मुलींचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क हा विषय कायमच वादात राहिला आहे. मुलीला संपत्तीमध्ये किती अधिकार द्यायचा याबद्दलही मतभेद असल्याचं दिसून येतं. काही जणांच्या मते मुलींचा संपत्तीवरचा हक्क मुलांपेक्षा कमी आहे, तर काहींच्या मते मुलींना कोणताही अधिकार नाही, तर काहींच्या मते मुलींनाही मुलांइतकाच हक्क दिला पाहिजे. अशा अनेक मतमतांतरांमुळे याबद्दलचा कायदा प्रकाशझोतात येऊ शकला नाही.
सध्या भारतात मुलींना वडिलांच्या संपत्तीत किती अधिकार आहे आणि मुलींना केव्हा वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही, याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी केलेल्या आहेत. आपल्या देशात संपत्तीच्या वाटपाबद्दल वेगवेगळे कायदे आहेत. हे कायदे सगळ्याच धर्मांच्या बाबतीत आहेत. या कायद्यांपैकी काही कायदे संसदेत तयार झाले आहेत. हिंदूंसाठी हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ आहे तर मुस्लिमांसाठी पर्सनल लॉ आणि अशाच पद्धतीचे कायदे ईसाई लोकांसाठीही आहेत. यासोबतच काही असे कायदेही आहेत जे सर्वधर्मींयांना लागू होतात, जसं की भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५. हा कायदा सर्व भारतीयांसाठी लागू केला जातो. न्यायालयही अनेकदा या कायद्याची मदत घेत असते.
धर्माप्रमाणे कायदे वेगळे…
भारतात संपत्ती दोन प्रकारची मानली जाते. एक जी स्वतः कमावलेली असते आणि एक म्हणजे जी वडिलोपार्जित, वंशपरंपरेने आलेली. वडिलांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलीला वडिलांच्या मृत्यूनंतरच वाटा मिळतो. हिंदू नागरिकांच्या बाबतीत हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू होतो तर मुस्लिमांच्या बाबतीत पर्सनल लॉ लागू होतो. हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ नुसार, मुलगा आणि मुलीला समान वाटा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीमध्ये जेवढा हक्क मुलाचा असतो, तेवढाच मुलीचा असतो. मुलगा असं म्हणू शकत नाही की आता मुलीचं लग्न झालं आहे, तर तिला त्याच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल. जर वडिलांनी संपत्ती कोणाच्याही नावे केली नसेल किंवा आपल्या मृत्यूपत्रात कोणताही विशेष उल्लेख केलेला नसेल, तर मुलगी आपल्या वाट्यासाठी दावा करू शकते.
कधी वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार राहत नाही?
मुलींनी जर स्वतःआपल्या हक्काचा त्याग केला तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये कोणताही हक्क मिळत नाही. वंशपरंपरेने मिळालेली संपत्ती किंवा वडिलांनी कमावलेली संपत्ती दोन्ही बाबतीत हे लागू होतं.
जर वडिलांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार करून आपली संपत्ती मुलाच्या नावे केली असेल तर अशा स्थितीमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार राहत नाही.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वडील वंशपरंपरेने मिळालेली संपत्ती मृत्यूपत्र लिहून मुलांच्या नावे करू शकत नाही. वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीमध्ये मुलीचाही मुलाइतकाच हक्क असतो.
याविषयीचे गैरसमज काय?
बऱ्याच लोकांना कायद्यातल्या या तरतुदींबद्दल विशेष माहिती नाही. त्यामुळे लग्नानंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहत नाही, असा समज काही जणांमध्ये असल्याचं आढळतं. वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न झालं, किंवा काही चुकीचं काम केलं असेल, तर अशा परिस्थितीतही मुलाचा आणि मुलीचाही संपत्तीवरचा हक्क रद्द होत नाही.