La Nina Effect On Air Pollution : पूर्व प्रशांत महासागरात होणाऱ्या अल निनो आणि ला निना या दोन्ही घटनांचा जगभरातील हवामानावर मोठा परिणाम बघायला मिळतो. विशेषत: भारतातील मान्सूनवर याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. मात्र, आता या संदर्भातील नवीन संशोधन पुढे आले आहे. त्यानुसार दोन्ही घटनांचा भारतातील हवेवरही परिणाम होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज आणि पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भातील एक संशोधन केले आहे. २०२२ च्या हिवाळ्यात भारतातील काही शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरण्याला त्या वर्षात घडलेल्या ‘ला निना’च्या घटना कारणीभूत असू शकतात, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतात अल निनो आणि ला निनाच्या घटनांना हवामानाशी जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, या संशोधनात नेमके काय म्हटले आहे? भारतात प्रदूषण आणि हिवाळ्याचा संबंध काय? आणि अल निनो आणि ला निना म्हणजे नेमके काय? याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा- विश्लेषण : कोचर दाम्पत्याला झालेली अटक म्हणजे ‘सत्तेचा दुरुपयोग’ असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने का म्हटले? नेमके प्रकरण काय?

भारतात प्रदूषण आणि हिवाळ्याचा संबंध काय?

भारतात साधारणत: ऑक्टोबर ते जानेवारी यात चार महिन्यांत हिवाळा असतो. या काळात उत्तर भारतातील काही शहरांत विशेषत: दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा स्तर मोठ्या प्रमाणात घसरतो म्हणजेच प्रदूषणात मोठी वाढ होते. या प्रदूषणाला तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा असे विविध प्रकारचे हवामान घटक कारणीभूत असतात. याच काळात पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी शेतीची मशागत करतात आणि शेतातील कचरा जाळतात. त्यामुळे हवामानातील घटक हा धूर दिल्ली आणि आसपासच्या भागांत वाहून नेतात. परिणामत: या प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते.

या कारणांमुळे देशातील समुद्रकिनारी असलेल्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील शहरांच्या तुलनेत उत्तरेकडील शहरांमध्ये प्रदूषण वाढल्याचे दिसून येते. मात्र, या संशोधनानुसार २०२२ च्या हिवाळ्यात उत्तरेकडील शहरांच्या तुलनेत पश्चिम आणि दक्षिणेकडील मुंबई, बंगळुरू व चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये प्रदूषण वाढल्याचे दिसून आले.

या संशोधनानुसार २०२२ च्या हिवाळ्यात गाझियाबादमध्ये हवेतील पीएम २.५ कणांच्या पातळीत सामान्यापेक्षा ३३ टक्क्यांची घट दिसून आली. तर, नोएडामध्ये २८ टक्के आणि दिल्लीत १० टक्क्यांनी या पातळीत घट झाल्याचे बघायला मिळाले. याउलट मुंबईत या पातळीत ३० टक्क्यांनी, तर बंगळुरूत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. ही एक प्रकारे असामान्य घटना होती. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या संदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना या शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाला काही प्रमाणात ला निना ही घटना कारणीभूत असल्याचे दिसून आले.

वाऱ्याची दिशा

२०२२ च्या हिवाळ्यातील विसंगती समजण्यासाठी आपल्याला त्या काळात वाऱ्याची बदललेली दिशा समजून घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात वारा साधारणत: उत्तर-पश्चिम दिशेने वाहतो. म्हणजे पंजाबकडून दिल्लीच्या दिशेने प्रवास करतो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याचा धूर दिल्लीत पोहोचतो. मात्र, २०२२ च्या हिवाळ्यात वाऱ्याची दिवशी ही उत्तर-दक्षिण अशी होती. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतात जाळण्यात आलेला कचऱ्याचा धूर राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने गेला.

या संदर्भात बोलताना या अभ्यास संशोधनाचे प्रमुख गुफरान बेग म्हणाले, ”या काळात दिल्ली आणि मुंबईतील प्रदूषणाच्या स्थानिक स्रोतांमध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र, उत्तरेकडील राज्यांतून येणारा धूर; जो साधारणत: दिल्लीच्या दिशेने जातो, तो यावेळी मुंबई आणि द्वीपकल्पीय प्रदेशांपर्यंत पोहोचला.”

वाऱ्याची दिशा ( फोटो – द इंडियन एक्सप्रेस )

महत्त्वाचे म्हणजे या काळात मुंबईतील हवेच्या वर्तनातही बदल झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईत हिवाळ्यात साधारणत: दर चार ते पाच दिवसांनी हवेचा प्रवाह शहराकडून समुद्राकडे असा बदलतो. त्यामुळे प्रदूषणातील कण समुद्राच्या दिशेने जातात. मुंबई शहरातील प्रदूषण काही प्रमाणात कमी असते. मात्र, २०२२ मध्ये हा हवेचा प्रवाह साधारण १० ते १२ दिवस एकसारखाच राहिला. त्यामुळेही मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले.

ला निना आणि हवामान बदल

या संदर्भात बोलताना गुफरान बेग म्हणाले, ”आम्ही २०२२ च्या हिवाळ्यात जागतिक स्तरावरील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास केला, तेव्हा भारताच्या क्षेत्रात आम्हाला एक विशिष्ट पॅटर्न दिसून आला. मात्र, ज्यावेळी मागील काही वर्षांतील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास केला; विशेषत: जेव्हा ला निनाची घटना घडलेली नव्हती, त्या वर्षात हा विशिष्ट पॅटर्न दिसून आला नाही.”

ते पुढे म्हणाले, ”सगळ्याच ला निना घटनांचा भारतातील वाऱ्याच्या दिशेवर परिणाम होऊ शकत नाही. मात्र, त्या वर्षात झालेल्या घटनेची तीव्रता अधिक होती.” महत्त्वाचे म्हणजे त्यांनी असेही सांगितले, अल निनो किंवा ला निनाच्या घटनेचा भारतातील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो की नाही हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.”

हेही वाचा – मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या बाईक-टॅक्सीला भारतात अधिक व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल?

पण अल निनो आणि ला निना म्हणजे नेमके काय?

हिवाळ्यात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास ‘एल निनो’ म्हणतात. तर, एल निनोच्या विरुद्ध आणि पूरक घटना दिसून येते; त्या परिस्थितीला ‘ला निना’ असे म्हणतात. ला निनाच्या घटनेदरम्यान मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान कमी होते. त्यामुळे या भागात दक्षिण-पूर्वेकडून जोरदार वारे वाहू लागतात. या वाऱ्याच्या प्रभावामुळे पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी प्रवाहाच्या रूपाने पश्चिमेकडे वाहू लागते आणि खाली असलेले थंड पाणी वर येऊ लागते. या दोन्ही घटनांचा भारतातील मान्सूनवर परिणाम होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: La nina impacted air quality in india in winter what new study says know in details spb
Show comments