– संतोष प्रधान
कर्नाटकात गेले चार दिवस दोन महिला अधिकाऱ्यांमधील वाद चांगलाच रंगला आहे. या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये एक भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस.) तर दुसरी आहे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी. आय.ए.एस. व आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध असते. त्यातून अनेकदा या दोन सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये वादावादी वा संघर्ष झाल्याची उदाहरणे आहेत. कर्नाटकात भारतीय पोलीस सेवेतील डी. रुपा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहिणी सिंधुरी या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादामुळे कर्नाटक सरकारची कोंडी झाली. यातून मार्ग काढण्याकरिता रुपा आणि रोहिणी या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली. उभयतांची बदली करण्यात आली असली तरी नव्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी दोघींनाही नियुक्तीकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन महिला अधिकाऱ्यांमधील वाद काय आहे?
कर्नाटक राज्य हस्तकला विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका व आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी धर्मादाय विभागाच्या आयुक्त रोहिणी सिंधुरी यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप केले. रुपा यांनी या संदर्भात मुख्य सचिवांना पत्र पाठवून रोहिणी यांच्या गैरव्यवहारांची सारी माहिती दिली. यावर रोहिणी सिंधुरी यांनीही रुपा यांच्यावर आरोप केले. तसेच काही वादग्रस्त छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोपही रुपा यांनी केला. या दोन महिला अधिकाऱ्यांनी परस्परांवर केलेल्या आरोपांमुळे कर्नाटकमधील भाजप सरकारची चांगलीच कोंडी झाली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह उच्चपदस्थांनी या वादाबद्दल नाराजी व्यक्त केली.
डी. रुपा या अधिकारी नेहमीच वादग्रस्त का ठरल्या आहेत?
भारतीय पोलीस सेवेतील २०००च्या तुकडीतील कर्नाटक कॅडरच्या अधिकारी डी. रुपा या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. २३ वर्षांच्या सेवेत त्यांची अनेकदा बदली करण्यात आली होती. रुपा या २०१७ मध्ये देशभर प्रसिद्धीत आल्या होत्या. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शशिकला या बंगळुरूच्या पारापन्ना अंघरहा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांची तुरुंग प्रशासनाकडून उत्तम बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे रुपा यांनी उघड केले होते.
शशिकला यांच्यासाठी पाच कोठड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यासाठी विशेष स्वंयपाकी तसेच अन्य कर्मचारी तैनात करण्यात आल्याचा आरोपही रुपा यांनी केला होता. तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांनी शशिकला यांच्याकडून दोन कोटींची लाच घेतल्याचा आरोपही रुपा यांनी केला होता. या आरोपांनंतर सरकारने दखल घेण्याऐवजी रुपा यांची तुरुंग प्रशासन विभागातून बदली करण्यात आली होती.
हुबळीमधील इदगाह मैदान प्रकरणी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती तसेच कर्नाटकमधील माजी मंत्र्याला अटक करण्याची कारवाई रुपा यांनी केली होती. कर्नाटकमधील ८० पेक्षा राजकारण्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण त्यांनी काढून घेतले होते. तसेच माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दिमतीला देण्यात आलेली अतिरिक्त वाहने काढून घेतली होती. माजी पोलीस महासंचालकांनी रुपा यांच्या विरोधात मानहानीचा खटला गुदारला आहे.
अन्य कोणत्या महिला अधिकारी वादग्रस्त ठरल्या आहेत?
किरण बेदी या पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याने आपली छाप पाडली होती. बेदी यांनी भल्याभल्यांना सरळ केले होते. विशेष म्हणजे रुपा यांनी आय.ए.एस. अधिकाऱ्याचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यावर किरण बेदी यांनी ट्वीट करून रुपा यांचे अभिनंदन केले आहे. संजुक्ता पराशर (आसाम), सोनिया नारंग , डॉ. बी संध्या (केरळ), विमला मेहरा (दिल्ली) आदी महिला अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे छाप पाडली आहे.