कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार झाला. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुरू असून कोलकाता उच्च न्यायालयाने प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. आरोपी रॉय यंत्रणेच्या ताब्यात आहे. शुक्रवारी पहाटे ३ ते ५ या वेळेत रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण, पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय? कोलकाता प्रकरणात या चाचणीची गरज का पडली? याविषयी जाणून घेऊ.
पॉलिग्राफ चाचणी
पॉलिग्राफ चाचणीला ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. एखादा आरोपी खरं बोलत आहे की खोटं हे त्याच्या शारीरिक क्रियांमधून तपासले जाते, त्यालाच पॉलिग्राफ चाचणी म्हणतात. हे शारीरिक बदल तांत्रिक उपकरणांद्वारे तपासले जातात. जेव्हा एखादा आरोपी प्रश्नांची उत्तरे देतो, तेव्हा पॉलिग्राफ मशीन हृदयाची गती, रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांसह अनेक शारीरिक बदलांची नोंद करतात. त्यानंतर डेटाच्या आधारे, व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे निर्धारित केले जाते. ‘ब्रिटानिका’च्या मते, १९२४ पासून पोलिस तपासात या चाचणीचा वापर केला जात आहे. परंतु, या चाचणीचे परिणाम नेहमीच न्यायिकदृष्ट्या स्वीकार्य नसतात.
हेही वाचा : Kolkata Doctor Rape and Murder : भारतातील डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज का आहे?
चाचणीची प्रक्रिया
‘HowStuffWorks’च्या अहवालानुसार पॉलिग्राफ चाचणीत व्यक्तीच्या शरीराशी चार ते सहा सेन्सर जोडले जातात. पॉलिग्राफ उपकरणात या सेन्सरच्या हालचाली नोंदवल्या जातात. कार्डिओ कफ आणि काही संवेदनशील उपकरणे स्क्रीनवर आरोपीची प्रत्येक क्रिया दर्शवतात. सामान्यतः सेन्सर पुढील सर्व हालचालींची नोंद करतात.
-व्यक्तीचा श्वासोच्छ्वासाचा दर
-व्यक्तीच्या नाडीचा दर
-व्यक्तीचा रक्तदाब
-एखाद्या व्यक्तीचा घाम
-पॉलिग्राफ कधीकधी हात आणि पायांच्या हालचालीदेखील रेकॉर्ड करते.
‘न्यूज १८’नुसार पॉलिग्राफ चाचणी सुरू होण्यापूर्वी पॉलिग्राफ परीक्षक एक वातावरण तयार करण्यासाठी तीन ते चार साधारण प्रश्न विचारतो, जसे की आरोपीचे नाव. त्यानंतर पॉलिग्राफ परीक्षकाद्वारे खरे प्रश्न विचारले जातात. संपूर्ण प्रश्नोत्तरादरम्यान, झालेल्या प्रत्येक शारीरिक हालचालींची कागदांवर नोंद केली जाते.
नियम काय सांगतात?
२०१० च्या सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य आणि एनआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की, आरोपीच्या संमतीशिवाय पॉलिग्राफ चाचणी घेऊ नये. चाचणीच्या मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर परिणामांबद्दल पोलिस आणि वकिलाद्वारे माहिती देणे बंधनकारक आहे. डीके बासू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले की, नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी ही क्रूर आणि अमानुष आहे. तसेच या चाचणीद्वारे गोपनियतेच्या अधिकारांचे उल्लंघनही होऊ शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते. चाचण्यांचे अहवाल हे कबुलीजबाब म्हणून वापरता येत नसले तरी या प्रकारच्या ऐच्छिक चाचणीतून मिळालेला कोणताही डेटा किंवा माहिती पुराव्यात स्वीकारली जाऊ शकते. १८७१ चा भारतीय पुरावा कायदा ग्राह्य पुरावा म्हणून चाचणी परिणामांचा स्वीकार करत नाही.
ही चाचणी अचूक असते का?
पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी या दोन्ही चाचण्या वादग्रस्त आहेत आणि वैज्ञानिकदृष्टीने या दोन्ही चाचण्या १०० टक्के अचूक परिणाम देऊ शकतात, हे सिद्ध झालेले नाही. संशयितांकडून सत्य जाणून घेण्याच्या दृष्टीने या चाचण्यांकडे छळ किंवा ‘थर्ड डिग्री’ म्हणून पाहिले गेले आहे. परंतु, अलीकडे तपास यंत्रणांनी त्यांच्या कामात या चाचण्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ‘HowStuffWorks’नुसार पॉलिग्राफ चाचणीची अंदाजे अचूकता ८७ टक्के आहे.
कोलकाता प्रकरणात या चाचणीची गरज का पडली?
आरोपी तपासात खरं बोलतोय की खोटे हे तपासण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी खूप उपयुक्त ठरू शकते. संजय रॉयचे दावे आणि आढळलेले पुरावे सुसंगत आहेत की नाही याची पुष्टी करण्यासाठी चाचणीचा वापर केला जाऊ शकतो, असे ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ने स्पष्ट केले. आरोपीने कुणाला वाचवण्यासाठी गुन्ह्याची कबुली दिली आहे का? हेदेखील या चाचणीतून समोर येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात या चाचणीमुळे अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
संजय रॉय आहे कोण?
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर ३६ तासांच्या शिफ्टमध्ये काम केल्यानंतर झोपण्यासाठी एका सेमिनार रूममध्ये गेली होती. रुग्णालयात विश्रांतीसाठी कोणतीही रूम नाही. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याच ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला; ज्यावर अनेक जखमा होत्या. प्राथमिक संशयित संजय रॉय हा कोलकाता पोलिसांत नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. त्याला आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पोलिस चौकीत तैनात करण्यात आले होते. एनडीटीव्हीच्या मते, ज्या इमारतीत डॉक्टरचा खून झालेला आढळून आला होता, त्या इमारतीत तो प्रवेश करताना दाखविणारा सीसीटीव्ही फुटेज त्याच्या अटकेचा आधार होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडितेच्या मृतदेहाशेजारी एक ब्लूटूथ हेडसेट आढळला, तो त्याच्या फोनशी जोडला गेल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : ‘या’ राज्यात ६९ हजार सहायक शिक्षकांची नव्याने भरती? नेमके प्रकरण काय?
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर रॉयने गुन्ह्याची कबुली दिली. रिपोर्ट्सनुसार, “तुम्हाला हवे असल्यास मला फाशी द्या,” असे त्याने पोलिसांना सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रॉयने किमान चार वेळा लग्न केले होते. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर काही वर्षांमध्ये चांगले संबंधही निर्माण केले आहेत. त्याची कोलकाता पोलिस कल्याण मंडळात बदली करण्यात आली आणि आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पोलिस चौकीत त्याची नियुक्ती करण्यात आली होती.