भयंकर वणव्याने लॉस एंजेलिसला वेढले आहे. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि आतापर्यंत किमान पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने जखमींचीदेखील नोंद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अधिकाऱ्यांनी अधिकृत आकडा जारी केलेला नाही. सुमारे १६,००० एकर परिसरात ही आग पसरली आहे आणि सुमारे १,००० संरचना नष्ट झाल्या आहेत, असे एलए काउंटी फायर चीफ अँथनी मॅरोन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? या भीषण आगीमागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
लॉस एंजेलिसमध्ये जंगलाला आग
पॅसिफिक पॅलिसेड्स, मालिबूच्या पूर्वेकडील लॉस एंजेलिस काउंटी शेजारच्या परिसरात मंगळवारी सकाळी आग भडकली. कॅलिफोर्निया फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारपर्यंत १५ हजारपेक्षा जास्त एकर क्षेत्रामध्ये ही आग पसरली आहे. आग मंगळवारी रात्री लॉस एंजेलिसच्या डाउनटाउन जवळ उत्तरेला असलेल्या राष्ट्रीय जंगलातील एका खोऱ्याजवळ सुरू झाली आणि पुढे मोठ्या प्रमाणात पसरत गेली, असे यूएस फॉरेस्ट सर्व्हिसने नमूद केले आहे. आग मंगळवारी रात्री सॅन फर्नांडोच्या उत्तरेकडील उपनगरी सिलमारमध्ये ब्रश फायरच्या रूपात पसरली आणि त्वरित ५०० एकरपर्यंत वाढली, असे लॉस एंजेलिस अग्निशमनप्रमुख क्रिस्टन क्रॉली यांनी एनबीसी न्यूजला सांगितले.
हेही वाचा : तालिबानशी भारताची चर्चा; काय आहे उद्दिष्ट?
जंगलातील आग कशामुळे लागली?
पर्जन्यवृष्टी, कोरडे इंधन आणि ताशी ९९ मैल वेगाने वाहणारे जोरदार वारे, यामुळे जंगलातील आग पसरली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, आगीचे विनाशकारी स्वरूप हवामान बदलामुळेदेखील आहे; ज्यामुळे अलीकडच्या वर्षांत जंगलातील आगीमुळे होणारी तीव्रता आणि नुकसान वाढले आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये १ ऑक्टोबरपासून सरासरीच्या एक टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे आणि तीव्र वारे या प्रदेशात आगीस कारणीभूत ठरत आहेत, असा राष्ट्रीय हवामान सेवेने इशारा दिला आहे. १९ दशलक्ष लोक या आगीने प्रभावित होण्याचा धोका वाढला आहे. एनबीसी न्यूजनुसार, संपूर्ण प्रदेशात अनेक ठिकाणी ७० मैल प्रतितास वेगाने वाऱ्याची नोंद करण्यात आली आहे.
दक्षिण-पश्चिम अमेरिकेत गेल्या २२ वर्षांत पहिल्यांदा अति कोरड्या वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. सांता आना वाऱ्यांमुळे परिस्थिती बिघडत आहे. “उष्ण आणि कोरडे सांता आना वारे अनेकदा दक्षिण कॅलिफोर्निया प्रदेशावर परिणाम करतात आणि मोठ्या वणव्याला कारणीभूत ठरतात. जसे की चालू असलेल्या वणव्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते,” असे इम्पीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक अपोस्टोलोस वोल्गाराकिस यांनी टाइमने दिलेल्या वृत्तानुसार एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी हे दर्शविले आहे की, शरद ऋतूतील सांता आना वाऱ्याची घटनादेखील हवामान बदलामुळे खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे ते आणखी कोरडे होते.”
किती लोक प्रभावित?
एक लाखाहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. पासाडेनाचे महापौर व्हिक्टर गोर्डो यांनी ईटन फायरवर चर्चा करताना मीडियाला सांगितले आणि एक लाखांहून अधिक लोकांना सांगितले गेले आहे की, ते धोक्याच्या क्षेत्रात राहतात, म्हणून त्यांना स्थलांतर करण्याची आवश्यकता असू शकते. पॅलिसेड फायरच्या मार्गावर असलेल्या अंदाजे ३७,००० लोकांना कॅलाबासास, मालिबू आणि लॉस एंजेलिस शहरांमध्ये त्यांची घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, असे कायदा अंमलबजावणी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. सिलमार भागातील तीन हजारांहून अधिक लोकांना आपत्कालीन निर्वासन आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या बऱ्याच भागात वीज खंडित झाल्याचीही नोंद झाली आहे. ‘Poweroutage.us’च्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारपर्यंत १.५ दशलक्षाहून अधिक लोकांची वीज खंडित करण्यात आली आहे.
या आगीमुळे किती नुकसान झाले?
पॅलिसेड्स आगीत जवळपास १,००० घरे आणि व्यवसाय जळून खाक झाले आहेत. काही व्हिडीओंमध्ये अल्ताडेनामधील व्यावसायिक क्षेत्रातील व्यवसाय भस्मसात झाले आहेत. मालिबूवरील बीचफ्रंट घरेही जळाली आहेत, असे सोशल मीडियावरील व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्याच्या प्राथमिक पुनरावलोकनात, जेपी मॉर्गनच्या विमा विश्लेषकांनी अंदाजे १० अब्ज डॉलर्सच्या आगीमुळे नुकसान झाले असल्याचे नमूद केले. २०१८ मध्ये कॅम्प फायर – कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील सर्वात भयंकर आग लागली होती; ज्यामध्ये ८५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि १३,००० इमारती जळून खाक झाल्या होत्या. त्यात जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार १५ बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले.
हॉलीवूड कलाकारांची घरेही जळाली
अभिनेते बेन ॲफ्लेक यांनी जुलैमध्ये २० दशलक्ष डॉलर्सचा बंगला विकत घेतला होता. टॉम हँक्स, रीझ विदरस्पून, मायकेल कीटन, ॲडम सँडलर, माइल्स टेलर आणि यूजीन लेव्ही यांच्यासह कलाकार लॉस एंजेलिसमधील पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरात राहतात. उत्तर लॉस एंजेलिसमधील सांता मोनिका आणि मालिबू यांच्यादरम्यान असलेले हे क्षेत्र देशातील सर्वात महागडे रिअल इस्टेटचे क्षेत्र आहे. Realtor.com डेटानुसार घराची सरासरी किंमत ४.५ दशलक्ष डॉलर्स आहे. आगीमुळे एक लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये ‘स्टार वॉर्स’ अभिनेता मार्क हॅमिल याचाही समावेश आहे, त्याने इन्स्टाग्रामवर सांगितले की, त्याने मंगळवारी त्याची पत्नी मारिलो आणि त्यांचा श्वान ट्रिक्सी यांच्यासह मालिबूचे घर सोडले. बिझनेस इनसाइडरच्या म्हणण्यानुसार, १९९३ नंतरची ही सर्वात भीषण आग आहे.
ऑस्कर नामांकित अभिनेता जेम्स वुड्सने मंगळवारी त्याच्या घराजवळील एका टेकडीवर ज्वाळांचे फुटेज पोस्ट केले. घरांच्या मधोमध असलेल्या लँडस्केप यार्डमध्ये प्रचंड ज्वाळा उसळत होत्या. अभिनेते केट बेकिन्सेलने बुधवारी एका ‘इन्स्टाग्राम पोस्ट’मध्येदेखील लिहिले की, “संपूर्ण पॅलिसेड्स नष्ट होणे अकल्पनीय आणि भयानक आहे.” पॅरिस हिल्टनने बुधवारी इन्स्टाग्रामवर शेअर केले की, तिचे मालिबू घर आगीत नष्ट झाले आहे. हॉलीवूडच्या दिग्गज विल रॉजर्सचे ऐतिहासिक रँच हाऊसदेखील पॅलिसेड्सच्या आगीत नष्ट झाले. हे विल रॉजर्स स्टेट हिस्टोरिक पार्क आणि टोपांगा स्टेट पार्क या दोन्ही ठिकाणी नष्ट झालेल्या अनेक संरचनांपैकी एक आहे. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, विल्यम रँडॉल्फ हर्स्टने १९२९ मध्ये बांधलेले ऐतिहासिक टोपांगा रांच मोटेलदेखील जळून खाक झाले.
जंगलातील आग कधी संपेल?
शुक्रवारपर्यंत दक्षिण कॅलिफोर्नियाच्या काही भागांमध्ये इशारा देण्यात आला आहे. उष्ण तापमान आणि वाढलेला दुष्काळ याचा अर्थ असा होऊ शकतो की, जंगलातील आग त्यांच्या नेहमीच्या हंगामापेक्षा जास्त काळ राहील. वॉशिंग्टन विद्यापीठातील वेस्टर्न फायर आणि फॉरेस्ट रेझिलिन्स कोलॅबोरेटिव्हचे डेप्युटी डायरेक्टर क्रिस्टल रेमंड यांनी टाइमला सांगितले, जोपर्यंत पूर्वी नैसर्गिक वनस्पती असलेले क्षेत्र व्यावसायिकदृष्ट्या विकसित होत नाही, तोपर्यंत जंगलातील आगीमुळे विनाश होत राहील. ही प्रक्रिया वाइल्डलँड-अर्बन इंटरफेस म्हणून ओळखली जाते.
जंगलातील आग सामान्य आहे का?
जंगलातील आग सामान्य आहेत. कोरड्या परिस्थितीमुळे आणि वेगवान वाऱ्याच्या घटनांमुळे आगीची परिस्थिती जास्त काळ राहू शकते. वाऱ्यांमुळे आग विस्मयकारक वेगाने वाढू शकते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, वाऱ्यांमुळे महामार्गांवर आणि इतर नैसर्गिक आगींच्या ज्वाळा उसळू शकतात, ज्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण होते. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पावसाची कमतरता आणि अपवादात्मक उन्हाळ्यामुळे समस्या आणखी वाढली आहे. मुसळधार पाऊस फायदेशीर असला तरी त्यामुळे वनस्पतींची वाढ होऊ शकते. जेव्हा ती वनस्पती सुकते तेव्हा ती अत्यंत ज्वलनशील होते; ज्यामुळे मोठ्या आणि अधिक विनाशकारी आगीचे स्वरूप पाहायला मिळते.
हेही वाचा : ‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?
दरम्यान, डीप स्काय रिसर्चच्या अहवालात आगीच्या हवामानाच्या ट्रेंडचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि असे आढळून आले आहे की, उत्तर डकोटा आणि मिनेसोटाच्यासारख्या काही भागांत आगीचा धोका कमी झाला आहे, तर कॅलिफोर्नियासह बहुतेक प्रदेशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.