– अन्वय सावंत

भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत मायदेशासह परदेशातही यशस्वी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताने २०१३ सालानंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकलेली नसली, तरी त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजमध्ये मालिका किंवा कसोटी सामने जिंकले आहेत. भारताच्या या यशात वेगवान गोलंदाजांनी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांची विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यांना मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांनी तोलामोलाची साथ दिली आहे. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताने आता भविष्याच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली असून नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत याचाच प्रत्यय आला. या मालिकेत अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या युवा वेगवान गोलंदाजांवर भारताची भिस्त होती आणि त्यांनी चमकदार कामगिरी करत भारताला मालिका विजय मिळवून दिला.

शिवम मावीचे पदार्पणातच यश

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी अर्शदीप सिंग उपलब्ध नव्हता. त्यामुळे २४ वर्षीय वेगवान गोलंदाज शिवम मावीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. श्रीलंकेच्या डावातील दुसरे आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले षटक टाकताना मावीने सलामीवीर पथुम निसंकाचा त्रिफळा उडवला. मग त्याने धनंजय डिसिल्वा, वानिंदू हसरंगा आणि महीश थीकसाना यांनाही माघारी धाडले. मावीने आपल्या चार षटकांमध्ये केवळ २२ धावा देत चार गडी बाद केले. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना स्विंगचाही चांगला वापर केला. तसेच त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करण्याचीही संधी दिली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा मावी २०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच ‘आयपीएल’मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे. आगामी हंगामासाठी त्याला गुजरात टायटन्सने ६ कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

‘उमरान एक्स्प्रेस’ भारतासाठी निर्णायक ठरणार?

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने गेल्या दोन ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात सातत्याने स्थान देण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. ताशी १५० किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या उमरानची ‘आयपीएल’नंतर भारतीय संघात निवड झाली, पण त्याला सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने भविष्याच्या दृष्टीने २३ वर्षीय उमरानला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यास सुरुवात केली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत तीन सामन्यांत सर्वाधिक सात गडी बाद केले. तसेच उमरानचा वेगही भारतासाठी निर्णायक ठरला. त्याने सातत्याने १५२ ते १५५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. यंदा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असल्याने मधल्या षटकांत बळी मिळवण्यासाठी उमरानचा तेजतर्रार मारा भारतासाठी निर्णायक ठरू शकेल. त्यामुळे आगामी काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटसह एकदिवसीय क्रिकेटमध्येही उमरानवर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकेल.

दुखापत, निराशाजनक कामगिरीनंतर अर्शदीपची मुसंडी….

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले, पण युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची कामगिरी ही भारतासाठी एक सकारात्मक बाब होती. २३ वर्षीय अर्शदीपने सहा सामन्यांत भारताकडून सर्वाधिक १० बळी मिळवले होते. त्याने नव्या चेंडूने स्विंगचा अप्रतिम वापर केला, तर अखेरच्या षटकांत याॅर्करचा वापर करून फलंदाजांना चकवले. त्यानंतर त्याने न्यूझीलंड दौऱ्यातील एका ट्वेन्टी-२० सामन्यात चार गडी बाद केले. मात्र, दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला मुकावे लागले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केले, पण त्याच्यासाठी हा सामना विसरण्याजोगा ठरला. त्याने दोन षटकांतच ३७ धावा खर्ची केल्या आणि तब्बल पाच नो-बॉलही टाकले. भारताने हा सामना गमावला आणि अर्शदीपवर बरीच टीकाही झाली. मात्र, तिसऱ्या सामन्यात अर्शदीपने आपले महत्त्व सिद्ध करताना २० धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी काळात बुमरा आणि शमीसह अर्शदीप भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसू शकेल.

हेही वाचा : किंग कोहलीचे ‘विराट’ शतक आणि गोलंदाजांचा टिच्चून मारा! गुवाहाटीत टीम इंडियाचा लंकेवर ६७ धावांनी दणदणीत विजय

भारताकडे युवा वेगवान गोलंदाजांचे अन्य कोणते पर्याय?

भारताला गेल्या काही काळात बरेच प्रतिभावान युवा वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. यामध्ये मावी, मलिक आणि अर्शदीप यांच्यासह आवेश खान आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. तसेच ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात कुलदीप सेन, मोहसिन खान, मुकेश चौधरी, यश दयाल आणि वैभव अरोरा यांनीही अप्रतिम कामगिरी केली होती. कुलदीप सेनला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने दोन गडी बाद केले. त्यामुळे आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताकडे वेगवान गोलंदाजांचे बरेच सक्षम पर्याय उपलब्ध आहेत.