ट्विटरच्या मालकीत बदल झाल्यापासून ट्विटरच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. आता आणखी एक नवा नियम आला आहे. हा नियम असा आहे ज्यामुळे तुमचं ट्विटर अकाऊंट बंदही होऊ शकतं. त्यामुळेच ट्विटर युजर्सने हा नियम समजून घेणं गरजेचं आहे. या नव्या नियमाचं नाव आहे डॉक्सिंग नियम. हा डॉक्सिंग नियम नेमका काय आहे? त्यानुसार ट्विटरवर कोणते निर्बंध आहेत? कोणत्या कृतींसाठी हा नियम लागू होतो आणि कोणत्या कृतीमुळे तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं? याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्सिंग म्हणजे काय?

डॉक्सिंग म्हणजे अशी कृती ज्यातून कोणाचीही त्याच्या परवानगीशिवाय खासगी माहिती सार्वजनिक केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक किंवा ओळख पटेल अशी माहिती प्रसारित केली, तर ती कृती डॉक्सिंग म्हणून ओळखली जाते.

डॉक्सिंगच्या नियमाची गरज काय?

डॉक्सिंगचे प्रकार अनेकदा बदला घेण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी केले जातात. डॉक्सिंगचा पीडित व्यक्तीवर गंभीर परिणाम होतो. त्रास देणे, पाठलाग करणे किंवा हिंसा करणे असा कोणताही प्रकार यात घडतो. काही प्रकरणांमध्ये शारीरिक इजा करणे किंवा खून करण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळेच ट्विटरने नव्या धोरणाप्रमाणे डॉक्सिंगचा नियम आणला आहे.

यानुसार, कोणत्याही युजर्सने इतर व्यक्तीची परवानगीशिवाय खासगी माहिती सार्वजनिक केली, तर त्या व्यक्तीचं ट्विटर अकाऊंट निलंबित केलं जाऊ शकतं किंवा कायमचं बंदही केलं जाऊ शकतं. युजर्सच्या खासगीपणाचं संरक्षण करण्यासाठीच डॉक्सिंगचा नियम लागू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे डॉक्सिंगचे प्रकार केवळ एकट्या व्यक्तीलाच नाही, तर समुहालाही धोकादायक ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक झाली, तर त्यामुळे इतर युजर्समध्ये असुरक्षितता तयार होईल. तसेच प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त व्हायला किंवा आपली खासगी माहिती शेअर करायला घाबरेल.

डॉक्सिंगचा प्रकार आढळला तर काय करावं?

डॉक्सिंगचे प्रकार केवळ अनैतिक नाहीत, तर बहुतांश सोशल मीडियाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर डॉक्सिंगचा प्रकार घडतो आहे असं लक्षात आल्यास रिपोर्ट करा. त्यामुळे सोशल मीडियाच्या सुरक्षा विभागाकडून त्यावर योग्य ती कारवाई होईल. यामुळे सोशल मीडिया सर्वांसाठी सुरक्षित राहण्यास मदत होईल.

हेही वाचा : “मी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊ का?”, एलॉन मस्कच्या पोलवर १ कोटी ७५ लाख युजर्सचं मतदान, म्हणाले…

डॉक्सिंग टाळण्यासाठी काय करावं?

सोशल मीडियावर माहितीची उत्सुकता असली आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचा लोभ होत असला तरी सर्वज खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. इतरांच्या खासगीपणाचा आदर करणे गरजेचं आहे. तसेच खासगी माहिती सार्वजनिक झाल्यास त्याचे काय विपरित परिणाम होऊ शकतात याचाही विचार करावा. या नियमाचं पालन केल्यास सोशल मीडिया सर्वांसाठीच सुरक्षित ठरेल.