-दत्ता जाधव
केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळालेल्या लडाखमध्ये जर्दाळू हे मुख्य फळपीक आहे. वेगळा रंग आणि चवीमुळे येथील जर्दाळू जगप्रसिद्ध आहेत. यंदाच्या हंगामात ३५ टन ‘लडाख जर्दाळू’ या नावाने ते जगाच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्याविषयी…
‘लडाख जर्दाळू’चे जगाला आकर्षण का?
लडाखच्या लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जर्दाळूचे उत्पादन घेतले जाते. जर्दाळू हे लडाखचे मुख्य फळपीक आहे. लडाखी भाषेत जर्दाळूला चुल्ली, हलमन, खुबानी असे म्हटले जाते. दोन्ही जिल्ह्यांत एकूण १५,७८९ टन जर्दाळूचे उत्पादन होते. त्यापैकी १,९९९ वाळलेल्या जर्दाळूचे उत्पादन होते. लडाख हा देशातील सर्वांत मोठा जर्दाळूचे उत्पादन करणारा केंद्रशासित प्रदेश आहे. लडाखमध्ये एकूण २,३०३ हेक्टर क्षेत्र जर्दाळूच्या लागवडीखाली आहे.
‘लडाख जर्दाळू’च्या निर्यातीसाठी केंद्र सरकार सक्रिय?
केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिल्यानंतर लडाखच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, एकूण जर्दाळू उत्पादनापैकी स्थानिक पातळीवरच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एकूण उत्पादित जर्दाळूपैकी अत्यंत कमी जर्दाळू बाहेर विक्रीसाठी पाठविला जातो. दर्जेदार जर्दाळूच्या उत्पादनासाठी लडाख जगभरात प्रसिद्ध आहे. जर्दाळूला जागतिक बाजारात चांगली मागणी असल्यामुळे उत्पादनात वाढ करून निर्यात वाढविण्याची मोठी संधी स्थानिकांना आहे. येथील जर्दाळूच्या व्यापाराला चालना देण्याचे प्रयत्न सध्या केंद्र सरकार, लडाख केंद्रशासित सरकार आणि कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) करीत आहे.
‘लडाख जर्दाळू’चे वेगळेपण काय ?
जर्दाळूचे झाड एकदा लावले की ते सुमारे पन्नास वर्षे उत्पादन देते. त्याच्या विविध जातींच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून एका वर्षात सरासरी ८० किलो फळे मिळतात. ओल्या जर्दाळूंची स्थानिक बाजारातील किंमत सुमारे १०० रुपये प्रति किलो आहे. तर वाळविलेल्या जर्दाळूला ५००-६०० रुपये किलोपर्यंत स्थानिक बाजारात मूल्य मिळते. जर्दाळूची फळे पिवळा, पांढरा, काळा, गुलाबी आणि तपकिरी रंगात आढळतात. याच्या फळांमध्ये आढळणाऱ्या बिया बदामासारख्या असतात. ओले जर्दाळू खाण्यासाठी वापरतात, त्याच्या ताज्या फळांपासून ज्यूस, जॅम आणि जेली तयार केली जाते. या शिवाय चटणीही बनवली जाते. सुके, वाळलेले जर्दाळू सुकामेवा म्हणून वापरतात.
भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्नशील ?
लडाखमधील जर्दाळू अत्यंत चवदार आहेत. गुलाबी, पांढऱ्या, तपकिरी रंगाच्या जर्दाळूंमुळे त्याचे वेगळेपण आणखी उठून दिसते. त्यामुळे जर्दाळूच्या भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) प्रयत्न सुरू आहेत. जर्दाळूचे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. कोणत्याही प्रकारचे औषध, खते , रसायने वापरली जात नाहीत. नैसर्गिक पद्धतीने ते वाळविले जाते. लडाखमधून कृषी आणि खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय विशेष प्रयत्न करीत आहे. त्यांच्यामार्फत कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपडा ) वतीने ‘लडाख जर्दाळू’ या नावाने एक ब्रँण्ड तयार करण्यात आला आहे. या ब्रॅण्डअंतर्गत लडाखमधून निर्यात वाढविण्यासाठी जर्दाळूच्या मूल्य साखळीचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार यांच्याशी समन्वय साधून निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
जर्दाळूच्या उत्पादनाला मर्यादा का?
जर्दाळूसह अन्य स्थानिक कृषी-उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाने पुढाकार घेतला आहे. तरीही जर्दाळूच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे आहेत. येथील स्थानिकांना हे नगदी पीक आहे, या विषयीची जाणीवच कमी आहे. बहुतेक जर्दाळू पक्व होऊन झाडावरून खाली पडतात, ते तिथेच कुजतात. हंगाम सुरू असताना जर्दाळूच्या झाडाखाली कुबट वास दरवळतो. अनेक स्थानिक जाती असल्या तरी मोजक्याच जाती गोड आणि निर्यातक्षम दर्जाच्या आहेत. अन्य जर्दाळू कडू किंवा चव नसलेल्या आहेत. लडाखमध्ये जर्दाळूच्या स्वतंत्र बागा फारशा दिसत नाहीत. घरासमोर, परसात, शेतीच्या बांधावर जर्दाळूचे झाड दिसते. व्यावसायिक पद्धतीने शेती होताना दिसत नाही. पिकलेल्या जर्दाळूपासून स्थानिक मद्य बनवितात, त्याचा वापर ते वर्षभर करतात. वाळलेले जर्दाळू बर्फ पडतानाच्या दिवसात प्रामुख्याने खाण्यासाठी वापरतात. तेथील स्थानिक वातावरण थंड असल्यामुळे जर्दाळू वाळविणे हा एक प्रश्न आहे. वाळविलेले जर्दाळू विकण्याच्या बाजारपेठा विकसित झालेल्या नाहीत. लेह, कारगिलमध्ये आल्याशिवाय जर्दाळूला बाजार मिळत नाही. तिथेही पर्यटकांकडून खरेदी झाली तरच चांगला दर मिळतो.
स्थानिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी जागृती?
अपेडाने लडाखच्या फलोत्पादन विभागाच्या समन्वयाने कारगिल आणि लेहमध्ये जर्दाळूच्या व्यवस्थापनाविषयी जनजागृती मोहीम आयोजित करण्याची योजना आखली आहे, ज्यात शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, काश्मीर आणि उच्च उंचीवरील संरक्षण संस्थेचे शास्त्रज्ञ आणि संशोधक शेतकऱ्यांना त्यांच्या जर्दाळूच्या बागा/झाडांच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय अपेडा ताज्या जर्दाळूचे पॅकिंग, वाहतुकीचे नियम, ब्रँड प्रमोशन ‘लडाख जर्दाळू’ च्या चांगल्या गुणवत्तेवर भर देत आहे. अपेडा लडाख सरकारच्या मदतीने स्थानिक पातळीवर निर्यातीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करत आहे. प्रतवारी करणे, एकात्मिक पॅक हाऊस सुविधा, शीतगृह, प्री-कूलिंग युनिट आणि पॅक हाऊस ते निर्यातीच्या ठिकाणापर्यंत शीतसाखळीतून वाहतुकीच्या सुविधांसाठी प्रयत्न केले जात आहेत.
जागतिक बाजाराकडून चांगला प्रतिसाद?
अपेडाने २०२१ मध्ये लडाखच्या जर्दाळूच्या निर्यातीची चाचणी करण्यासाठी पहिली खेप दुबईला पाठवली होती. त्याचे दुबई बाजारात चांगले स्वागत झाले. अद्वितीय चव आणि सुगंधामुळे ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. अपेडाने १४ जून २०२२ रोजी लेह येथे आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन केले होते. भारत, अमेरिका, बांगलादेश, ओमान, दुबई, मॉरिशस इत्यादी देशांमधील ३० हून अधिक खरेदीदारांना लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील जर्दाळू आणि इतर कृषी उत्पादनांच्या उत्पादक आणि पुरवठादारांशी संवाद साधण्यासाठी एकत्र केले गेले. यंदाच्या म्हणजे २०२२ च्या हंगामात लडाखमधून ३५ टन ताज्या जर्दाळूंची प्रथमच विविध देशांमध्ये निर्यात करण्यात आली. २०२२च्या हंगामात सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनामसारख्या देशांमध्ये ‘लडाख जर्दाळू’ पाठवण्यात आले.