अमेरिकेने भारतीय अधिकाऱ्यावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनची हत्या करण्याचा कथित अयशस्वी कट केल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर अमेरिकेचं भारतावर बारीक लक्ष आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा घेतला जात आहे. अमेरिकेने न्यायालयात भारतीय नागरिक निखिल गुप्ता आणि अज्ञात भारतीय अधिकाऱ्यावर या कटात सहभागी झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. यानंतर काही दिवसातच आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक क्रिस्टोफर ए व्रे पुढील आठवड्यात भारताला भेट देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात एफबीआय संचालक क्रिस्टोफर यांच्या भारत भेटीची माहिती दिली. ते थिंक टँक कार्नेगी इंडिया आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेला भारताला समजून घेण्यात रस असल्याचंही नमूद केलं.

“अमेरिकेच्या सरकार आणि उद्योग क्षेत्रात मोठी जागरुकता आली आहे. तेथे सर्वांना भारत समजून घ्यायचं आहे,” अशी माहिती एरिक गार्सेटी यांनी दिली. तसेच अमेरिकेच्या उच्चाधिकाऱ्यांच्या भारत भेटींबद्दलही माहिती दिली. याबाबत ‘द प्रिंट’ने वृत्त दिलं. ते म्हणाले, “अमेरिकेच्या अर्थखात्याचे सचिव जेनेट येलेन यांनी या वर्षात चार वेळा भारताला भेट दिली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन तिसऱ्यांदा आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन दुसऱ्यांदा भारतात आले. आता एफबीआयचे संचालक पुढील आठवड्यात भारतात येत आहेत.”

एफबीआयचे संचालक भारतात कधी येणार?

एफबीआयचे संचालक व्रे ११ आणि १२ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये एफबीआय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. एफबीआय प्रमुख भारतात येण्याची ही १२ वर्षांमधील पहिलीच वेळ आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने खलिस्तानी दहशतवादी पन्नूनच्या हत्येच्या कथित कटावरून भारतीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी ही भेट होत आहे. यात कायद्याच्या अंमलबजावणीच्या विविध मुद्द्यांवर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे.

एफबीआय संचालकांचा भारतात येण्याचा हेतू काय?

एफबीायचे संचालक भारताची तपास संस्था एएनआयचे प्रमुख दिनकर गुप्ता यांची भेट घेणार आहेत. ते भारताच्या इतर गुप्तचर संस्था आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटतील. सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, एनआयए आणि इतर गुप्तचर संस्थांचे अधिकारी दुतावासातील एफबीआयच्या कायदेविषय अधिकाऱ्यांशी विविध प्रकरणांवर चर्चा करतात. मात्र, पहिल्यांदाच ते एफबीआय संचालकांसमोर प्रकरणाबाबत पुरावे सादर करतील.

या भेटीत खलिस्तानी दहशतवाद, जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी कारवाया आणि गँगस्टर नेक्सस या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे. या भेटीत भारतात दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या आणि ज्याच्या शिख फॉर जस्टिस संघटनेवर बंदी घालण्यात आली त्या खलिस्तानी दहशतवादी पन्नूनचा विषयही चर्चा होऊ शकते. एनआयए पन्नूनविरुद्ध सर्व खटले आणि पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची तोडफोड करणाऱ्या खलिस्तान समर्थकांचा मुद्दाही भारताकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

अमेरिकास्थित गुंड दरमनजोतसिंग काहलॉन हा आणखी एक गुन्हेगार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांना मारण्यासाठी त्याने शस्त्रे पुरवली होती, असे अहवालात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why fbi chief visiting india after us allegations of foiled plot to kill pannun pbs