रस्त्यावरील टोळीयुद्ध, सुपारी घेऊन हत्या, खंडणी वसुली, पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झालेले गुंड आदी प्रकार महाराष्ट्रसाठी नवीन नाहीत. नव्वदच्या दशकात दाऊद आणि अन्य टोळ्यांमधील वाद विकोपाला गेला आणि मुंबईत टोळीयुद्ध सुरू झाले. भर दिवसा प्रतिस्पर्ध्यांवर बेछुट गोळीबार करणाऱ्या गुंडांना चकमकीत ठार मारून मुंबई पोलिसांनी टोळीयुद्धाला लगाम घातला. त्या काळात दाऊद, गवळी, नाईक आदी टोळ्यांतील गुंड व त्यांच्या कार्यपद्धतीचा पोलिसांनी अभ्यास केला आणि कारवाई सुरू केली होती. बिष्णोई टोळी प्रत्येक गुन्ह्यासाठी नवीन गुंडांचा वापर करीत आहे. त्यामध्ये बहुतांश अल्पवयीन अथवा किशोरवयीन तरुणांचा वापर होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. भविष्यात ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अधिक घातक ठरण्याचीच चिन्हे आहेत. यासंदर्भात घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोळीत तरुण कसे सामील होतात?

न्यायालय किंवा कारागृहात जाणाऱ्या-येणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यात तो मिश्यांना पीळ देताना, कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. या चित्रफिती समाजमाध्यमांवर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. मध्य प्रदेशातील दुर्लभ कश्यपच्या टोळीनेही अशाच कार्यपद्धतीचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्या टोळीतही अल्पवयीन मुलांचा भरणा होता. समाजमाध्यमांच्या आभासी विश्वात रममाण होणारी गरीब घरातील अल्पवयीन मुले, तरुण या चित्रफितींमुळे प्रभावित होतात आणि त्यांच्या मनात लॉरेन्ससारखा मोठा डॉन बनण्याची इच्छा निर्माण होते. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणारे आणि बाबा सिद्दिकी यांची हत्या करणारे आरोपी गरीब कुटुंबातील आहेत. काही जण मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना काम झाल्यावर चांगली रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत बिष्णोई टोळीकडून झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वेगवेगळ्या तरुणांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे तरुण अन्य राज्यात गुन्हेगारी कृत्य करण्यास तयार असतात, ही बाब तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?

सिद्धू मुसेवाला हत्येतील आरोपी किशोरवयीन

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला आणि बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात गोळीबार करणारे गुंड तरुण होते. मुसेवालावर गोळीबार करणारा एक गुंड केवळ १९ वर्षांचा होता. तत्पूर्वी राजस्थानमध्ये त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल होता. झारखंडमधील दोन अल्पवयीन मुली भटिंडा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सेल्फी घेत असताना पकडल्या गेल्या. आपण कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या चाहत्या आहेत, असे त्यांनी सांगितले. त्या दोघी बिष्णोईला भेटण्यासाठी झारखंडहून भटिंडाला आल्या होत्या. दोघींनाही तुरुंगाबाहेर सेल्फी काढून आपल्या मित्रांना पाठवायचा होता. कोवळ्या वयातील मुलांमधील हे वाढते आकर्षण गंभीर आहे. बिष्णोई टाळीमध्ये ७०० हून अधिक गुंड आहेत, त्यापैकी ३०० पंजाबशी संबंधित आहेत. बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांचा फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबसारख्या समाजमाध्यमांद्वारे प्रचार करण्यात आला. बिष्णोई टोळीने २०२०-२१ पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये मिळवले आणि तो पैसा हवालामार्फत परदेशात पाठवला.

दाऊद, गवळीपेक्षा वेगळी कार्यपद्धती?

नव्वदच्या दशकात मुंबईत संघटित टोळ्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. प्रत्येक टोळीचे काही ठरलेले हस्तक होते. पोलिसांना त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती होती. त्यामुळे त्यांना रोखणे तुलनेने सोपे होते, असे जाणकारांचे मत आहे. त्या काळात दाऊद टोळीमध्ये छोटा राजन, सावत्या, गवळी टोळीमध्ये सदा मामा पावले यासारखे गुंड प्रचलित होते. पण बिष्णोई टोळी परदेशात वसलेले म्होरके, मजूर, अल्पवयीन मुलांमार्फत गुन्हेगारी कृत्ये करून घेत आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी कारवाईचा अंदाज बांंधणे कठीण होते.

हेही वाचा : हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?

समाजमाध्यमांवर लक्ष हवे?

मुंबई पोलिसांसाठी संघटित गुन्हेगारी नवी नाही. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेकडे अशा टोळ्यांच्या कारवाया रोखण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबई पोलीस अशा टोळ्यांशी सहज दोन हात करू शकतात. समाजमाध्यमांतून या टोळ्याचा होणारा प्रचार रोखणे आवश्यक आहे. कमी वयातील मुले अशा टोळ्यांकडे आकर्षित होऊ शकतात. हा प्रकार सामान्यांच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे समाजमाध्यमांवरील या टोळ्यांच्या प्रचाराला वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi gang a new youth for every crime how gang is dangerous than dawood and gawli gang print exp css