Kumbh Mela 2025: कुंभमेळा भारताच्या सांस्कृतिक प्रतिकांपैकी एक आहे. येत्या १३ जानेवारीपासून हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक असलेला महाकुंभमेळा हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी सुरू होणार आहे. श्रद्धा, पुराणकथा, ज्योतिषशास्त्र आणि सामाजिक प्रवाहांनी घडवलेला हा उत्सव जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो. या उत्सवाचा समावेश युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे. महाकुंभाच्या पर्वात पवित्र जलात स्नान केल्याने पापक्षालन होतं आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी भाविक तसेच परदेशातून लाखो पर्यटक हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या चार शहरांमध्ये होणाऱ्या या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात.

‘शाश्वत’ उत्सवाचा आधुनिक इतिहास

इतिहासकारांनी कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली या बद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र कालातीत चालत आलेला हा उत्सव भक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील प्रा. कामा मॅक्लीन यांनी त्यांच्या ‘Making the Colonial State Work for You: The Modern Beginnings of the Ancient Kumbh Mela in Allahabad’ (Journal of Asian Studies) (२०१३) या लेखात नमूद केलं आहे की, कुंभमेळा हा प्राचीन धार्मिक उत्सव आहे. त्याच्या ‘कालातीत’ मुळांचा उगम ‘पुरातन काळातील’ आहे, असे मानले जाते. कुंभमेळ्याचे सध्याचे स्वरूप गेल्या काही शतकांमध्ये आकारास आल्याचे मॅक्लीन आणि इतर काही संशोधक मानतात. अभ्यासकांचे हे मत या उत्सवाचा संबंध प्राचीन काळापासून प्रचलित असल्याच्या लोकमान्यतेच्या विरुद्ध आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

कुंभमेळ्याच्या मिथकाची व्युत्पत्ती

अमेरिकेतील कार्थेज कॉलेजमधील हिंदू तीर्थयात्रा विषयातील तज्ज्ञ प्रा. जेम्स लोचटेफेल्ड यांनी चार कुंभमेळ्यांना आधार देणाऱ्या चार्टर मिथकाबद्दल लिहिलं आहे. कुंभमेळ्याचा संबंध प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू कथेशी-समुद्रमंथनाशी जोडला गेला आहे. त्यांच्या ‘The Construction of the Kumbha Mela’ (South Asian Popular Culture, Vol. 2 Issue 2, 2004) या लेखात ते म्हणतात की, समुद्रमंथन प्रकरणाचं वर्णन अनेक पुराणांमध्ये, रामायणात आणि महाभारतात आढळतं. या कथेचा पुढील भाग कुंभमेळ्याच्या उत्पत्तीचं स्पष्टीकरण देतो. परंतु, तो भाग प्राचीन ग्रंथांमध्ये आढळत नाही. या जोडल्या गेलेल्या कथाभागात पवित्र कुंभ (कलश) देवांना कसा सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर देवांनी अवकाशातून १२ दिवस केलेला प्रवास, या प्रवासादरम्यान अमृताचे चार थेंब चार ठिकाणी कसे पडले याचं वर्णन आहे. या कथाभागाच्या प्राचीन ग्रंथांमधील अनुपस्थितीवरून कुंभमेळा हा या ग्रंथांच्या निर्मितीच्या काळात महत्त्वाचा उत्सव नव्हता असे मत लोचटेफेल्ड मांडतात. कालांतराने कुंभमेळा लोकप्रिय झाल्यावर या उत्सवाला पौराणिक मान्यता देण्यासाठी एक ‘चार्टर’ आवश्यक होतं. तेच काम कथेचा नंतरचा भाग करतो. हा भाग प्रसिद्ध कूर्म अवताराच्या कथेशी जोडला गेला आहे. अलाहाबाद विद्यापीठाचे प्रा. डी. पी. दुबे यांनीही या गृहितकाचे समर्थन केले आहे. कुंभमेळ्याशी संबंधित जोडलेली मिथकं आणि बरीचशी माहिती तोंडी परंपरा आणि ऐकीव माहितीवर आधारित आहे, असे मत प्रा. डी. पी. दुबे यांनी त्यांच्या सहपीडियावरील एका शोधनिबंधात व्यक्त केलं आहे. तर मॅक्लीन असं लिहितात की, धन्वंतरी, दुर्वास आणि गरुड किंवा इंद्राशी संबंधित जी विविध कथानकं कुंभमेळ्याच्या प्रारंभाविषयी सांगितली जातात ती तुलनेने अलीकडची आहेत.

A pot (kumbha) containing Amrita was one of the creative product of the Samudra Manthana legend in ancient Hindu texts.

कुंभमेळा कधी सुरू झाला असावा?

प्रा. दुबे यांच्या मते कुंभ परंपरेचा संघटित स्वरूपात उगम हरिद्वारमध्ये १२ व्या शतकाच्या सुमारास झाला असावा. ते या परंपरेला काही संशोधकांनी उल्लेख केलेल्या ‘गंगाईजेशन’ या संकल्पनेशी जोडतात. ही संकल्पना उत्तर भारतातील गंगा नदीला सन्मान देणाऱ्या संस्कृतीशी संबंधित आहे. या संकल्पनेचा उगम गुप्त साम्राज्याच्या (४ थ्या-६व्या शतकांदरम्यान) काळात झाला होता. लोचटेफेल्ड यांच्या मते, ‘कुंभमेळा’ या शब्दाचा पहिला उल्लेख ‘खुलासत-उत-तवारीख’ या १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातील पर्शियन गॅझेटमध्ये आढळतो. खुलासत-उत-तवारीखची रचना सुजान राय याने मुघल सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीत केली होती. हा ग्रंथ साम्राज्याच्या विविध प्रदेशांचा सामान्य आढावा देतो आणि हरिद्वारमधील उत्सवाबद्दल माहिती देतो. या ग्रंथात गंगा नदीला तिच्या उगमापासून ते अंतापर्यंत पूजलं पाहिजे. हरिद्वार हे तिच्या तीरावरील सर्व तीर्थस्थानांपैकी सर्वात मोठं पवित्र स्थान आहे. प्रत्येक वर्षी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी (त्या दिवसाला बैसाखी म्हणतात) चारही दिशांनी लोक येथे एकत्र येतात, असे वर्णन केले आहे. “विशेषतः ज्या वर्षी गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो (हे दर १२ वर्षांनी घडतं) तेव्हा दूरवरच्या ठिकाणांहून प्रचंड संख्येने लोक इथे एकत्र येतात. या ठिकाणी स्नान करणं, दानधर्म करणं तसेच डोक्यावरचे व दाढीचे केस काढणं हे पुण्यकर्म मानलं जातं. या ठिकाणी मृतांच्या अस्थी गंगेत विसर्जन करणं हा त्यांच्या मुक्तीचा मार्ग समजला जातो” (लोचटेफेल्ड यांनी सर जदुनाथ सरकार यांच्या १९०१ च्या ‘The India of Aurangzib’ या ग्रंथातील उद्धरण दिलं आहे).

सिंहस्थ मेळा

आणखी एका पर्शियन गॅझेट राय चतर मन कायथ लिखित ‘चहार गुलशन’ (१७५९) मध्ये या भव्य उत्सवाचा उल्लेख आढळतो. “बैसाख महिन्यात हरिद्वारमध्ये मोठी गर्दी होते. जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो. याला कुंभमेळा म्हणतात. लाखो सामान्य लोक, फकीर आणि संन्यासी येथे एकत्र येतात.” लोचटेफेल्ड यांनी स्पष्ट केलं आहे की, या दोन्ही ग्रंथांमध्ये अशा इतर उत्सवांचा स्पष्ट उल्लेख आहे. हेच उत्सव आता कुंभमेळ्याचा भाग मानले जातात. सध्याच्या नाशिकच्या सोहळ्याचा उल्लेख ‘सिंहस्थ मेळा’ म्हणून आणि प्रयागातील सोहळ्याचा उल्लेख ‘माघ मेळा’ म्हणून केला जातो. हे शब्द आजही वापरात आहेत. प्रयागमध्ये वार्षिक माघ मेळा दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं रूप घेतो आणि नाशिकमध्ये सिंहस्थ हे अजूनही या भव्य उत्सवासाठी वापरले जाणारे पर्यायी नाव आहे. मॅक्लीन देखील असा युक्तिवाद करतात की, १९ व्या शतकाच्या मध्यावर प्रयागच्या माघ मेळ्याला पुजार्‍यांनी ‘कुंभमेळा’ असं नाव दिलं. त्या लिहितात, “मी पाहिलेल्या १८६० च्या आधीच्या कोणत्याही सरकारी नोंदींमध्ये प्रयागच्या मेळ्यांशी संबंधित ‘कुंभ’ हा शब्द कोणत्याही रूपात उल्लेखलेला नाही. तसेच, या नोंदींमध्ये प्रयागच्या मेळ्याला दर १२ वर्षांनी कोणतंही विशेष महत्त्व असतं असं कधीही नमूद केलेलं नाही.” उज्जैनमध्ये हा उत्सव १७४० च्या सुमारास राजेशाही पुढाकारातून सुरू झाल्याचं मानलं जातं. १९९२ च्या उज्जैन मेळ्यासाठी प्रकाशित झालेल्या एका ग्रंथानुसार ग्वाल्हेर मराठा घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांनी त्या वेळी नाशिकला जाणाऱ्या संन्यासींना उज्जैनच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर उज्जैनने कुंभमेळ्याचं आयोजन सुरू केलं. त्यामुळे उज्जैनमधील उत्सव नाशिकच्या मेळ्याचा विस्तार मानला जातो आणि नाशिकच्या मेळ्याप्रमाणेच यालाही उज्जैन सिंहस्थ असं म्हणतात. लोचटेफेल्ड, प्रा. दुबे हे हरिद्वारला कुंभमेळ्याचे मूळ स्थळ मानतात. कारण फक्त याच ठिकाणी कुंभ रास उत्सवाची वेळे निश्चित करते.

रामकुंड, १९९१

कुंभमेळा सध्याच्या स्वरूपात कसा सुरू झाला?

कुंभमेळा लाखोंचा मेळावा असला तरी त्यातील मुख्य भूमिका आखाड्यांची आहे. हे आखाडे विविध पंथांशी संबंधित योद्धा-संन्याशांच्या गटांचे प्रतिनिधित्व करतात. यात शैव संन्यासी, वैष्णव बैरागी, उदासी आणि शीख निर्मले यांचा समावेश होतो. लोचटेफेल्ड लिहितात, “कुंभमेळ्याच्या पवित्र कालखंडात या आखाड्यांना सर्वात महत्त्वाच्या स्नानस्थळांवर हक्क असतो. ही स्थळं सामान्य लोकांसाठी बंद ठेवली जातात. आखाडे या स्नानस्थळांपर्यंत ‘शाही स्नान’ (राजस्नान) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य मिरवणुकीतून जातात. या मिरवणुकीत ते शस्त्र, ध्वज आणि राजसत्तेची चिन्हं बाळगतात.” आखाडे शाही स्नानासाठी कोणत्या क्रमाने पुढे जातील यावरून त्यांची इतरांपेक्षा असलेली श्रेष्ठता ठरवली जात असे. त्यामुळे स्नानक्रम ठरवण्यावरून अनेकदा हिंसक वाद उद्भवले आहेत. या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे. अशाच एका भीषण घटनेचा उल्लेख १७६० च्या हरिद्वार कुंभमेळ्यासंदर्भात सापडतो. एका युरोपीय वर्णनानुसार संन्याशांनी १८,००० बैराग्यांची हत्या केली होती. याचा पहिला ज्ञात प्रसंग १७८९ च्या नाशिक मेळ्याचा आहे. या मेळ्यात मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पेशव्यांनी बैराग्यांचं स्नानस्थान जुन्या शहरातील रामकुंडावरून शेजारच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात हलवलं. ही व्यवस्था आजही सुरू आहे. उज्जैनमध्येही सरकारी सत्तेचा असाच वापर पाहायला मिळाला. मराठा शासकांनी सर्व संन्याशांना एकत्र स्नान करण्याचा आदेश दिला होता. बैराग्यांना नदीच्या एका बाजूला आणि संन्याशांना दुसऱ्या बाजूला स्नान करायला सांगितलं.

Haridwar Kumbh Mela by the English painter J. M. W. Turner. Steel engraving, c. 1850s.
इंग्रज चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर यांनी काढलेले चित्र; हरिद्वार कुंभमेळा, १८५०

ब्रिटिश राजवटीत स्नानक्रम अधिक ठोस करण्यात आला. कारण वसाहतकालीन शासकांनी आखाड्यांना कायदेशीर करारांद्वारे बांधून ठेवलं. त्यामुळे हिंसाचार रोखला जाऊ शकला. हीच पद्धत सध्याच्या मेळा प्रशासनानेही स्वीकारली आहे. या प्रक्रियेत आखाड्यांना ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मर्यादांमध्ये काम करावं लागलं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश वसाहतकालीन राजवटीने कुंभमेळ्यावर मोठा प्रभाव टाकला. यात मेळ्याच्या आयोजनापासून ते रेल्वेच्या आगमनामुळे यात्रेकरूंसाठी मेळा अधिक परवडणारा होणं याचा समावेश होता. ब्रिटिशांना या तीर्थयात्रेवर सत्ता गाजवून विविध प्रकारे फायदा झाला. या उत्सवाच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी ओळखलं की, हा उत्सव “बातम्या, अफवा, बंडखोरी आणि शेवटी राष्ट्रवादाचा प्रसार करणार माध्यम” आहे आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच या तीर्थयात्रेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, असं मॅक्लीन यांनी त्यांच्या ‘Pilgrimage and Power: The Kumbh Mela in Allahabad, 1765-1954’ (२००८) या पुस्तकमध्ये हे लिहिलं आहे.

अधिक वाचा: औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का?

देशभक्तीचे केंद्र

स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात कुंभमेळे देशभक्तीच्या भावना जागृत करण्यासाठी केंद्रबिंदू ठरले. धार्मिक मेळावे असल्यामुळे ते राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी आदर्श ठरले. “…वसाहतकालीन राज्य आणि वसाहतीमधील लोकांकडे कुंभमेळ्याविषयी वेगवेगळ्या कल्पना होत्या. वसाहतवादी सत्तेसाठी हा एक संभाव्य धोकादायक उत्सव होता. त्यामुळेच या उत्सवावर कठोर नियंत्रण आणि नियमांची गरज होती. तर वसाहतीमधील सर्वांसाठी हे एक पवित्र क्षेत्र होते. येथे परकीय हस्तक्षेप असह्य मानला जात होता,” असे मॅक्लीन त्यांच्या पुस्तकात लिहितात. याच काळात प्रयागमधील कुंभमेळ्याने हरिद्वारच्या मेळ्याला मागे टाकायला सुरुवात केली. कारण प्रयाग लोकसंख्या अधिक असलेल्या गंगेच्या मैदानावर वसलेलं होतं. इम्पीरियल गॅझेटियर ऑफ इंडियाच्या माहितीनुसार १७९६ ते १८६७ या कालावधीत प्रत्येकवेळी हरिद्वारच्या कुंभमेळ्याला २० लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली तर प्रयागला पहिल्यांदा १८९४ साली १० लाखांहून अधिक लोकांची गर्दी झाली. आज प्रयागराजचा कुंभमेळा चारही कुंभमेळ्यांमध्ये सर्वांत मोठा आहे. २०१९ साली आयोजित अर्धकुंभला सुमारे २४ कोटी लोकांनी हजेरी लावली होती. यात १० लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांचा समावेश होता, असं अधिकृत आकडेवारीत नमूद केले आहे (हरिद्वार आणि प्रयागराज येथे सहा वर्षांनी एकदा अर्धकुंभही आयोजित केला जातो).

राजकीय शक्तीचं प्रदर्शन

स्वातंत्र्यानंतरही चार कुंभमेळ्यांच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या सरकारांनीही त्याचा उपयोग आपली ताकद दाखवण्यासाठी केला आहे. तसेच, कुंभमेळ्याशी जोडलेल्या पार प्रतिकात्मकतेमुळे अनेक राजकीय नेत्यांनीही स्वतःला या उत्सवाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला आहे. लोचटेफेल्ड त्यांच्या ‘The Kumbha Mela Festival Processions’ (South Asian Religions on Display, Routledge, 2008) या लेखात नमूद करतात की, “…अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये धार्मिक महत्त्वाबरोबर व्यापारही यामध्ये गुंतलेला होता आणि विसाव्या शतकात त्यात राजकारणही मिसळलं. यात उत्सवाला जागतिक पर्यटन कार्यक्रम म्हणून प्रमोट करण्याचाही समावेश होता.
यामध्ये राजकारणातील सर्वोच्च स्तरांचा सहभाग दिसून येतो. याची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९५४ च्या प्रयाग कुंभमेळ्याला दिलेल्या भेटीपासून झाली, असं मॅक्लीन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. खरं तर नेहरू यांनी आपल्या इच्छापत्रात लिहिलं होतं की, “माझं गंगा आणि यमुना या नद्यांशी बालपणापासूनच जोडलेलं नातं आहे आणि जसं वय वाढत गेलं तसं हे नातं अधिक घट्ट झालं.” तसेच त्यांनी आपल्या अस्थी तीन नद्यांच्या संगमावर विसर्जित कराव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती.

२०१९ च्या प्रयागराज अर्धकुंभमेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही भेट दिली होती. कोविंद हे या मेळ्याला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती ठरले. यापूर्वी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५३ साली कुंभमेळ्याला भेट दिली होती. त्या वर्षी आणखी एक महत्त्वाची उपस्थिती होती ती म्हणजे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांची. मॉरिशसमध्ये लोकसंख्येतील निम्म्या लोकांचा धर्म हिंदू आहे.

“सध्याचा कुंभमेळा हा लक्ष वेधून घेण्यासाठी आणि ते कायम ठेवण्यासाठीचा एक प्रचंड मंच आहे आणि त्यामुळे त्यात राजकीय विचार समाविष्ट होणं अपरिहार्य आहे,” असं लोचटेफेल्ड यांनी Indianexpress.com ला ईमेलद्वारे सांगितलं होतं. “विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या उत्सवावर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेले संघर्ष त्या काळातील व्यापक वसाहतविरोधी चळवळीचं प्रतिबिंब होत. स्वतंत्र भारतात (किंवा नवीन उत्तराखंड राज्यात) एक सुरळीत आणि अपघातमुक्त मेळा हे चांगल्या प्रशासनाचं आणि कार्यक्षमतेचं उदाहरण म्हणून मांडता येऊ शकतं. अर्थात, हा मीडिया मंच सार्वजनिक व्यक्तींना सहजपणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक तयार केलेली संधी देखील देतो.” थोडक्यात सांगायचं तर कुंभमेळ्याने दीर्घ काळापासून राजकीय संकेत आणि संदेश वाहून नेले आहेत आणि हे निश्चितपणे पुढेही सुरू राहील.

संदर्भ ग्रंथ /Further reading:

Pilgrimage and Power: The Kumbh Mela in Allahabad, 1765-1954 By Kama Maclean

Making the Colonial State for You: The Modern Beginnings of the Kumbh Mela in Allahabad By Kama Maclean (Paper)

Kumbh Mela: Do Our Vedic Texts Mention this Unique Pilgrimage? By DP Dubey

The Kumbh Mela Festival Processions, South Asian Religions on Display, 2008 By James Lochtefeld

Story img Loader