दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची गणना २०२० साली करोनामुळे होऊ शकली नाही. त्या वर्षी सिंहांच्या संख्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पाच वर्षांनी आता पुन्हा नियमित सिंहगणना होणार असून त्यातून सिंहांची प्रत्यक्षातली संख्या समजेल.

२०२५ मध्ये होऊ घातलेली सिंहगणना कशी असेल?

२०२५ ची सिंहगणना अंदाजे ३५ हजार चौरस किलोमीटर परिसरात होणार आहे. ती सौराष्ट्रातील १३ प्रशासकीय वन विभागांमध्ये केली जाणार असून त्यात गीर पश्चिम, गीर पूर्व आणि जुनागढ, भावनगर, पोरबंदर आणि इतर प्रदेशांमधील विविध वन विभागांचा समावेश आहे. दीड ते दोन हजार क्षेत्रीय कर्मचारी या जनगणनेत सहभागी होतील. वैयक्तिक ओळखपत्रे, जीपीएस स्थाने, रेडिओ कॉलर क्रमांक, डिजिटल प्रतिमा आणि संख्या क्रमांक यासह ते तपशीलवार डेटा गोळा करतील आणि तो ई-गुजवन प्रणालीत एकत्रित करतील.

सिंहगणना करण्याची पद्धत कशी विकसित झाली?

भावनगरच्या के. एस. धर्मकुमारसिंह यांनी ऑगस्ट १९५९ मध्ये इंडियन बोर्ड फॉर वाइल्डलाइफ, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या ‘फील्ड गाइड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया’ मध्ये सर्वप्रथम या गणनेची मार्गदर्शक तत्त्वे मांडली. राज्य वन विभागाने १९६८ ते १९९५ पर्यंत ‘लाइव्ह बेटिंग’ या पद्धतीचा वापर केला. नंतर २००० मध्ये स्वीकारलेल्या ‘डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन’ किंवा ‘ब्लॉक काउंट’ पद्धतीमध्ये सिंहगणना क्षेत्र जंगलांमधील बीट्स आणि वन क्षेत्राबाहेरील गाव समूहांमध्ये विभागले जाते. ही पद्धत अधिक किफायतशीर, कमी वेळेत, कमी मनुष्यबळात गणना करणारी आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी आहे.

२०२० मध्ये सिंहांच्या संख्येचा अंदाज का?

करोनामुळे २०२० मध्ये सिंहगणना होऊ शकली नाही. त्यामुळे वन विभागाने २०२० मध्ये पाच व सहा जूनच्या मध्यरात्री (पौर्णिमा) काही ठोकताळ्यांनुसार संख्येचा अंदाज घेऊन सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढून ६७४ झाल्याचे जाहीर केले. २०१५ च्या गणनेनुसार गीरमध्ये ५२३ सिंह होते. २०२० मध्ये, वन विभाग भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून गणना करणार होता. मात्र, भारतीय वन्यजीव संस्थेचा सहभाग प्रत्यक्षात आला नाही.

सिंह कसे कसे नामशेष झाले?

आजमितीला संपूर्ण जगात १५ हजारांच्या आसपास सिंह आहेत. यातील ६७४ सिंह भारतात आहेत. गुजरात सोडले तर देशात इतरत्र कुठेही सिंह नाहीत. गीर अभयारण्य २५८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. तरीही सभोवतालच्या १४१२ चौरस किलोमीटर क्षेत्रात सिंह वावरताना दिसून येतात. एकेकाळी भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सिंह होते. १८७० मध्ये राजस्थानमधून, १८३४ साली दिल्लीमधून, १८४० साली बिहारमधून, १८४२ मध्ये भागलपूरमधून, १९६५ पूर्व विंध्य आणि बुंदेलखंडमधून, १८७० साली मध्य भारत व राजस्थानमधून, तर १८८० साली पश्चिम अरवलीमधून सिंह नामशेष झाले. सौराष्ट्राच्या बाहेर अखेरचा सिंह १८८४ साली संपला. १८८० दरम्यान गुना, दिसा व पालनपूर या जिल्ह्यांतून सिंह नामशेष झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन नवाब मोहम्मद रसूलखांजी बीबी यांच्या लक्षात आले की जुनागड जिल्ह्यात फक्त १२ च सिंह राहिले आहेत. त्यानंतर गीरचे जंगल संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

सिंहांच्या स्थलांतरणाचा वाद काय आहे?

देशातील सगळे सिंह एकाच राज्यात असणे धोक्याचे आहे. कारण एखादा विषाणूजन्य आजार त्या सगळ्यांचे अस्तित्व नष्ट करायला पुरेसा ठरू शकतो. या कारणासाठी तज्ज्ञांनी काही सिंहांचे मध्य प्रदेशात स्थलांतरित करून तिथे त्यांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय सिंहांचे अस्तित्व शाबूत राहावे म्हणून मध्य प्रदेशातील शिवपूर व मोरेना जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात काही सिंह पाठवण्याचा निर्णय १९९८ साली केंद्र सरकारने घेतला. त्यासाठी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून तब्बल २४ गावांमधील १६५० कुटुंबांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर ३४४ किलोमीटर कुनो राष्ट्रीय उद्यानाचा अभ्यास करून ४१३ चौरस किलोमीटर क्षेत्र करण्यात आले. त्याभोवती ९२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र बफर म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, गुजरात सरकारने सिंहांना अस्मितेचा मुद्दा बनवून ऐनवेळी मध्य प्रदेश सरकारला सिंह देण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देऊन गुजरात सरकारला पुढील सहा महिन्यांत काही सिंह मध्य प्रदेशात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. तरीही गुजरात सरकारने सहकार्य केले नाही. आता त्याच कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून चिते स्थलांतरित करण्यात आले आहेत.

Story img Loader