– अमोल परांजपे
अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’मध्ये गेल्या १००हून अधिक वर्षांत दिसले नव्हते, असे चित्र बघायला मिळाले. अलीकडेच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला निसटते बहुमत मिळाल्यानंतर त्या पक्षाचा नेता सभापती होणार हे निश्चित होते. मात्र त्या पदासाठी इच्छुक असलेले केविन मॅकार्थी यांना बहुमत असूनही विजय सोपा गेला नाही. १५ मतदान फेऱ्यांनंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. आता चर्चा होते आहे ती मॅकार्थी यांचा पुढील मार्ग किती खडतर आहे याची…
केविन मॅकार्थी यांची राजकीय पार्श्वभूमी काय?
अमेरिकेची ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ असलेल्या रिपब्लिकन पक्षाकडून कॅलिफोर्नियामधून ते २००६ पासून ‘हाऊस’वर निवडून येत आहेत. सभागृहातील कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या मॅकार्थी यांनी आधी पक्षप्रतोद म्हणून, २०१४ ते २०१९ या काळात ‘हाऊस मेजॉरिटी लीडर’ (बहुमत असलेल्या पक्षाचे सभागृहातील नेते) आणि २०१९ पासून आतापर्यंत ‘हाऊस मायनॉरिटी लीडर’ म्हणून त्यांनी काम पाहिले.
निवडून येण्यासाठी मॅकार्थी यांना कष्ट का पडले?
दर दोन वर्षांनी ‘हाऊस’चे सर्व सदस्य निवडले जातात. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये सभापती निवडला जावा, अशी परंपरा आहे. या वेळीही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मॅकार्थी सहज विजयी होतील, असे वाटत असताना त्यांच्याच पक्षाच्या अतिउजव्या सदस्यांनी अडथळा आणला. मॅकार्थी यांना सभापतीपदासाठी आवश्यक असलेली २१६ मते मिळणार नाहीत, याची काळजी स्वपक्षीयांनीच घेतली. त्यामुळे तब्बल चार दिवस केवळ सभापती निवडण्यासाठी ‘हाऊस’ भरविले गेले. अखेर स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या मतदानाच्या १५व्या फेरीमध्ये मॅकार्थी यांना यश मिळाले. मात्र त्यासाठी त्यांनी अतिउजव्या स्वपक्षियांना अनेक आश्वासने द्यावी लागली आहेत.
मॅकार्थी यांची वाट अडविणारे ‘तालिबान २०’ कोण?
‘तालिबान २०’ हे अर्थातच अधिकृत नाव नाही. रिपब्लिकन पक्षातील अतिउजव्या १९ ते २१ सदस्यांचा एक गट आहे. हा गट स्वत:ला ‘हाऊस फ्रीडम कॉकस’ म्हणवतो. यामध्ये प्रामुख्याने टेक्सास, फ्लोरिडा आणि ॲरिझोना या राज्यांमधील सदस्यांचे प्राबल्य आहे. यातील अनेक जण हे २०२०मध्ये ट्रम्प यांना भरभरून मते देणाऱ्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे साहजिकच ते ट्रम्प यांचे निकटवर्ती मानले जातात. ‘हाऊस’च्या ताज्या निवडणुकीत यातील काही उमेदवारांना ट्रम्प यांनी स्वत: निवडले होते तर बहुतांश सदस्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. या गटाने मॅकार्थी यांची वाट अडवून वाटाघाटी करायला त्यांना भाग पाडले.
मॅकार्थी यांचा विजय कोणत्या अटींवर शक्य झाला?
सभागृह कशा पद्धतीने चालविले जाणार आहे, याबाबत अनेक आश्वासने मॅकार्थी यांनी अतिउजव्या रिपब्लिकन सदस्यांना दिली आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी, काँग्रेस (अमेरिकेचे कायदेमंडळ) सदस्यांच्या निवडून येण्यावर मर्यादा, सीमा सुरक्षा याबाबत अतिउजव्या गटाची काही विधेयके चर्चेला घेणे, सुरक्षित जागांवर रिपब्लिकन प्रायमरीजमध्ये (उमेदवारीसाठी पक्षांतर्गत निवडणुका) मॅकार्थी समर्थकांनी न लढणे, खर्चात कपात करून देशाच्या कर्जमर्यादेवरील निर्बंध वाढविणे अशा अनेक अटी मॅकार्थी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मान्य केल्या आहेत. मात्र यातील एक अट सर्वात धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मॅकार्थी यांची ताकद घटविणारी अट कोणती?
‘सभापतिपदाची खुर्ची रिकामी करण्यासाठी कोणीही सदस्य विधेयक मांडू शकतो,’ या अटीलाही मॅकार्थी यांनी मान्यता दिली आहे. साधारणत: सभापतीला खुर्चीवरून खाली खेचायचे असेल तर त्याच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा लागतो. आता तसे होणार नाही. काँग्रेसचा सदस्य असलेला कुणीही तसा प्रस्ताव ठेवू शकतो आणि त्यावर चर्चा, मतदान आदी घ्यावे लागू शकते. रिपब्लिकन पक्षातील मध्यममार्गी या अटीमुळे नाराज आहेत. यामुळे मॅकार्थी यांच्यावर अतिउजव्या गटांचा कायम दबाव राहील, अशी रास्त भीती त्यांना वाटते आहे.
निवडणुकीचा रिपब्लिकन पक्षावर काय परिणाम होईल?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षातील दुही अमेरिकन जनतेसमोर आली आहे. येत्या दोन वर्षांत होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत ही दरी आणखी रुंद होत जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२४च्या निवडणुकीत पुन्हा उतरण्याची तयारी करीत आहेत. काँग्रेसमध्ये मॅकार्थी यांना वेठीस धरणारे अनेक जण हे त्यांचे समर्थक मानले जातात. यानिमित्ताने ट्रम्प यांनी आपली ताकद दाखवून दिली असताना आगामी काळात ट्रम्प यांना रोखणे मध्यममार्गी रिपब्लिकन नेत्यांना कठीण जाऊ शकते.
ट्रम्प यांच्याबाबत मॅकार्थींचे धोरण काय?
ट्रम्प आणि मॅकार्थी यांचे संबंध नेमके कसे आहेत, हे स्पष्ट सांगणे कठीण आहे. २०१६ मध्ये मॅॅकार्थी यांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षपद प्रयत्नांना पाठिंबा दिला. ६ जानेवारीच्या ‘कॅपिटॉल दंगल’ घडण्यापूर्वी ते जो बायडेन यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र दंगलीनंतर त्यांनी या घटनेला ट्रम्प जबाबदार असल्याची भूमिका घेतली. दंगल घडत असताना मायनॉरिटी लीडर या नात्याने त्यांनी ट्रम्प यांना साद घातली होती. मात्र तत्कालीन अध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांनी राष्ट्रीय पोलीस पाठवण्यास नकार दिला होता.
हेही वाचा : विश्लेषण: अमेरिकेत आता फार्मसीच्या दुकानात मिळणार गर्भपाताची गोळी; गर्भपाताचा मुद्दा तिथे का गाजतोय?
विजयानंतर मॅकार्थी यांची वाटचाल अवघड आहे का?
याचे उत्तर लगेच मिळणे कठीण आहे. मात्र अनेक ‘जाचक’ अटी मान्य करून मॅकार्थी यांनी आपली खुर्ची थोडी कमकुवत केली आहे, हे नक्की. आणखी दोन वर्षांनी ‘हाऊस’ची निवडणूक ही अध्यक्षपदासोबत होईल. तोपर्यंत जो बायडेन प्रशासनाची कनिष्ठ सभागृहात जास्तीत जास्त कोंडी करण्याची रणनीती रिपब्लिकनांनी आतापासून आखली आहे. त्यातही आता अतिउजव्यांचे हात अधिक बळकट झाल्याने मॅकार्थींच्या खांद्यावर बंदूक ठेवून बायडेन यांना लक्ष्य करणे ट्रम्प समर्थकांना शक्य होणार असल्याचे मानले जाते.