तसे असल्यास हिंदु लोकांच्या सोवळ्याच्या मतलबी लवचिकपणाची वाहवाच केली पाहिजे. हिंदु उपहारगृहांमध्ये अस्पृश्यांना घेण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना मोगलांच्या, मुसलमानांच्या किंवा इराण्यांच्या हॉटेलमध्ये जावे लागते. ज्या लोकांना दंग्याच्या वेळी हिंदु उपहारगृहांमध्ये प्रवेश करता येत होता, त्यांनाही आता परत परधर्मीयांच्या हॉटेलांचा आश्रय करावा लागेल याविषयी माझी खात्री आहे. कारण ‘गरज सरो नी वैद्य मरो !’,” असं म्हणत त्यांनी समाजातील दुटप्पीपणावर प्रहार केला.