– ज्ञानेश भुरे
वेस्ट इंडिजनंतर कसोटी क्रिकेटमध्ये कोणी दबदबा राखला असेल, तर तो ऑस्ट्रेलिया संघाने. एक काळ असा होता की त्यांचा अकराव्या क्रमांकाचा फलंदाजही नेटाने खेळायचा. पण, आज याच संघाचे तळातील फळीचे सोडा आघाडीचे फलंदाजही खेळपट्टीवर टिकू शकत नाहीत. सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम दोन वेळा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेमके काय चुकत आहे, पुढे काय होणार, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…
सध्या सुरू असलेल्या भारत दौऱ्यात नेमके काय चुकले?
भारत दौरा हा क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी सर्वात खडतर असा असतो. भारतात पाहुणा संघ क्वचितच जिंकतो. अर्थात, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघांना आशियात खेळणेच कठीण जाते. ऑस्ट्रेलिया संघ गेल्या ३३ सामन्यांत आशियात २० सामने हरला आहे, तर केवळ पाच सामने जिंकला आहे. यामध्ये भारतात गेल्या दहा दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला केवळ एक विजय मिळविता आला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघ झुंज तरी द्यायचा. पण, या दौऱ्यात आलेला ऑस्ट्रेलिया संघ कमालीचा दुबळा आहे. फिरकी गोलंदाजीचा त्यांनी जणू धसकाच घेतला आहे. फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्रच त्यांचे फलंदाज विसरल्यासारखे वाटत आहेत. फिरकीला प्रतिकार म्हणून स्वीप फटक्याचा वापर हे त्यांचे नियोजन त्यांच्याच अंगलट आले आहे. क्रिकेट विश्वातील भलेभले दिग्गज फलंदाज स्वीप फटका खेळत नाहीत. हा फटका खेळण्याचेदेखील एक तंत्र आहे. ते तंत्रही ते विकसित करू शकले नाहीत आणि याच फटक्याने ऑस्ट्रेलियाचा खरा घात केला.
अपुरी किंवा खराब तयारी हे या अपयशाचे कारण असू शकते का?
ऑस्ट्रेलिया संघाच्या या सर्वात मोठ्या अपयशाचे कारण त्यांच्या अपुऱ्या पूर्वतयारीला देता येईल. दुसऱ्या डावात समाधानकारक सुरुवात केल्यानंतरही त्यांचे नऊ फलंदाज ४८ धावांत बाद झाले. पत्त्याचा बंगाल कोसळावा, तसा ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. जस्टिन लँगर यशस्वी होत असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंच्या हट्टापायी लँगरला प्रशिक्षक पदावरून दूर केले. ॲण्ड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी लँगरची जागा घेतली. लँगरची शिस्त खेळाडूंना झेपली नाही. आणि मॅकडोनाल्ड यांचे नियोजन त्यांना अपयशाच्या गर्तेत लोटून गेले. भारत दौऱ्यातील मुख्य मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सामने खेळण्यास ऑस्ट्रेलियाने नकार दिला. का, तर भारतात सरावाला वेगळी आणि मुख्य सामन्यात फिरकीला साथ देणारी खेळपट्टी वापरतात. ऑस्ट्रेलियाच्या या खुलाशाला काहीच अर्थ नव्हता हे पहिल्या दोन कसोटीमधील त्यांचा अडीच दिवसातल्या पराभवाने दिसून आले.
या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाची संघ निवड चुकली का?
ऑस्ट्रेलिया निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी चुकीची निवड केली असे म्हणायला निश्चित जागा आहे. मिशेल स्टार्क, कॅमेरुन ग्रीन आणि जोश हेझलवूड या तीनही प्रमुख गोलंदाजांना जखमी असूनही दौऱ्यावर आणले गेले. फिरकी गोलंदाज मिशेल स्वीपसन मालिका सुरू झाल्यावर दौरा अर्धवट सोडून कौंटुबिक कारण देत मायदेशी परतला. ऑस्ट्रेलिया दौरा काही आज ठरला नव्हता. संघ निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार झाला नाही. पहिल्या कसोटीत ट्राविस हेड आणि ॲश्टन अगरला वगळण्यात आले. डेव्हिड वॉर्नरही लयीत नाही. एकटा मार्नस लबुशेन पहिलाच भारतीय दौरा असूनही आत्मविश्वासाने खेळतोय. दुसऱ्या कसोटीत तीन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला खरा, पण तेव्हा नव्या चेंडूंची जबाबदारी एकट्या पॅट कमिन्सवर पडली. त्याचा भार म्हणा किंवा चेंडूची लकाकी कमी करू शकणारा दुसरा वेगवान गोलंदाज संघातच नव्हता.
भारतीय फिरकी गोलंदाजीचा धसका ऑस्ट्रेलियाने घेतला का?
ऑस्ट्रेलिया संघाची दोन्ही कसोटी सामन्यातील कामगिरी अशीच काहीशी दर्शवते. फिरकी गोलंदाजीचा सामना करण्याची त्यांची मानसिकताच राहिलेली नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांचा मारा सुरु झाला की ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ड्रेसिंगरूममधून येतानाच बाद झालेले असतात. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नेथन लायन ही कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत त्याने आपल्या दर्जाची चुणूक दाखवली होती. पण, तेव्हा अक्षर पटेल आणि आश्विन यांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला निराश केले. मैदानावरील कामगिरीला तेव्हा मानसिकतेची जोड मिळते तेव्हाच तुम्हाला यश मिळते. ऑस्ट्रेलिया संघ हीच मानसिकता हरवून बसला आहे.
हेही वाचा : विश्लेषण: ऑस्ट्रेलियाने ‘ग्रेट बॅरिअर रीफ’च्या संरक्षणासाठी कोळसा खाण प्रकल्प का नाकारला?
ऑस्ट्रेलियाचे होम वर्क कमी पडले?
भारतच नाही, तर उपखंडात खेळणे नेहमीच अवघड असते. पाहुण्या संघांना दिव्यातून बाहेर पडायचे असते. अशा वेळी उपखंडात खेळण्याचा कालावधी, त्या काळातील तेथील हवामान, तेथील खेळपट्ट्या याचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. भारतात प्रत्येक केंद्रावरील उष्णता, गवताचा ओलावा आणि मातीचा पृष्ठभाग यात फरक पडत असतो. प्रत्येक केंद्रावरची आर्द्रता वेगळी असते. खेळपट्टीवर गवत किती ठेवायचे, किती पाणी मारायचे याचा निर्णय यजमान क्रिकेट मंडळाचा असतो. तेव्हा भारतात खेळताना या गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. कारण परदेशात अशा हवामानात आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याची सवय नसते. ती करून घ्यायची असते. यालाच होम वर्क (घरचा अभ्यास) म्हणतात आणि येथेच ऑस्ट्रेलिया संघ कमी पडला.