Liquor ban comes into effect at 19 religious sites in MP: मध्य प्रदेश सरकारने १ एप्रिलपासून १९ शहरांमध्ये दारूबंदी लागू केली आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातील उज्जैन, ओंकारेश्वर, माहेश्वर, मांडलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, दतिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर आणि अमरकंटक यांसह एकूण १९ धार्मिक स्थळांवर मद्यविक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी एक महापालिका, सहा नगरपरिषदा, सहा नगरपंचायती आणि सहा ग्रामपंचायतींमध्ये लागू करण्यात आली आहे. सालकनपूर, कुंडलपूर, बंदकपूर, बर्मनकलान, बर्मनखुर्द आणि लिंगा या भागांमध्ये ही बंदी लागू होणार आहे. या निर्णयाचा उद्देश धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे आणि मद्यप्राशनाशी संबंधित समस्या दूर करणे हा आहे. परंतु, उज्जैनमधील काळभैरव मंदिरात देवाला दारू अर्पण करण्याची खास परंपरा यामुळे बंद होणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

खाजगी वापरास परवानगी, परंतु सार्वजनिक ठिकाणी मद्यपानबंदी

भाजप नेते अनिल फिरोजिया यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांचे आभार मानले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. उज्जैन हे एक पवित्र शहर आहे आणि अनेक वर्षांपासून नागरिक आणि साधू-संत दारूबंदीची मागणी करत होते. आता मुख्यमंत्री महोदयांनी हा आदेश दिला आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.” फिरोजिया यांनी स्पष्ट केले की, उज्जैनमधील दारू दुकाने बंद करण्यात येतील. खाजगी निवासस्थानी मात्र वैयक्तिक पातळीवर मद्यपान करण्यास बंदी नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे पूर्णपणे निषिद्ध असून, नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

काळभैरव मंदिरात दारू अर्पण करण्याची खास परंपरा

या बंदीचा उज्जैनमधील प्रसिद्ध काळभैरव मंदिरावर परिणाम होणार नाही. या मंदिरात भक्त दारू अर्पण करतात ही एक खास परंपरा आहे. याबाबत अनिल फिरोजिया म्हणाले, “उज्जैनमध्ये काही मंदिरांमध्ये देवतेस दारू अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. प्रसिद्ध काळभैरव मंदिर हे त्याचे उदाहरण आहे. नव्या धोरणानुसार मंदिर परिसरातील दारू दुकाने बंद केली जातील. परंतु, बाहेरून येणारे भक्त देवाला अर्पण करण्यासाठी दारू आणू शकतील. देवतेस दारू अर्पण करण्यावर कोणतीही बंदी नाही, परंतु विक्रीवर बंदी राहील.”

सरकारच्या कठोर भूमिकेचे स्वागत

खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही सरकारच्या कठोर भूमिकेचे स्वागत केले आहे. “मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर संपूर्ण दारूबंदी लागू करणे हे अत्यंत स्तुत्य पाऊल आहे.,” असं पाटील यांनी सांगितलं. त्यांनी नमूद केलं की, या बंदीमुळे धार्मिक भावना सुरक्षित राहतील, असेही ते म्हणाले.

काळभैरव (विकिपीडिया)

कालभैरवाला दारू का अर्पण केली जाते?

कालभैरव मंदिर हे उज्जैनमध्ये आहे. कालभैरव हा या शहराचा क्षेत्रपाल आहे. या मंदिरात कालभैरवाला दारू अर्पण केली जाते. हे मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधल्याचा उल्लेख स्कंद पुराणातील अवंती कांडात आहे. सध्याच्या मंदिर स्थापत्यावर मराठाकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव आढळतो. सध्याची भैरवाची मूर्ती दगडातील असून त्यावर शेंदुराचं लेपन केलेलं आहे. मंदिरातील देवतेस मद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. ही प्रथा तांत्रिक परंपरेतील ‘पंचमकार’ या पाच अर्पणांपैकी एक मानली जाते. पंचमकरांमध्ये प्रामुख्याने मद्य (दारू), मांस (मांसाहार), मीन किंवा मत्स्य (मासे), मुद्रा, मैथुन (संभोग) इत्यादींचा समावेश होतो. पूर्वीच्या काळात या सर्व गोष्टी प्रत्यक्ष देवतेस अर्पण केल्या जात असत. मात्र, आजच्या काळात यापैकी फक्त मद्य प्रत्यक्ष अर्पण केलं जातं, उर्वरित चार बाबींचा समवेश प्रतिकात्मक विधींमध्ये केला जातो.

कालभैरव मंदिर (विकिपीडिया)

दारू अर्पण विधि

मंदिराबाहेर विक्रेते नारळ, फुले आणि दारूची बाटली असलेली अर्पण करण्यासाठीच्या वस्तूंच्या टोपलीची विक्री करतात. २०१५ साली राज्य सरकारने अधिकृत दारू विक्री काऊंटर मंदिराजवळ उभारले होते. या काऊंटरवर देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारची दारू उपलब्ध होते. दररोज शेकडो भाविक देवतेस दारू अर्पण करतात. भाविक दारूची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. पुजारी ती दारू एका ताटलीत ओततो, प्रार्थना करतो आणि ती ताटली देवतेच्या ओठांजवळ नेतो. दारूच्या बाटलीतील सुमारे एक तृतीयांश भाग परत भाविकाला ‘तीर्थ’ म्हणून दिला जातो.

(विकिपीडिया)

उज्जैनमधील काळभैरव मंदिरात दारू अर्पण करण्याची परंपरा ही तांत्रिक श्रद्धा, स्थानिक आस्था आणि सामाजिक वास्तव यांचं अनोखं मिश्रण आहे. मध्य प्रदेश सरकारने लागू केलेल्या दारूबंदी धोरणात धार्मिक स्थळांवरील शिस्त आणि पवित्रतेचा आग्रह ठेवलेला असला, तरी या परंपरेचा सन्मान राखत ‘अर्पण करण्यासाठी दारू आणण्यास बंदी नाही’ असं स्पष्ट करून सरकारने श्रद्धा आणि कायदा यामधील संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. काळभैरव मंदिरासारख्या ठिकाणी पारंपरिक श्रद्धा सांभाळताना आणि शासनाने कुठे नियम लावायचे, हे ठरवताना सांस्कृतिक संवेदनशीलता आणि लोकभावना यांचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं, हीच गोष्ट उज्जैनच्या या उदाहरणातून दिसून येते.