अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रशांत महासागरात ला निना सक्रिय झाला आहे. तो वेळेत सक्रिय झाला की उशिराने, थंडीवर कितपत परिणाम, आपल्यासाठी फायदेशीर ठरेल का, याविषयी…
ला निना सक्रिय झाला म्हणजे काय?
ला निनाची स्थिती निर्माण होते म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने कमी होते. डिसेंबर २०२४ च्या अखेरीस प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअसने कमी झाल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान संस्थेने प्रशांत महासागरात ला निना सक्रिय झाला, असे जाहीर केले आहे. पण, हा ला निना कमकुवत असल्याचे आणि तो एप्रिलअखेर सक्रिय राहील, असेही सांगितले आहे. सरासरीच्या ०.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ला निना सक्रिय झाला असला तरीही तापमान ०.९ अंश सेल्सिअसने कमी झाल्याशिवाय तो मजबूत स्थितीत जात नाही आणि जागतिक हवामानावर फारसा परिणामही होत नाही.
ला निना अल्पकालीन, कमकुवत का?
सलग तेरा महिने जागतिक तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे. २०२४ वर्षांत सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली आहे. गत वर्षांत ४१ दिवस उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला, तर १३० दिवस लोकांनी उकाडा, उष्णतेच्या झळा अनुभवल्या. लहान बेटे, विकसनशील देशांना तापमान वाढीचा जास्त फटका बसला. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत आहे. नुकताच कॅलिफोर्नियाने भीषण आगीचा सामना केला आहे. कार्बन डायऑक्साईड, हरित वायूचे उत्सर्जन दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरात पर्यावरणाचा नाश करणाऱ्या घटना घडत आहेत. त्याचा परिणाम नैसर्गिक हवामान चक्रावर पडताना दिसत आहे. त्यामुळे जुलै २०२४ पासून ला निना सक्रिय होण्याचा अंदाज चुकतो आहे. आता अगदी उशिरा ला निना सक्रिय झाला आहे. त्यामुळे अल्पकालीन आणि कमकुवत ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
ला निना स्थितीचा परिणाम काय होते?
ला निनामुळे प्रशांत महासागरावरील हवेची घनता वाढते, हवा दाट होते. त्यावेळी हिंदी महासागरावरील आणि बंगालच्या उपसागरात हवेची घनता विरळ होते. त्यामुळे प्रशांत महासागरावर तयार झालेली दाट घनता असलेली हवा भारतीय उपखंडाच्या दिशेने वारे वाहू लागते. हे वारे बाष्पयुक्त असतात. अशी स्थिती पावसाळ्यात निर्माण झाल्यास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. हीच स्थिती जर हिवाळ्यात तयार झाली तर प्रशांत महासागराकडून भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या वाऱ्याचा दाब जास्त राहील. त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तुलनेने जास्त तयार होतील. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम दिशेकडून म्हणजे हिमालयाकडून येणारे थंड वाऱ्याचे झोत किंवा वाऱ्याचे झंझावात (पश्चिम विक्षेप) हे जास्त संख्येने येतात. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी बर्फवृष्टी होते, या स्थितीमुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रात जास्त थंडी पडते किंवा थंडी पडण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा >>> Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
सध्याचा ला निना फारसा उपयोगी नाही?
ला निना पावसाळ्यापूर्वी सक्रिय झाला तर पावसाळा चांगला जातो. ला निना हिवाळ्यापूर्वी सक्रिय झाला तर चांगली थंडी पडते. पण, आता जानेवारी मध्य आला आहे. जानेवारीचे पंधरा, फेब्रुवारी आणि मार्चचे ६० दिवस राहिले आहेत. या ७० – ७५ दिवसांत ला निना फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. शिवाय तो कमकुवत आहे. ला निनामुळे चांगली थंडी अपेक्षित असते. पण, भारतीय हवामान विभागाने यापूर्वी जानेवारीसह उर्वरित हिवाळा सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या प्रशांत महासागरात सक्रिय झालेला ला निना भारतासाठी फार फायदेशीर ठरण्याची शक्यता नाही. ला निनामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हे कमी दाबाचे क्षेत्र प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीलगत आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होते. त्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकदा राज्यातील थंडी कमी होते, पारा वाढतो. त्यामुळे ला निनामुळे राज्यात थंडी पडेलच, असे खात्रीने म्हणता येत नाही.
रब्बी हंगामासाठी पोषक?
ला निना स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जास्त संख्येने निर्माण होतात. त्यामुळे रशियाकडून थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत थंड वाऱ्याचे झोत जास्त प्रमाणात येतात किंवा थंड वाऱ्याच्या झोतांची संख्या वाढते. थंडीची तीव्रता जास्त असल्यास उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी, जम्मू-काश्मीर, लेह- लडाख, हिमाचल प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होते. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंतचे वातावरण थंड होते. सामान्यपणे उत्तरेत बर्फ पडत असताना जर उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वारे वाहत असतील तरच राज्यात थंडी वाढलेली पहावयास मिळते. देशाचा उत्तर भाग, मध्य भाग, गंगा नदीचे खोरे आणि महाराष्ट्रात थंडी वाढते. ही थंडी रब्बी म्हणजे प्रामुख्याने गहू, हरभरा, करडई, मोहरी पिकांसाठी फायदेशीर असते. थंडीमुळे उत्पादनात चांगली वाढ होते. पण, त्यामुळे फक्त ला निनामुळे थंडी वाढते असे म्हणता येणार नाही. थंडीसाठी हवामान विषयक अन्य परिस्थितीही पोषक असणे गरजेचे असते.
dattatray.jadhav@expressindi.com