– ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी किताबी लढतीचे आणखी एक पर्व नुकतेच पुण्यात पार पडले. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेचे हे ६५वे वर्ष होते. या स्पर्धेतील ही ५५वी किताबी लढत ठरली. अर्थात, हा किताब पटकाविणारा शिवराज राक्षे हा ४६वा किताब विजेता मल्ल ठरला. किताब विजेता मल्ल कायमच दुर्लक्षित राहिला. या किताबाचे महत्त्व नेमके काय आणि याचा मल्लाला भविष्यात किती फायदा होतो ते पाहू.

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला केव्हा सुरुवात झाली?

राज्यात कुस्तीची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. मामासाहेब मोहोळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापन केली. त्यानंतर राज्यातील मल्लांसाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून एक खुले व्यासपीठ निर्माण करून दिले. या स्पर्धेतील १०० किलो वरील वजन गट हा महाराष्ट्र केसरी गट म्हणून ओळखला जातो. माती आणि मॅटवर अशा दोन्ही प्रकारांत या गटाचा समावेश असून, यातील विजेत्या मल्लांमध्ये किताबाची लढत होते. या स्पर्धेला १९६१पासून सुरुवात झाली, तेव्हापासून राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशनच म्हणूनच ही स्पर्धा ओळखली जाते.

स्पर्धा आयोजनाचा अधिकार कोणाचा असतो?

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन म्हणूनच या स्पर्धेकडे बघितले जात असल्यामुळे स्पर्धा आयोजनाचा मान हा राज्य कुस्तीगीर परिषदेचाच असतो. १९६१ पासून २०२१-२२पर्यंत ही स्पर्धा राज्य कुस्तीगीर परिषदच आयोजित करत होती. या वेळी परिषदेतील अंतर्गत कलहामुळे स्पर्धेचे आयोजन भारतीय कुस्तीगीर संघटनेने नियुक्त केलेल्या हंगामी समितीने केले होते. त्यामुळे अजूनही या स्पर्धेच्या अधिकृत दर्जाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी; पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

‘महाराष्ट्र केसरी’ किताब विजेत्यास काय पारितोषिक मिळते?

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सुरुवातीला किताब विजेत्या मल्लाला रोख पारितोषिकच मिळत होते. स्पर्धेचे प्रणेते मामासाहेब मोहोळ यांचे १९८२ मध्ये निधन झाले. तेव्हा त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने विजेत्या मल्लाला चांदीची गदा पारितोषिक देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून किताब विजेत्यास रोख पारितोषिकाबरोबर दीड किलो चांदीची गदा देण्याची प्रथा आजही कायम आहे.

शिवराज कितवा महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल ठरला?

पुणे येथे झालेली ही ६५वी राज्य स्पर्धा होती. यामध्ये झालेली किताबी लढत ही ५५वी होती. यामध्ये विजेता ठरलेला शिवराज राक्षे हा ४६वा महाराष्ट्र केसरी ठरला. आतापर्यंत इतिहासात २०११ ते २०१६ या सहा वर्षांत नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी किताब मिळवला आहे. २०११ ते २०१३ नरसिंग, तर २०१४ ते २०१६ विजय विजेते ठरले. सलग तीन वेळा हा किताब पटकावणारे हे दोनच मल्ल आहेत. गणपतराव खेडकर, चंबा मुत्नाळ, दादू चौगले, लक्ष्मण वडार, चंद्रहार पाटील या पाच मल्लांनी दोन वेळा हा किताब पटकावला आहे.

हेही वाचा : अन्वयार्थ: खाशाबांच्या राज्यात..

‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व नेमके काय?

‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व आतापर्यंत एक किताब म्हणूनच होते. किताबी मल्ल आखाड्यातून बाहेर पडला की कायमच दुर्लक्षित राहिला आहे. कुस्तीला पूर्वी राजाश्रय होता, नंतरपासून मिळालेला लोकाश्रय आजही कायम आहे. पण, शासन दफ्तरी महाराष्ट्र केसरी कायमच दुर्लक्षित राहिला. स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांचाही राष्ट्रीय आणि राज्य सरकार उचित सन्मान करू शकले नाहीत. अशा वेळी राज्य विजेत्या मल्लांना कोण विचारणार? खाशाबा जाधव यांचा प्रत्येक सन्मान त्यांच्या मृत्यूनंतर झाला. खाशाबांना हयातीत अनेक मैदाने गाजवूनही कधी लोकाश्रयाशिवाय दुसरा शासकीय सन्मान मिळाला नाही. राज्य सरकारकडून या स्पर्धेतील किताबी विजेत्या मल्लासह अन्य वजन गटातील विजेत्या मल्लांनाही अनुदान दिले जायचे. सुरुवातीला काही वर्षे हे मानधन मिळाले. नंतर ते अधून मधून मिळू लागेल. गेली काही वर्षे तर ते बंदच झाले होते. त्यामुळेच पुरेशा मदती अभावी किताब विजेता मल्ल गुणवत्ता असूनही कुस्ती दंगलीतच अडकला गेला.

नव्या सरकारची मानधनातील वाढ किती महत्त्वाची?

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ झाल्याची घोषणा समारोपादिवशी केली जाईल असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाच्या दिवशी कारकीर्द सुरू असलेल्या आणि संपलेल्या मल्लांच्या मानधनात घसघशीत वाढ केली. मल्लांकडून या निर्णयाचे स्वागत झाले. विजेत्या मल्लास शासकीय सेवेत रुजू करण्याचाही शब्द देण्यात आला. ही सर्व वचने पाळण्यात सातत्य राहावे अशी अपेक्षा कुस्ती शौकिन आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या घोषणेने मल्लांचा उत्साह निश्चित वाढणार आहे.

हेही वाचा : कुस्तीगीर परिषदेतही राजकीय आखाडा

किताबी लढतीने अन्य वजन गटातील विजेत्यांकडे दुर्लक्ष होते का?

हा मुद्दा आजपर्यंत कुणीच विचारात घेतलेला नाही. पण, एकाच अधिवेशनात राज्य अजिंक्यपद आणि किताबी लढत खेळविली गेल्यामुळे निश्चितच किताबी लढतीचे आकर्षण राहते. साहजिकच अन्य वजनी गटातील मल्लांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य अजिंक्यपद स्पर्धाच, पण अन्य वजन गट आणि केसरी गट वेगवेगळ्या भरवल्या गेल्या, तर दोन्ही गटांतील विजेत्यांकडे समान लक्ष वेधले जाऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know what is importance of maharashtra kesari wrestling championship for players print exp pbs