कोल्हापूरचा चित्रपट निर्मिती इतिहास काय?

कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अनेक अजरामर चित्रपटांची निर्मिती येथे झाली. त्यासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी जयप्रभा स्टुडिओचा मोठा आधार घेतला. पुढे शालिनी सिनेस्टोन हा आणखी एक स्टुडिओ आकाराला आला. कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीत भर पडू लागली तसे राज्य शासनातर्फे चित्रनगरी उभारण्यात आली. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अ. भा. चित्रपट महामंडळाचे मुख्यालय याच नगरीत सुरू झाले. त्यामुळे कोल्हापूर हे जसे चित्रकला, शिल्पकला, संगीत, नाट्य, क्रीडा या क्षेत्रांप्रमाणेच चित्रपटांतही आघाडीवर होते.

जयप्रभा स्टुडिओ आता कोणाचा?

चित्रपटसृष्टीला वाहून घेतलेल्या भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूर दरबारकडून हा स्टुडिओ खरेदी केला होता. पूर्वी त्याचे नाव कोल्हापूर सिनेस्टोन असे होते. नंतर भालजींनी आपल्या दोन्ही मुलांच्या नावांमधून जयप्रभा असे नामकरण केले. या स्टुडिओमध्ये अनेक उत्तम चित्रपट तयार करण्यात आले. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या मालकीचा झाला. चित्रपट निर्मिती होत नसूनही त्यांनी स्टुडिओचे जतन केले. स्टुडिओची जागा विक्रीस काढण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी घेतल्यानंतर जनक्षोभाला सामोरे जावे लागले. पुढे काही मंडळींनी हा स्टुडिओ खरेदी केला. नंतर शासनाने तो चालवण्याचा निर्णय घेतला.

‘जयप्रभा’ला निधी मिळेल?

हल्ली जयप्रभा स्टुडिओमध्ये तुरळक प्रमाणात माहितीपट, चित्रपट याची निर्मिती होत आहे. याला अधिक गती यायची असेल तर निधी मिळावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्यावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रु.पर्यंत निधीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना कोल्हापूर महापालिका आयुक्तांना केली आहे. या स्टुडिओसाठी आणखी १० कोटी रुपये मागणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. सध्या येथे चित्रीकरण होत असले तरी प्रसाधनगृहापासून अनेक गैरसोयी आहेत. शासन निधी मिळाला तर चित्रीकरणाला गती येईल, असे मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे म्हणणे आहे.

शालिनी सिनेस्टोन का धुमसत आहे?

रंकाळा तलावालगत असलेल्या ‘शालिनी सिनेस्टोन’च्या जागेवर पूर्वीपासूनच अनेकांचा डोळा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००५ मध्ये ही जागा कायमस्वरूपी स्टुडिओसाठी राहील, असे पत्राद्वारे कळवले होते. सन २०१८ मध्ये शालिनी सिनेस्टोनच्या ४८ एकर जागेपैकी साडेसात एकर जागा चित्रीकरणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय झाला होता. तरीही भूखंड बळकावण्याचे प्रयत्न सुरू राहिल्याने आता पुन्हा आंदोलने होत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

स्टुडिओ वाचले; पुढे काय?

जयप्रभा, शालिनी हे स्टुडिओ चित्रीकरणासाठी वापरण्याचा निर्णय शासकीय पातळीवर झालाच तर पुढे काय होणार, हा प्रश्न उरतो. केवळ चित्रीकरणापुरते मर्यादित काम या स्टुडिओमध्ये होण्यापेक्षा कोल्हापूरची चित्रपट परंपरा जपणारे संग्रहालय होण्याची गरज आहे. पुणे येथील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालया’चे उपकेंद्र येथे सुरू करता येईल. मराठी चित्रपटासाठी छोटेखानी चित्रपटगृह बांधता येईल, त्यासाठी शासनाने इच्छाशक्ती दाखवून वेळेवर निधी उपलब्ध केला पाहिजे, असे चित्रपट अभ्यासक उदय कुलकर्णी सांगतात.

चित्रनगरीचे भवितव्य काय?

कोल्हापूरच्या पूर्वेला माळरानावर चित्रनगरी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक वर्षे या चित्रनगरीत पाटलाचा चौसोपी वाडा, छोटेसे कार्यालय इतक्याशा जागेतच चित्रीकरण करण्यावाचून पर्याय नव्हता. परिणामी नव्या सहस्राकात येथेही चित्रपट निर्मिती मंदावली. अलीकडे चित्रनगरी कात टाकताना दिसतेे. रेल्वे स्टेशन चौक, चौसोपी वाडा, तीन मजली चाळ, मंदिर अशा वास्तू आकाराला आल्या आहेत. दोन भव्य वातानुकूलित चित्रीकरण दालने तयार होत आहेत. काही प्रमाणात मालिका, चित्रपट याचेही चित्रीकरण होत आहे. मुंबईत केंद्रित असलेला मालिका उद्याोग कोल्हापुरात यायचा तर परिपूर्ण सुविधा आवश्यक आहेत. अशातच मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकपदाची मुदत संपल्याने ते केवळ नामधारी उरले आहे. कोल्हापूरसाठी निव्वळ सुशोभीकरण नको, चित्रपट निर्मितीला गती देण्यासारखे मूलगामी काम हवे, अशी चित्रकर्मींची अपेक्षा आहे.
dayanand.lipare@expressindia.com