Lalit Modi Vanuatu Citizenship : विविध आरोपांमुळे देशातून फरारी झालेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे ललित मोदींनी त्यांचा पासपोर्ट परत करण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे अर्ज केला आहे. त्यांनी वानुअतू या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. वानुअतू हा दक्षिण प्रशांत महासागरातील एका लहान बेटावर वसलेला देश आहे. अमेरिकेप्रमाणेच या देशानेही ‘गोल्डन व्हिसा’ देण्याची योजना सुरू केली आहे. दरम्यान, वानुअतूचे नागरिकत्व कुणाला मिळवता येतं? त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागते? याबाबत जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रडखडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि देशात परदेशी नागरिकांची गुंतवणूक वाढावी यासाठी जगभरातील अनेक देशांनी सध्या गोल्डन व्हिसा देण्याची योजना सुरू केली आहे. अमेरिका, ग्रीस, माल्टा, तुर्की, मोंटेनेग्रो, अँटिग्वा, बारबुडा, डोमिनिका व इजिप्तसारखे देश परदेशी नागरिकांना ‘गोल्डन व्हिसा’मार्फत देशात अधिकृत रहिवासाची परवानगी देत आहेत. वानुअतू या देशाचा ‘गोल्डन व्हिसा’ही अत्यंत लोकप्रिय आहे.

वानुअतूच्या ‘गोल्डन व्हिसा’साठी काय अटी?

गुंतवणूक स्थलांतर फर्म ग्लोबल रेसिडेन्स इंडेक्सच्या वेबसाइटनुसार, “वानुअतूचा गोल्डन व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद आहे. त्यासाठी परदेशी नागरिकांना देशात ठरावीक प्रकारची गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर व्हिसासाठी खूपच कमी कागदपत्रे आवश्यक आहेत. ही सर्व कागत्रपदे डिजिटल पद्धतीनं सादर करून देशाचं नागरिकत्व मिळवता येऊ शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वानुअतूचं नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्जदाराला देशात पाऊल ठेवण्याची आवश्यकता नाही.

आणखी वाचा : भगतसिंग यांची फाशी महात्मा गांधी रोखू शकले असते का?

वानुअतूच्या नागरिकत्वासाठी किती खर्च येतो?

वानुअतूचं नागरिकत्व मिळविण्यासाठी जवळपास १,३५,५०० ते १,५५,५०० डॉलर्स (भारतीय चलनात १.१८ कोटी ते १.३५ कोटी रुपये)पर्यंत खर्च येतो. त्यामध्ये चार जणांच्या कुटुंबासाठी नागरिकत्व खरेदी करण्याचे पर्यायदेखील असतात. अर्ज दाखल केल्यानंतर प्रक्रियेचा कालावधी ३० ते ६० दिवसांपर्यंत असतो. २०१९ मध्ये बीबीसीनं वृत्त दिलं होतं की, देशाच्या महसुलात पारपत्र विक्रीचा वाटा सुमारे ३०% इतका आहे.

गुंतवणूकदारांना कोणत्या सुविधा मिळतात?

गोल्डन व्हिसाद्वारे वानुअतूचं अधिकृत नागरिकत्व मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो. वानुअतूचं पारपत्र तब्बल ११३ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी देतं. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगभरातील १९९ देशांपैकी वानुअतूचं पारपत्र ५१ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबिया (५७), चीन (५९) व इंडोनेशिया (६४) यांसारख्या देशांनाही वानुअतूच्या पासपोर्ट योजनेनं मागे टाकलं आहे. या यादीत भारत ८० व्या क्रमांकावर आहे.

मार्च २०२२ पर्यंत वानुअतूचं पारपत्र खूपच शक्तिशाली मानलं जात होतं. मात्र, त्यानंतर युरोपीय परिषदेनं सुरक्षा चिंतेमुळे सुवर्ण पारपत्र योजनेसंबंधी युरोपीय संघाच्या व्हिसामुक्त प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली. फेब्रुवारी २०२३ मध्ये ही बंदी कायमची करण्यात आली. वानअतूमधील नागरिकांकडून सरकार अत्यंत कमी प्रमाणात कराची वसुली करतं. येथील नागरिकांना उत्पन्न कर, भांडवली नफा कर, वारसा कर व मालमत्ता कर भरण्याची आवश्यकता नाही.

वानअतूचं दरडोई उत्पन्न किती?

देशात व्हॅटसारखे अप्रत्यक्ष कर, तसेच मालमत्तेच्या व्यवहारांवर कर आकारले जातात; परंतु त्याचे प्रमाण दक्षिण पॅसिफिकमधील इतर देशांच्या करांच्या तुलनेत खूपच कमी आहे. याच कारणामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी वानअतूमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकीबरोबर त्यांना देशाचे अधिकृत नागरिकत्वही मिळत आहे. वानअतू हा आर्थिक बाबतीत अत्यंत गरीब देश मानला जातो. देशाचे दरडोई उत्पन्न अंदाजे ३,५१५.२ अमेरिकन डॉलर इतके आहे. या ठिकाणी राहणारे बहुतांश लोक शेती आणि मच्छीमारीचा व्यवसाय करतात. देशाच्या आर्थिक विकासासाठी बाह्य मदतीची आवश्यकता आहे.

वानअतू होतोय गुन्हेगारांचा अड्डा?

अलीकडच्या वर्षांत वानअतूला अनेक भ्रष्टाचार घोटाळ्यांचा सामना करावा लागला आहे. जागतिक गुन्हेगारी संघटनांनी देशाच्या नागरिकत्व योजना आणि कर कायद्यांचा गैरवापर केल्याचे आरोप होत आहेत. २०२० मध्ये वानअतूनं जारी केलेल्या २००० हून अधिक गोल्डन व्हिसाचे विश्लेषण करताना ‘द गार्डियन’नं वृत्त दिलं की, ज्या व्यक्तींना देशानं अधिकृत नागरिकत्व दिलं आहे, त्यामध्ये एका सीरियन व्यावसायिकाचा समावेश आहे; ज्याच्या व्यवसायावर अमेरिकेनं बंदी घातली होती.

हेही वाचा : पीएचडीधारक विद्यार्थ्याचा ६० महिलांवर बलात्कार, व्हिडीओही काढले; घटनेला वाचा कशी फुटली?

त्याशिवाय उत्तर कोरियातील एक वादग्रस्त राजकारणी व एका इटालियन व्यावसायिकालाही वानुअतूचं अधिकृत नागरिकत्व मिळालं आहे. या दोन्ही व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील कुख्यात गँगस्टर व दक्षिण आफ्रिकेत ३.६ अब्ज डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी चोरणाऱ्या व्यक्तीलाही वानुअतूनं अधिकृत नागरिकत्व दिल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, थोड्याशा गुंतवणुकीच्या आधारे वानुअतूकडून घोटाळेबाजांना नागरिकत्व दिलं जात आहे. ही चिंतेची बाब असून देशानं आपल्या नियमांत बदल करायला हवा, असं काही जणांचं म्हणणं आहे.

ललित मोदींवर काय आरोप आहेत?

ललित मोदींनी यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ललित मोदींना बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आलं होतं. आयपीएलच्या २०१० मधील स्पर्धेनंतर त्यांनी देश सोडला होता. तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं काय सांगितलं?

ललित मोदींनी वानुअतूचं नागरिकत्व घेतल्याच्या वृत्तांवरील प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी, “लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात ललित मोदींनी भारतीय पारपत्र परत करण्यासाठी अर्ज केला आहे. त्याबाबतची माहिती मंत्रालयाला देण्यात आली आहे. तसेच कायद्यानुसार ललित मोदींविरुद्ध असलेले सर्व खटले सुरू ठेवले जातील. सध्याच्या नियम आणि प्रक्रियांच्या आधारे सर्व तपासणी केली जाईल,” असंही स्पष्ट केलं आहे.