– मंगल हनवते
मुंबईत अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करतानाच तेथील पर्यटनास चालना देण्यासाठी आता मुंबईत ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारले जाणार आहे. या अंतर्गत सुमारे १२० ते १५० मीटर व्यासाचा उंच पाळणा तयार करण्यात येणार असून त्यातून मुंबईचे विहंगम दृश्य पाहता येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात येणारा ‘मुंबई आय’ प्रकल्प नेमका काय आहे, उंच पाळणा कुठे उभा राहणार, याचा हा आढावा…
‘लंडन आय’ नेमके काय आहे?
इंग्लंडची राजधानी लंडन शहर हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या लंडन शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी थेम्स नदीच्या काठावर ‘लंडन आय’ नावाचा अजस्र पाळणा उभारण्यात आला आहे. १३५ मीटर व्यासाच्या या भल्यामोठ्या पाळण्यातून लंडनचे विहंगम दृश्य पाहता येते. १९९९ मध्ये हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुले झाले. जगभरातील सुमारे ३५ लाख पर्यटक ‘लंडन आय’ला दरवर्षी भेट देतात.
‘मुंबई आय’ची संकल्पना काय?
मुंबई शहराची ओळखही आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. ही ओळख आणखी बळकट करण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी लंडनच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्याची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई वसली आहे. या शहरात अनेक पर्यटनस्थळे असून नितांत सुंदर असा समुद्र किनारा मुंबईला लाभलेला आहे. मुंबईच्या पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी लंडनच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्प नेमका कसा आहे?
समुद्र किनारी १२० ते १५० मीटर व्यासाचा उंच पाळणा मुंबई आय प्रकल्पाअंतर्गत उभा करण्यात येणार आहे. काचेचे आच्छादन असलेल्या या उंच पाळण्यातून समुद्रासह मुंबईचे दृश्य पर्यटकांना डोळ्यात साठवता येईल. त्यासाठी २००० कोटींचा खर्च अपेक्षित असून पाळणा उभारण्यासह परिसराचा विकास करत तिथे आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे दोन टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जागेचा शोध घेत प्रकल्पाची सर्व दृष्टीने व्यवहार्यता तपासण्याचे काम केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाची प्रत्यक्ष उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या जाणार आहेत. मुंबई आयमधून मुंबईचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारण्यात येईल. भविष्यात मुंबई आय आणि इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जलवाहतुकीने जोडण्याचा प्रस्तावही एमएमआरडीएच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाची सद्य:स्थिती काय?
मुंबई आयची संकल्पना दोन-तीन वर्षांपूर्वीच पुढे आली आहे. त्यानुसार २०२०मध्ये नगर विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने या दृष्टीने तयारीस सुरुवात केली. २०२१ मध्ये प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पण त्यानंतर या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आता मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने यासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता जागेचा शोध घेऊन प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी आणि सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. ही प्रकिया आणि त्यानंतरची प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागणार आहे. त्यामुळे उंच पाळण्यातून मुंबई न्याहाळण्यासाठी मुंबईकरांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा : सुमारे दीड लाख गिरणी कामगार अद्यापही घराच्या प्रतीक्षेत; आतापर्यंत फक्त १५ हजार गिरणी कामगार लाभार्थी
वांद्रे रेक्लेमेशन येथे मुंबई आय?
मुंबई आयसाठी जागा निश्चित करण्यात आली नसल्याचे तसेच जागेचा शोध सल्लगार घेणार असल्याचे सांगितले जात असले तरी एमएमआरडीएचा कल वांद्रे रेक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या मालकीच्या जागेवर असल्याचे प्रस्तावातून दिसून येते. प्रस्तावानुसार वांद्रे रेक्लेमेशनची जागा यासाठी अधिक व्यवहार्य आहे. ही जागा उपलब्ध करून घेण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीमध्ये चर्चा सुरू आहे. जागा मिळावी यासाठी एमएमआरडीएने या पर्यटनस्थळातून मिळणाऱ्या महसुलात भागीदारी देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीसमोर ठेवला आहे. आता ही जागा मिळवण्यात एमएमआरडीएला यश आले आणि या जागेची व्यवहार्यता सिद्ध झाली तर तेथे मुंबई आय उभारले जाण्याची शक्यता आहे.