अमेरिका आणि कॅनडामध्ये अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये लिस्टेरिया या जीवाणूचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. या जीवाणूमुळे अन्नपदार्थ दूषित होतात आणि त्याची बाधा होते. अमेरिकन सरकारच्या रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) १९ जुलै रोजी १२ राज्यांमध्ये या जीवाणूचा उद्रेक झाल्याची माहिती दिली आहे. कमी शिजलेल्या मांसाचे तुकडे खाल्ल्याने या जीवाणूची बाधा होत आहे. या जीवाणूमुळे आतापर्यंत दोन मृत्यूंची नोंद झाली आहे; तर २८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७ जुलै रोजी कॅनेडियन सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिस्टेरिया आणि लिस्टेरिओसिस म्हणजे काय?

लिस्टेरिया किंवा लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स हा एक प्रकारचा जीवाणू आहे. हा जीवाणू माती, वनस्पती, पाणी व सांडपाण्यात आढळतो. हा प्राणी आणि मानवांच्या विष्ठेतही आढळतो. लिस्टेरिया-दूषित अन्न खाल्ल्याने लिस्टेरिओसिस नावाचा संसर्ग होऊ शकतो.

हेही वाचा : ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर नदीत उद्घाटन सोहळा… पॅरिस स्पर्धा का ठरणार खास?

लिस्टेरिओसिसची लक्षणे कोणती?

लिस्टेरिया-संक्रमित अन्न खाणारे बहुतेक लोक सहसा आजारी पडत नाहीत. ते कसल्याही प्रकारची लक्षणेदेखील दर्शवत नाहीत. हा जीवाणू व्यक्तीच्या शरीरामध्ये दोन महिन्यांपर्यंत राहू शकतो. दोन महिन्यांनंतर लिस्टेरिओसिसची लक्षणे दिसू शकतात. एवढ्या विलंबानंतर लक्षणे दिसू लागल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा या संसर्गाशी संबंध जोडणे कठीण होऊन बसते. लक्षणांमध्ये उलट्या येणे, मळमळ होणे, पेटके येणे, तीव्र डोकेदुखी, बद्धकोष्ठता व ताप येणे यांचा समावेश होतो.

लिस्टेरिओसिस पटकन कुणाला होऊ शकतो?

कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्यांना लिस्टेरियाची बाधा पटकन होऊ शकते. गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या बाळांनाही याचा धोका असतो. वृद्ध लोक (६५ आणि त्याहून अधिक वयाचे)देखील या जीवाणूमुळे पटकन संक्रमित होऊ शकतात. अमेरिकेमध्ये या संक्रमणाचे सरासरी वय ७५ आहे. लिस्टेरिओसिसमुळे कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्यांना पटकन दवाखान्यात भरती करावे लागू शकते. त्यामुळे वृद्धांचा मृत्यूही होऊ शकतो. गर्भवती महिलांना लिस्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता १० पट जास्त असते. लिस्टेरिया संसर्गामुळे गर्भ पडणे अथवा गर्भातील बाळाचा अकाली जन्मदेखील होऊ शकतो. तसेच नवजात बाळालाही हा जीवघेणा संसर्ग होऊ शकतो. काही पदार्थांमध्ये लिस्टेरियाचा जीवाणू असण्याची शक्यता जास्त असते. या पदार्थांमध्ये दूध, कच्ची मोड आलेली कडधान्ये, डेली मीट व हॉट डॉग यांचा समावेश होतो. सॉफ्ट चीज व स्मोक्ड सीफूडमध्येदेखील लिस्टेरिया असू शकतो.

लिस्टेरिओसिसवर उपचार काय आहे?

एखाद्या व्यक्तीला झालेला संसर्ग किती वाईट आहे यावर या संक्रमणावरील उपचार अवलंबून असतात. दूषित अन्न खाल्ल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत आतड्यांसंबंधीचा लिस्टेरिओसिस दिसून येतो. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. नेहमीच्या पोटाच्या संसर्गासाठी जो उपचार दिला जातो, तोच उपचार यामध्येही दिला जातो. जर संसर्ग आतड्यांपलीकडे पसरला असेल, तर तो तीव्र लिस्टेरिओसिस मानला जातो. दूषित अन्न खाल्ल्यानंतर किमान दोन आठवड्यांनंतर या संक्रमणाची गंभीर लक्षणे दिसू लागतात.

हेही वाचा : Kathmandu Plane Crash: नेपाळमध्ये विमान अपघातांचे प्रमाण सर्वाधिक का आहे?

लिस्टेरियाच्या प्रादुर्भावाबद्दल सध्या काय माहिती उपलब्ध आहे?

सीडीसीने म्हटले, “जेव्हा एकाच दूषित अन्न किंवा पेयामुळे दोन किंवा त्याहून अधिक लोकांना एकाच प्रकारचा आजार होतो, तेव्हा त्या घटनेला अन्नजन्य रोगाचा उद्रेक, असे म्हणतात.” संसर्ग झालेल्यांची खरी संख्या ही नोंदविलेल्या संख्येपेक्षा जास्त असू शकते. कारण- या संसर्गाची लक्षणे लगेच दिसत नाहीत. त्याशिवाय यातील काही लोक वैद्यकीय मदतीशिवायही बरे होऊ शकतात. सीडीसीने १८ संक्रमित लोकांकडून माहिती घेतली. त्यापैकी १६ जणांनी मांस खाल्ले होते. कॅनडामध्येही असाच लिस्टेरियाचा उद्रेक झाला आहे. वनस्पती-आधारित रेफ्रिजरेटेड शीतपेयाच्या सेवनामुळे हा उद्रेक झाला असल्याची माहिती आहे. ‘डॅनोन सिल्क’ आणि ‘ग्रेट व्हॅल्यू’ या दोन ब्रॅण्डची ही शीतपेये आहेत. या संक्रमित उत्पादनांमध्ये बदाम, ओट्स, काजू व नारळ यांपासून बनविलेल्या दुधाचा वापर करण्यात आला होता.

सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

सीडीसीने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार अधिक जोखीम असलेल्या गटांना न शिजविलेले मांस, चीज व सॅलड टाळण्याचा सल्ला दिला आहे. रेफ्रिजरेशन केल्याने लिस्टेरियाचा जीवाणू नष्ट होत नाही. डेली मीट खाण्यापूर्वी ते १६५°F पर्यंत गरम केले पाहिजे. एवढ्या तापमानावर शिजविल्यामुळे लिस्टेरियाचा जीवाणू मरण पावतो, असेही सीडीसीने सांगितले आहे.