प्रशांत महासागरात ‘ला निना’ची स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह देशात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या विषयी…

‘ला निना’ सक्रिय होणार म्हणजे काय?

‘ला निना’ची स्थिती निर्माण होते म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्शियसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ सक्रिय झाला, असे म्हटले जाते. ‘ला निना’मुळे प्रशांत महासागरात हवेची घनता वाढते, हवा दाट होते. प्रशांत महासागरावर हवेचा दाब वाढून भारतीय उपखंडाच्या दिशेने वारे वाहू लागतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. अशी स्थिती पावसाळ्यात निर्माण झाल्यास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. आता हीच स्थिती जर हिवाळ्यात तयार झाली तर प्रशांत महासागराकडून भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या वाऱ्याचा दाब जास्त राहील. त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रे तुलनेने जास्त तयार होतील. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम दिशेकडून म्हणजे हिमालयाकडून येणारे थंड वाऱ्याचे झोत किंवा वाऱ्याचे झंझावात (पश्चिम विक्षोप) हे जास्त संख्येने येतात. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी बर्फवृष्टी होते, या स्थितीमुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रात जास्त थंडी पडते किंवा थंडी पडण्याची शक्यता वाढते.

हे ही वाचा… Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास

महाराष्ट्रात थंडी पडण्याची शक्यता किती?

‘ला निना’मुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हे कमी दाबाचे क्षेत्र प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीलगत तयार होते. त्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकदा राज्यातील थंडी कमी होते, पारा वाढतो. त्यामुळे ‘ला निना’मुळे राज्यात थंडी पडेलच असे खात्रीने म्हणता येत नाही. पण, प्रामुख्याने रशियाकडून थेट हिमालयाच्या पलिकडून हिमालयात, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत थंड वाऱ्याचे झोत जास्त प्रमाणात येतात किंवा थंड वाऱ्याच्या झोतांची संख्या वाढते. थंडीची तीव्रता जास्त असल्यास उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी, जम्मू-काश्मीर, लेह- लडाख, हिमाचल प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होते. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंतचे वातावरण थंड होते. सामान्यपणे उत्तरेत बर्फ पडत असताना जर उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वारे वाहत असेल तरच राज्यात थंडी वाढलेली पहावयास मिळते. त्यामुळे फक्त ‘ला निना’मुळे थंडीचा कडाका वाढणार असे म्हणता येणार नाही. तर अन्य परिस्थितीही पोषक असणे गरजेचे असते.

‘ला निना’ स्थितीची राज्यासाठी नुकसानकारक?

‘ला निना’मुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबांची क्षेत्रे सातत्याने तयार होतात. त्यामुळे महाराष्ट्रावर बाष्पीयुक्त वारे येतात. राज्यात ढगाळ वातावरण तयार होते. बाष्पीयुक्त ढग आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा संयोग होऊन कधी कधी महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडताना दिसतो. याच काळात उत्तरेकडून थंड वाऱ्याचा झोत, थंड वारे जर महाराष्ट्रावर येत राहिले तर अचानक थंडी वाढते. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पारा दहा अंश सेल्शियसच्याही खाली जातो. २०२१ मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी १० नोव्हेंबर रोजी पुण्यातील कमाल तापमान १० अंश सेल्शियसपर्यंत खाली गेले होते. हिवाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होते. दाट धुके पडल्यामुळे पिकांवर रोगांचा, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ‘ला निना’ची स्थिती महाराष्ट्रासाठी नुकसानकारकही ठरू शकतो.

हे ही वाचा… विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता?

‘ला निना’मुळे मध्य भारतासह आणि महाराष्ट्रावर बाष्पीयुक्त हवा तयार होते किंवा हवेत बाष्पाचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमानात काहीशी वाढ होते. तापमानात वाढ झालेल्या बाष्पयुक्त हवेला, ढगांना अचानक उत्तर भारतातून थंड हवेचा झोत येऊन मिळाला तर गारपीट होण्याची शक्यता वाढते. साधारणपणे १५ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत हा गारपिटीचा काळ असतो. या काळात गारपीट होण्याची शक्यता वाढते. उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, कांद्यासह अन्य फळपिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यताही असते. त्यामुळे ‘ला निना’ पावसाळ्यात सक्रिय होणे भारतीय उपखंडासाठी चांगले असते. हिवाळ्यात ‘ला निना’ सक्रिय झाल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो.

केवळ ‘ला निना’मुळेच थंडी पडते?

फक्त ‘ला निना’मुळेच थंडी पडते असे नाही. ‘ला निना’ थंडी पडण्यासाठी महत्त्वाचा घटक असला तरीही त्या सोबत अनेक घटक कारणीभूत ठरतात. प्रामुख्याने हिमालयाच्या पलिकडून अनेकदा थेट सैबेरियातून थंड वाऱ्याचे झोत भारताच्या दिशेने, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत येतात. हे थंड वाऱ्याचे झोत एका रेषेत येत नाहीत, नागमोडी वळणे घेत येतात. त्यामुळे मध्य आशियापासून उत्तर भारतापर्यंतचे वातावरण थंड होते. ‘ला निना’ नसेल तर थंड वाऱ्याचे झोत कमी प्रमाणात किंवा कमी संख्येने येतात. त्यामुळे ‘ला निना’सह अन्य स्थितीही षोषक असली तरच थंडी पडते. थंड वाऱ्याचा झोत जास्त असेल तरच मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी येते अन्यथा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ गारठलेला असतो आणि उर्वरित राज्यात थंडी असत नाही. हवामान बदलामुळे एकूणच जगभरात थंडीचे प्रमाण कमी झालेले दिसते. नुकतेच अमेरिकेच्या हवामान विभागाने यंदाचे वर्ष आजवरचे उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ‘ला निना’ सक्रिय झाला म्हणजे कडाक्याची थंडी पडणार असे नाही.

हे ही वाचा… कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?

‘ला निना’ सक्रिय होण्याचा अंदाज का चुकतोय?

भारतीय हवामान विभागासह जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेची हवामान संघटना जुलैअखेर पासून ‘ला निना’ सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. जुलैअखेर पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. पावसाळ्याचे चार महिने प्रतीक्षा करूनही आणि शक्यता असूनही ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. आताही ‘ला निना’साठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. पण, अद्याप तरी ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा किमान पाच अंश सेल्शियसने कमी होण्याची गरज आहे. पण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, प्रदूषणामुळे एकूण जागतिक हवामान विषयक प्रणालींवर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे ‘ला निना’ कधी सक्रिय होणार याबाबत हवामान विषयक संस्था आणि शास्त्रज्ञ ठोसपणे काहीच सांगत नाहीत.

dattatray.jadhav@expressindia.com