– अन्वय सावंत

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशांनंतर गेल्या वर्षी रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला होता. या युद्धामध्ये युक्रेनची मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली. त्यामुळे रशिया आणि त्यांना युक्रेनवरील हल्ल्यात मदत करणाऱ्या बेलारूसवर युरोप व जगभरात विविध निर्बंध घालण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, रशियन बुद्धिबळ महासंघ युरोप सोडून आता आशियाई संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत आहे. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास ३५ हजारांहून अधिक (२०० ग्रँडमास्टरचा समावेश) रशियन बुद्धिबळपटूंना आशियातील विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. मात्र, आशियाबाहेर पडताना रशियन बुद्धिबळ संघटनेने आशियाचीच का निवड केली आणि याचा त्यांना कसा फायदा होऊ शकेल, याचा आढावा.

formation of the earth
भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
loksatta analysis 9 sports dropped from glasgow 2026 commonwealth games
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून प्रमुख खेळांना वगळण्याचा निर्णय वादग्रस्त का? भारताच्या पदक आकाक्षांना जबर तडाखा?
NATO's Response to the CRINK
CRINK:’क्रिंक’ हुकूमशाहाचा नवा अवतार; नाटो विरुद्ध क्रिंक जागतिक राजकारण कोणते वळण घेणार?
Bilateral meeting between PM Modi-Xi Jinping
पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे शी जिनपिंग यांच्यात आज चर्चा; रशियातील बैठकीकडे जगाचे लक्ष
nine game drops from commonwealth games
हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजीवर फुली; खर्चात कपात करण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचा निर्णय
bricks in russia narendra modi
BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?

रशियातील क्रीडा संघटना युरोप सोडण्याचा का विचार करत आहेत?

गेल्या फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर हल्ले केले. त्यानंतर रशियाचे युरोपातील बहुतांश देशांशी संबंध बिघडले. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, रशियातील क्रीडा संघटनांना विशेषत: युरोपातील संघटनांकडून विविध निर्बंधांचा सामना करावा लागतो आहे. रशियाच्या खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून वंचित राहावे लागते आहे. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धांना आता लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, निर्बंधांमुळे रशियन खेळाडूंना या पात्रता स्पर्धांना मुकावे लागू शकेल. परिणामी त्यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे रशियातील क्रीडा संघटना आता युरोप सोडून आशियाकडे वळण्याचा विचार करत आहेत. आशिया ऑलिम्पिक परिषदेने (ओसीए) रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना आपल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळण्याची परवानगी असेल. त्यामुळे त्यांना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. रशियन बुद्धिबळ महासंघावर सध्या युरोपीय संघटनेने बंदी घातली आहे. त्यामुळे रशियन खेळाडूंना महत्त्वाच्या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

आशियाकडेच कल का?

केवळ ‘संरक्षणात्मक उपाय’ म्हणून रशियाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूर ठेवण्यात येत असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) डिसेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पिक परिषदेत म्हटले होते. काही देश रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देण्यास तयार नसल्याने आम्ही त्यांना स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखत असल्याचेही ‘आयओसी’ने सांगितले होते. तसेच काही स्पर्धांमध्ये या खेळाडूंना ‘तटस्थ’ म्हणून खेळण्याचीही परवानगी देण्यात आली. या ऑलिम्पिक परिषदेतच ‘ओसीए’चे अध्यक्ष रणधीर सिंग यांनी हे ‘संरक्षणात्मक उपाय’ आशियात लागू होत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर ‘ओसीए’ने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना आशियात खेळण्याचे आमंत्रणही दिले.

रशियन खेळाडू आशियात खेळल्यास काय परिणाम होणार?

रशियाचे खेळाडू बहुतांश क्रीडा प्रकारांत जागतिक स्तरावर चमकताना दिसतात. ऑलिम्पिकमध्येही रशियाची कामगिरी उल्लेखनीय असते. त्यामुळे रशियाच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केल्यास या स्पर्धांचा दर्जा नक्कीच वाढेल. विशेषत: रशियामध्ये दर्जेदार बुद्धिबळपटूंची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे रशियन बुद्धिबळपटूंच्या समावेशामुळे आशियातील अन्य देशांच्या बुद्धिबळपटूंना आपला खेळ उंचावण्याची प्रेरणा मिळेल. रशिया आणि बेलारूसचे जवळपास ५०० खेळाडू या वर्षी सप्टेंबरमध्ये चीन येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना पदकांची कमाई करता येणार नाही. तसेच आधीपासून आशियाई संघटनेचा भाग असलेल्या देशांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या स्थानांना (कोटा) धक्का न लागता, रशिया व बेलारूसच्या खेळाडूंना ऑलिम्पिकची पात्रता कशी मिळू शकेल, याबाबत ‘आयओसी’ विचार करत आहे.

आशियातून विरोध होतो आहे का?

आतापर्यंत रशियाच्या प्रयत्नांना आशियातून विरोध झालेला नाही. दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक समितीने रशियन खेळाडूंना विरोध दर्शवला नसला, तरी आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून अधिक स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या चीननेही रशियन खेळाडूंना आशियात खेळू देण्याच्या योजनेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, रशियाने ‘युएफा’ सोडून आशियाई फुटबॉल संघटनेचा भाग बनण्याचा प्रयत्न केल्यास, त्याला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. आशियातून मर्यादित संघांनाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी मिळते. त्यामुळे रशियन संघाने आशियात खेळण्यास सुरुवात केल्यास अन्य एका संघाचे विश्वचषकातील स्थान धोक्यात येईल.

हेही वाचा : विश्लेषण: पुतिन यांच्या ‘खासगी लष्करा’वर अमेरिकेची नजर का? काय आहे ‘वॅग्नर ग्रुप’?

यापूर्वी एखाद्या देशाने दुसऱ्या खंडात खेळण्याचे उदाहरण आहे का?

ऑस्ट्रेलियाने ओशेनिया सोडून आशियाई फुटबॉल संघटनेच्या स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली. याला आता जवळपास दोन दशके झाली आहेत. तसेच आशियाई ऑलिम्पिक परिषदेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना २०१७ च्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, त्यांना पदके देण्यात आली नव्हती. या दोन देशांचे खेळाडू गेल्या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळणार होते. परंतु, करोनामुळे या स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आल्याने त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.