अमोल परांजपे
ब्रिटनच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. सरकारमधील सर्वोच्च चार पदांवर प्रथमच एकही श्वेतवर्णीय पुरुष नाही. परंपरावादी समजल्या जाणाऱ्या हुजूर पक्षाच्या सरकारमध्ये हे घडावे, हा आणखी एक धक्काच… त्यामुळे ब्रिटन वंश आणि वर्णभेदाच्या गर्तेतून बाहेर येत असल्याचे दिसत असले तरी ही केवळ राजकीय तडजोड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्णभेद मुळातूनच संपवण्यासाठी ‘सायबाच्या देशा’ला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल.
ट्रस यांची श्वेतवर्णीय पुरुषी वर्चस्वाला तिलांजली ?
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च पदे ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाची धुरा क्वासी क्वातेंग यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांचे पालक आफ्रिकेतील घाना या देशातून ब्रिटनमध्ये आले होते. ते ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय अर्थमंत्री ठरले आहेत. तर परराष्ट्र मंत्रालयाचा भारही मिश्रवर्णीय जेम्स क्लेवर्ली यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांचे वडील श्वेतवर्णीय असले, तरी आईचे पूर्वज हे पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन येथील आहेत. मंत्रिमंडळातील चौथी महत्त्वाची, गृहमंत्रीपदाची खुर्ची भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांना देण्यात आली आहे. बोरीस जॉन्सन मंत्रिमंडळातील प्रीती पटेल या दुसऱ्या भारतीय वंशाच्या नेत्याची जागा सुएला यांनी घेतली आहे. सुएला यांच्या वडिलांचे पूर्वज मुळचे गोव्याचे आहेत. ६०च्या दशकात केनियामधून त्यांनी ब्रिटनमध्ये स्थलांतर केले. तर त्यांची आई ही मॉरीशसमधील तामिळ कुटुंबातील आहे.
हुजूर पक्षाच्या मानसिकतेत बदलाची कारणे काय?
ब्रिटनमधल्या हुजूर पक्षाचे इंग्रजी नाव कन्झर्व्हेटिव्ह पार्टी असे आहे. कन्झर्व्हेटिव्ह या शब्दाचा अर्थच परंपरावादी असा आहे. श्वेतवर्णीय पुरुषी वर्चस्वाची ब्रिटनची परंपरा या पक्षात पूर्वापार रुजली आहे. अगदी २१वे शतक सुरू होईपर्यंत ब्रिटनच्या मंत्रिमंडळात गोऱ्या पुरुषांचीच मक्तेदारी राहिली आहे. २००२ साली त्या देशात पॉल बोटेंग हे पहिले कृष्णवर्णीय मंत्री झाले. हुजूर पक्षात नुकत्याच झालेल्या नेतेपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ट्रस यांचे प्रतिस्पर्धी होते. पहिल्या टप्प्यातील सर्व फेऱ्यांमध्ये ते आघाडीवरही होते. केवळ करविषयक धोरणांमध्ये कणखर भूमिका घेतल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यांचा पराभव झाला. या सर्व घटना हुजूर पक्षाची मानसिकता बदलत असल्याचे दाखवत असल्या, तरी त्यामागे राजकीय स्वार्थ नसेल, याची खात्री देता येत नाही.
राजकीय तडजोड म्हणून वंशभेदाला तिलांजली?
एकेकाळी कृष्णवर्णीयांवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला अमेरिकेसारखा देश बदलला आहे. बराक ओबामा हे त्या देशाचे पहिले गौरेतर राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची ८ वर्षांची कारकीर्द चांगली राहिली. मात्र ब्रिटनमध्ये हा बदल घडून येण्यास आणखी बराच वेळ जावा लागला. ब्रिटनमध्ये जगभरातून, विशेषतः राष्ट्रकुल देशांमधून स्थलांतरित होऊन आलेले अनेक नागरिक आहेत. हे लोक बहुतांश मजूर पक्ष (लेबर पार्टी) किंवा अन्य अल्पसंख्याक पक्षांचे मतदार राहिले आहेत. हुजूर पक्ष २०१०पासून सलग सत्तेत आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत त्यांना प्रस्थापितविरोधी मतदानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजूर पक्षाच्या पारंपारिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्रस यांनी खेळलेली ही खेळी असू शकते. वंशभेद, वर्णभेद, मुस्लिमांचा तिरस्कार ही हुजूर पक्षाची लक्षणे असल्याचा आरोप मजूर पक्षाकडून सातत्याने केला जातो. हा आरोप खोडून काढण्यासाठी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. पण राजकारणात एखादी नवी गोष्ट करण्यात हुजूर पक्ष हा कायमच आघाडीवर राहिला आहे, हेदेखील खरेच.
हुजूर पक्षाला ‘या’ बदलांचे श्रेय द्यावेच लागेल…
१८६८ साली हुजूर पक्षाने बेंजामिन डिसरिली या पहिल्या ज्यू व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले होते. मार्गारेट थॅचर, थेरेसा मे आणि आता लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिन्ही महिला पंतप्रधान हुजूर पक्षाच्या आहेत. १८९५ साली मंचरजी भोवनागरी हे पहिले आशियाई वंशाचे खासदारही याच पक्षाने प्रतिनिधीगृहात पाठवले. २०१९ साली बोरीस जॉन्सन यांचे मंत्रिमंडळ हे वांशिकदृष्या वैविध्यपूर्ण आणि तरुण ठरले. या बदलाचे श्रेय माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांना दिले गेले पाहिजे. त्यांनी सातत्याने वर्णभेदी मानसिकतेचा त्याग करण्याचे आवाहन केले आणि तशी कृतीही केली. याचा परिणाम हुजूर पक्षाच्या वर्तनात दिसू लागला आहे, असे म्हणावे लागेल. मात्र हा बदल मनापासून आहे की केवळ राजकीय खेळी, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
मात्र ‘हे’ वास्तवही बदलावे लागेल…
ब्रिटीश सरकारमधील सर्वोच्च चार पदे ही श्वेतवर्णीय पुरुषी वर्चस्वातून बाहेर आली असली तरी वंशभेद संपवण्यासाठी त्या देशाला अद्याप बरेच काम करावे लागेल. अद्याप हुजूर पक्षाच्या खासदारांपैकी केवळ एक चतुर्थांश महिला आहेत आणि ६ टक्के अल्पसंख्याक आहेत. याखेरीज ब्रिटनमधील न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि लष्कर या तीन महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये श्वेतवर्णीय पुरुषी मक्तेदारी कायम आहे. मात्र ट्रस मंत्रिमंडळाच्या निमित्ताने हुजूर पक्ष आणि ब्रिटन बदलतो आहे, हे अधोरेखित केले आहे, एवढे मात्र नक्की.