राखी चव्हाण
भारतातच आढळणाऱ्या आणि आता नामशेषत्वाच्या मार्गावर असलेल्या तणमोर (लेसर फ्लोरिकन) पक्ष्याला वाचवण्यासाठी राजस्थानमधील अजमेर येथील ९३१ हेक्टर गवताळ प्रदेशावर संवर्धन राखीव घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली. ‘बस्टर्ड’ कुटुंबातील हा सर्वात लहान पक्षी असून पूर्वी तो भारतीय गवताळ प्रदेशात सहज आढळत होता. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये तो आता केवळ २५०-३००च्या संख्येत आहे. आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या अस्सल भारतीय पक्ष्याच्या सद्य:स्थितीचा घेतलेला आढावा.
‘आययूसीएन’च्या लाल यादीत तणमोराचे स्थान काय?
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) लाल यादीमध्ये जगातील वेगवेगळ्या प्रजातींचे त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अधिवासाच्या अद्ययावत परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण करण्यात येते. या यादीमध्ये भारतात आढळणाऱ्या तणमोर (लेसर फ्लोरिकन) या पक्ष्याला ‘संकटग्रस्त’श्रेणीमधून ‘अतिसंकटग्रस्त’ श्रेणीत हलवण्यात आले आहे. भारतात प्रदेशनिष्ठ असलेल्या पक्ष्याचे अस्तित्व आणि त्याच्या अधिवासाला बसलेला विळखा आता आणखी घट्ट होत आहे. ‘अतिसंकटग्रस्त’ श्रेणीनंतर पुढची श्रेणी ही विलुप्तीची आहे आणि तणमोरांच्या संख्येत झालेली घट ही त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला गवताळ अधिवास न राखल्यामुळे झाली आहे.
तणमोर प्रजातीला धोका कधीपासून?
सारस पक्ष्याप्रमाणेच विणीच्या हंगामात नर तणमोर मादीला आकर्षित करण्यासाठी विशेष नृत्य करतो. यावेळी गवतातून हवेत झेप घेताना तो दिसतो आणि याचाच फायदा घेत ब्रिटिशांनी त्याची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच विलुप्तीच्या दिशेने या पक्ष्याची वाटचाल सुरू झाली होती. ज्येष्ठ पक्षीअभ्यासक दिवंगत डॉ. सलीम अली यांनीदेखील या पक्ष्याची शिकार होत असल्याची नोंद केली. ब्रिटिशांनी तणमोरांची शिकार करण्याबरोबरच या पक्ष्यांच्या अधिवास असणाऱ्या गवताळ प्रदेशाची ‘वेस्ट लॅण्ड’ म्हणून नोंद केली. भारतीयांनी देखील ब्रिटिशांचीच ‘री’ ओढली. त्यामुळे तणमोराचा हा अधिवास नष्ट होऊ लागला आणि परिणामी त्यांची संख्याही कमी झाली.
तणमोराचे अधिवास क्षेत्र कोणते?
तणमोर हा भारतीय उपखंडात प्रदेशनिष्ठ असणारा पक्षी आहे. नेपाळच्या तराई प्रदेशात ते एकेकाळी मोठ्या संख्येत होते. मात्र, आता या भागात ते क्वचितच आढळतात. तणमोरांना पाकिस्तानमध्येदेखील पाहिले गेले आहे आणि बांगलादेशातूनही त्यांच्या नोंदी आहेत. बीएनएचएसच्या जून २०२० साली प्रकाशित अहवालानुसार गुजरात, आग्नेय राजस्थान, वायव्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्हा आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तणमोर पक्ष्यांचे प्रजनन क्षेत्र सीमित झाले आहे. यात राजस्थानमधील अजमेर, भिलवाडा, टोंक आणि प्रतापगड जिल्ह्यांच्या लगतच्या क्षेत्राचा समावेश आहे. तर गुजरातमधील वेलावदार काळवीट अभयारण्य, भावनगरचा परिसर, सुरेंद्रनगर, अमरेली, राजकोट, जुनागढ येथील काही ठिकाणांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशातील सैलाना अभयारण्य, सरदारपूर अभयारण्य, धार, पेटलावाडा, झाबुआ, जिरान, नीमच, आंध्र प्रदेशातील रोलपाडू अभयारण्य, महाराष्ट्रातील अकोला, वाशीम आणि कर्नाटकातील बिदर या प्रदेशांचा समावेश आहे.
तणमोराच्या संवर्धनामागील समस्या काेणती?
तणमोर हा पक्षी एकाच परिसरात प्रजनन करतो आणि त्यानंतर हिवाळी स्थलांतर करतो. स्थलांतरानंतर तो पुन्हा प्रजनन परिसरात परततो. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित राखणे आवश्यक आहे. मात्र, अजमेरमधील बरेच गवताळ अधिवास आता शेतीसाठी वापरले जात आहेत. अशा परिस्थितीत तणमोर हे सारसप्रमाणेच शेतजमिनीत घरटी बांधत आहेत. अशावेळी कीटकनाशके, यंत्रसामग्री आणि भटक्या कुत्र्यांमुळे तणमोरांना, त्यांच्या अंड्यांना आणि पिल्लांना धोका निर्माण होतो. तसेच गवताळ प्रदेशात वेडी बाबूळसारख्या आक्रमक वनस्पतींची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करणे ही समस्या आहे.
महाराष्ट्रात तणमोर संवर्धनाची शक्यता आहे का?
महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घेतल्यास गेल्या वर्षभरामध्ये राज्यातून तणमोर पक्ष्यांच्या नोंदी समोर आल्या आहेत. राजस्थानमध्ये ‘उपग्रह टॅग’ केलेला ‘रवी’ नामक नर तणमोर पक्षी औरंगाबादमध्ये स्थलांतरित झाला होता. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्येही एका मादी तणमोर पक्ष्याचे छायाचित्र ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये कैद झाले होते. याशिवाय सोलापूरमधूनही एक मादी तणमोर पक्ष्याचा बचाव करण्यात आला होता. पूर्वीच्या नोंदीनुसार नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासह नागपूर, अकोला आणि इतर काही ठिकाणे ही तणमोर पक्ष्यांची मुख्य प्रजनन क्षेत्रं होती. सद्य:परिस्थितीत अहमदनगर, सोलापूर, नाशिक, बीड, अकोला, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, पुणे, लातूर, यवतमाळ, वाशीम आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तणमोर पक्ष्याला आवश्यक असणारा गवताळ अधिवास काही प्रमाणात शिल्लक आहे. या ठिकाणी तणमोरांचा कायमस्वरूपी अधिवास असण्याची शक्यताही आहे. त्याचा अभ्यास करून संवर्धन केल्यास येथेही तो स्थिरावू शकतो.
rakhi.chavhan@expressindia.com