सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapata Ladies) या चित्रपटाची निवड करण्यात आली. ९७ व्या अकादमी पुरस्कारासाठी हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा सोमवारी (२३ सप्टेंबर) करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे मार्च महिन्यात प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट दोन नवविवाहित महिलांच्या आयुष्यावर आणि महिला सक्षमीकरणावर आधारित होता. या वृत्तानंतर किरण राव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, निवड समिती आणि चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (एफएफआय) ने चेन्नई येथे चित्रपटाची निवड जाहीर केली आहे. या यादीत पायल कपाडियाच्या कान्स विजेत्या ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट, आनंद एकार्शीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अट्टम आणि संदीप रेड्डी वंगा यांचा ब्लॉकबस्टर ॲनिमल यासह एकूण २९ चित्रपटांचा समावेश होता. एफएफआय म्हणजे काय? ते ऑस्करसाठी चित्रपटांची निवड कशी करते? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : Israel-Hezbollah War: इस्रायलचा हिजबूलवर हवाई हल्ला, ४९२ जणांचा मृत्यू; युद्ध आणखी चिघळणार?

एफएफआय म्हणजे काय?

‘एफएफआय’ म्हणजेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया. त्यांच्या वेबसाइटवर या संस्थेचे वर्णन भारतातील सर्व आघाडीच्या चित्रपट संघटनांची पालक संस्था म्हणून करण्यात आले आहे. या संस्थेचा उद्देश सर्वसाधारणपणे वाणिज्य आणि विशेषतः भारतीय चित्रपट उद्योगाच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आहे. तसेच चित्रपटांचे निर्माते, वितरक, प्रदर्शक आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या हितांचे रक्षण करणेही आणि चित्रपट भारतात आणि परदेशात लोकप्रिय करणे हेदेखील या संस्थेचे उद्दीष्ट आहे. अकादमी पुरस्कारांसाठी कोणता चित्रपट पाठवायचा हे या संस्थेची १३ सदस्यांची ज्यूरी ठरवते. हे सदस्य सर्जनशील क्षेत्रातील असतात. यात बहुतांश सदस्य हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सदस्य असतात. यात प्रतिष्ठित निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, कॅमेरामन, संगीतकार, गीतकार आदींचा समावेश असतो, असे पूर्वीच्या त्यांच्या एका प्रेस रिलीझमध्ये देण्यात आले आहे. या ज्युरीमध्ये एक अध्यक्षदेखील असतो. यावेळी, आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ अध्यक्ष होते; ज्यांना ‘एफएफआय’ने नामांकित केले होते. सध्याच्या ज्युरीमध्ये फक्त पुरुषांचा समावेश होता.

९७ व्या अकादमी पुरस्कारासाठी ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा सोमवारी (२३ सप्टेंबर) करण्यात आली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

एफएफआय चित्रपटाची निवड कशी करते?

‘एफएफआय’चे अध्यक्ष (सध्या रवी कोट्टारकारा) यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती भारतातील सर्व चित्रपट संघटनांना आमंत्रणं पाठवते. त्या आमंत्रणावर अनेक निर्माते त्यांचे त्यांचे चित्रपट यासाठी सादर करतात. त्यासाठी पात्रतेच्या नियमांमध्ये बसणे आवश्यक असते, जसे की चित्रपट किमान ४० मिनिटांचा असावा, त्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त संवाद इंग्रजी भाषा सोडून असावा, १ नोव्हेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत किमान सात दिवसांचा त्यांचा थिएटर रिलीज कालावधी असावा, इत्यादी. या प्रक्रियेत ‘एफएफआय’ला १.२५लाख रुपयांचे शुल्क, चित्रपटाचे तपशील आणि इतर काही आवश्यक गोष्टी द्याव्या लागतात. एका प्रेस रीलिझमध्ये, ‘एफएफआय’ ने लिहिले, “या वर्षी ऑस्करमध्ये भारताच्या प्रवेशासाठी नामांकन मिळण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त चित्रपटांना आमंत्रित करत आहोत.”

हे सर्व चित्रपट ज्युरीसाठी प्रदर्शित केले जातात, त्यानंतर मतदानाद्वारे चित्रपटांची अंतिम निवड होते. बरुआ यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही चेन्नईमध्ये सात ते आठ दिवस होतो आणि आम्हाला पाठवलेले २९ चित्रपट आम्ही पाहत होतो. या संपूर्ण काळात आम्ही चित्रपटांबद्दल सखोल चर्चा करायचो.” ज्युरींच्या निवडीच्या निकषांवर, ते म्हणाले, “चित्रपटाने भारताच्या सामाजिक व्यवस्था आणि नैतिकतेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.”

‘लापता लेडीज’बद्दल एफएफआय ज्युरी काय म्हणाले?

‘एफएफआय’ने म्हटले आहे की, ‘लापता लेडीज’ हा फक्त भारतातील महिलांनाच नव्हे तर सर्वांनाच गुंतवून ठेवणारा, मनोरंजन करणारा चित्रपट आहे”. परंतु, या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याचे वृत्त येताच भाषा आणि चित्रपटातील काही मुद्द्यांमुळे सोशल मीडियावर टीकादेखील झाली. “भारतीय स्त्रिया बरच काही करू शकतात, मात्र चित्रपटात त्यांना गृहिणी म्हणून आनंदी दाखवण्यात आले आहे,” यांसारख्या टीका सोशल मीडियावर करण्यात आल्या.

हेही वाचा : डेंग्यूची प्रकरणे यावर्षी का वाढत आहेत? भारतातील परिस्थिती काय? डेंग्यू विरोधी लस उपलब्ध आहेत का?

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणी काय आहे? (International Feature Film category)

अकादमी पुरस्कार विविध देशांना त्यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट स्पर्धेसाठी पाठवण्यास आमंत्रित करतात. “चित्रपटाची निवड एक मान्यताप्राप्त संस्था, ज्युरी किंवा समितीद्वारे केली जावी; ज्यामध्ये किमान ५० टक्के कलाकार आणि मोशन पिक्चर्सच्या क्षेत्रातील लोक समाविष्ट असावेत,” असे अकादमीचे नियम सांगतात. मतदानाच्या दोन फेऱ्यांद्वारे अंतिम नामांकन निश्चित केले जाते. एक प्राथमिक समिती १५ चित्रपटांची एक यादी तयार करण्यासाठी गुप्त मतदानाद्वारे मतदान करते. नामनिर्देशन समिती श्रेणीतील सर्व चित्रपट पाहते आणि अंतिम पाच चित्रपटांसाठी गुप्त मतदानाद्वारे मत देते आणि त्यानंतर अकादमीचे सदस्य विजेत्या चित्रपटासाठी मतदान करतात. भारतातून, तीन चित्रपटांना अंतिम नामांकन मिळाले आहे; ज्यात मदर इंडिया (१९५७), सलाम बॉम्बे! (१९८८) आणि लगान (२००१) या सर्व हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, मल्याळम चित्रपट ‘एव्हरीवन इज अ हिरो ऑन २०१८ केरला फ्लड’ या चित्रपटाची भारताकडून निवड करण्यात आली होती.