ओडिशातील पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेशास परवानगी आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर “फक्त हिंदूंना परवानगी आहे” अशी स्पष्ट सूचना आहे. यावर ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी जगन्नाथ मंदिरात परदेशी नागरिकांनाही प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात गैर-हिंदू आणि परदेशी नागरिकांना प्रवेश का नाही? यावरील मतमतांतरे नेमकी काय? याचा हा आढावा…
राज्यपाल गणेशी लाल यांनी भुवनेश्वरमधील उत्कल विद्यापीठात बोलताना म्हटलं, “जर एखादा परदेशी माणूस जगतगुरु शंकराचार्यांना भेटू शकतो, तर त्याला भगवान जगन्नाथांनाही भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. लोक माझ्या मताला पसंत करो अथवा नाही, मात्र हे माझे वैयक्तिक मत आहे.”
गणेशी लाल यांच्या या वक्तव्याला सेवक आणि जगन्नाथ संस्कृतीच्या संशोधकांनी या सूचनेला विरोध केला आहे. मंदिराच्या परंपरा आणि प्रथा मोडू नयेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
जगन्नाथ मंदिर हे चार धामपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान जगन्नाथ (भगवान विष्णूचे एक रूप), त्यांचा मोठा भाऊ भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांची पूजा केली जाते. गर्भगृहातील या देवतांचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिराच्या आत फक्त हिंदूंना परवानगी आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्पष्टपणे लिहिले आहे की, फक्त हिंदूंना परवानगी आहे.
गैरहिंदू आणि परदेशींना प्रवेश का नाही?
शतकानुशतके मंदिरात गैरहिंदू आणि परदेशींना प्रवेश न देण्याची ही प्रथा आहे. त्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही. काही इतिहासकारांच्या मते, काही मुस्लीम शासकांनी मंदिरावर केलेल्या हल्ल्यांमुळे सेवकांनी गैर-हिंदूंच्या प्रवेशावर निर्बंध लादले असावेत. दुसरीकडे काही जणांच्या मते मंदिर बांधल्यापासून ही प्रथा होती.
पतितपाबन दर्शन
भगवान जगन्नाथ यांना पतितबापन म्हणूनही ओळखले जाते. पतितबापन म्हणजे “दलितांचा रक्षणकर्ता” असा अर्थ सांगितला जातो. ज्यांना धार्मिक कारणांमुळे मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे, अशा सर्वांना सिंहद्वारावर पतितपाबनाच्या रूपात देवाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी जून-जुलैमध्ये नऊ दिवसांच्या रथयात्रेदरम्यानही गैर-हिंदूंना दर्शन घेता येते. या रथयात्रेला जगभरातील भक्त पुरीला गर्दी करतात.
भूतकाळातील वाद
१९८४ मध्ये जगन्नाथ मंदिरातील सेवकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी गैरहिंदू व्यक्तीशी लग्न केल्याचं कारण सांगत त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास विरोध केला. यानंतर इंदिरा गांधींना जवळच्या रघुनंदन वाचनालयातून दर्शन घ्यावं लागलं होतं.
नोव्हेंबर २००५ मध्ये थायलंडची राजकुमारी महा चक्री श्रीनिधोर्न ओडिशा दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनाही परदेशी असल्याने बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं होतं. २००६ मध्ये स्विस नागरिक एलिझाबेथ जिग्लर यांनी मंदिरासाठी १ कोटी ७८ लाख रुपयांची देणगी दिली तरीही त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.
हेही वाचा : विश्लेषण : ओडिशातील ‘नवीन’ बदल? २० मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी का घेतले?
२०११ मध्ये तत्कालीन ओडिशा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे तत्कालीन सल्लागार प्यारी मोहन महापात्रा यांनी ओडिशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळावा या मागणीला पाठिंबा दिला आणि वाद निर्माण झाला. यानंतर महापात्रा यांना त्याचं वक्तव्य मागे घ्यावं लागलं.