संदीप नलावडे
मॉन्स्टर म्हणजेच राक्षस हे लोककथा किंवा दंतकथांमधील काल्पनिक पात्र असले तरी स्कॉटलंडमधील ‘लॉक नेस’ या गोड्या पाण्याच्या सरोवरात एक महाकाय प्राणी किंवा मॉन्स्टर राहत असल्याची बातमी वारंवार येत असते. अनेकांनी तो पाहिल्याचा दावा केला तर काही जण हा माशाचा प्रकार असल्याचे सांगतात. नुकताच स्कॉटलंडमधील आणि अन्य देशांतील उत्साही संशोधकांनी या महाकाय मॉन्स्टरचा शोध घेण्याची मोहीम आखली आहे. ‘लॉक नेस मॉन्स्टर’ नावाचा हा राक्षस खरोखर आहे की ही केवळ अफवा आहे याविषयी…
‘लॉक नेस मॉन्स्टर’ म्हणजे काय?
जगभरातील विविध लोककथा, पुराणकथा, दंतकथांमध्ये राक्षसासारख्या दुष्ट शक्तींची संकल्पना असते. स्कॉटलंडमधील दंतकथांमध्येही ‘लॉक नेस मॉन्स्टर’ हे एक पात्र असायचे. मात्र हे पात्र नसून अशा प्रकारचा राक्षस स्कॉटिश हायलँड्स पर्वतरांगेतील लॉक नेस सरोवरात आहे, असा दावा स्थानिकांकडून केला जातो. १९३३मध्ये सर्वप्रथम तो दिसल्याचा दावा करण्यात आल्यानंतर तेव्हापासून या मॉन्स्टरचा शोध घेतला जात आहे. या सरोवरात प्राचीन काळापासून जलीय राक्षस लपून बसल्याचे या परिसरातील अनेक लोककथांमध्ये दिसून येते. या भागातील दगडी कोरीवकामांतील खांबांवरही रहस्यमय श्वापदाचे वर्णन आहे. सेंट कोलंबा नावाच्या आयरिश भिक्षूच्या चरित्रात या मॉन्स्टरचे वर्णन आढळते. ही लिखित नोंद आहे इ.स. ५६५ची. या लिखित मजकुरानुसार या महाकाय राक्षसाने एका जलतरणपटूवर हल्ला केला आणि कोलंबाने त्याला माघार घेण्यास सांगितले होते. या अक्राळविक्राळ स्वरूप असलेल्या राक्षसाविषयी स्कॉटिश नागरिकांना तेव्हापासून कुतूहल, भीती आणि विस्मय निर्माण झाला आहे.
‘लॉक नेस मॉन्स्टर’ खरोखर आहे काय?
लॉक नेस सरोवरात हा महाकाय राक्षस असल्याच्या वावड्या नेहमीच उठत असतात. काही जण तो पाहिल्याचा दावा करतात, तर काही जण हा केवळ भास असल्याचे सांगतात. १९३३ मध्ये स्थानिक ‘इन्व्हरनेस कुरिअर’ नावाच्या वृत्तपत्राने एक जोडप्याला या परिसरात नव्या बांधण्यात आलेल्या लॉचसाइड रस्त्यावर गाडी चालवताना पाण्यात एक महाकाय प्राणी पाहिल्याचे वृत्त दिले. व्हेलसारखे शरीर असलेला हा महाकाय प्राणी पाण्यात डुंबत होता आणि पाणी उकळत असल्याचा आणि मंथन होत असल्याचा भास होत होता, असे या वृत्तात म्हटले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या ‘लॉक नेस मॉन्स्टर’विषयी जनतेमध्ये पुन्हा कुतूहल निर्माण झाले.
विश्लेषण: पक्षी-गणनेचा भारतीय अहवाल काय सांगतो?
याच वर्षी डिसेंबरमध्ये ‘डेली मेल’ या प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्राने या राक्षसाचा शोध घेण्याचे ठरविले आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध सागरी शिकारी मारमाड्यूक वेथेरेलची नियुक्ती केली. वेथेरेलला या परिसरात मोठ्या पावलांचे ठसे आढळले, ते ठसे २० फूट लांबीच्या अतिशय शक्तिशाली प्राण्याचे आहे, असा दावा त्याने केला. मात्र लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मधील प्राणिशास्त्रज्ञांनी सांगितले की, वेथेरेलला सापडलेले ठसे हे छत्रीचा स्टँड किंवा ॲशट्रेपासून बनवलेले असून ते बनावट आहेत. १९३४ मध्ये ब्रिटिश डॉक्टर रॉबर्ट विल्सन याने या सरोवरात एक छायाचित्र घेतले, जे जगप्रसिद्ध झाले. या छायाचित्रात एका महाकाय प्राण्याचे डोके आणि वाढलेली मान पाण्यातून बाहेर पडल्याचे दिसते. ‘सर्जन्स फोटोग्राफ’ म्हणून हे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘डेली मेल’मध्ये प्रकाशित करण्यात आलेले हे छायाचित्र म्हणजे चलाखी असल्याचे नंतर उघड झाले. मात्र या छायाचित्राने ‘लॉक नेस मॉन्स्टर’ला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.
‘लॉक नेस मॉन्स्टर’च्या शोधासाठी सध्या काय मोहीम आखण्यात येत आहे?
‘लॉक नेस मॉन्स्टर’चा पाच दशकांतील सर्वात मोठा शोध स्कॉटलंडमध्ये यंदा घेण्यात येत आहे. त्यासाठी प्राणिमित्र, संशोधक, उत्साही तरुणांनी मोहीम आखली असून या मायावी ‘नेसी’चा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या मोहिमेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून थर्मल स्कॅनरसह ड्रोन, इन्फ्रारेड कॅमेऱ्यांसह बोटी आणि पाण्याखालील हायड्रोफोन यांचा समावेश आहे. लॉक नेस एक्सप्लोरेशनचे सहआयोजक ॲलन मॅकेन्ना यांनी सांगितले की, ‘‘पिढ्यान् पिढ्या जगाला मोहित करणारे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सर्व प्रकारचे नैसर्गिक वर्तन आणि घटनांची नोंदी करणे, अभ्यास करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे हे आमचे ध्येय आहे.’’ शोधकर्त्यांचा विश्वास आहे की थर्मल स्कॅनर अस्पष्ट जागीही कोणत्याही विचित्र विसंगती ओळखण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
चांद्रयान-३: भारतीय संस्कृतीतील चंद्राच्या, शिवापासून ते रामापर्यंतच्या पौराणिक कथा
‘लॉक नेस मॉन्स्टर’विषयी तज्ज्ञांचे मत काय?
‘लॉक नेस मॉन्स्टर’ला पाहिले असल्याचा दावा अनेक जण करत असले तरी तो केवळ आभास असावा किंवा असत्य कथन असावे, असे तज्ज्ञ सांगतात. काही तज्ज्ञांच्या मते हा व्हेलच्या प्रजातीचा महाकाय मासा असावा, तर काहींच्या मते हा प्लेसिओसॉर या डायनासोरच्या प्रजातीचा वंशज असावा. २००८ मध्ये असे वृत्त प्रसारित झाले की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा महाकाय प्राणी नष्ट झाला आहे. २०१९ मध्ये शास्त्रज्ञांनी सांगितले की लॉक नेस मॉन्स्टरच्या वारंवार दिसण्यामागील प्राणी कदाचित महाकाय ईल असू शकतो. त्यानंतर न्यूझीलंडमधील संशोधकांनी पाण्याच्या नमुन्यांमधून डीएनए काढून सर्व जिवंत प्रजातींची यादी करण्याचा प्रयत्न केला. त्यात या सरोवरात महाकाय प्राणी असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. प्लेसिओसॉर या डायनासोरच्या प्रजातीचाही कोणताही पुरावा नाही. याच परिसरात असलेल्या ‘द लॉक नेस’ सेंटरच्या मते अधिकृतपणे ११०० हून अधिक जणांनी मॉन्स्टर पाहण्याची नोंद आहे. मॉन्स्टरच्या कुतूहलापोटी जगभरातून हजारो पर्यटक या सरोवराला भेट देतात आणि त्यातून स्कॉटिश अर्थव्यवस्थेला लाखो पौंडाची भर पडते. केवळ पर्यटन व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी मॉन्स्टरच्या वावड्या उठवल्या जातात, असेही काही तज्ज्ञ सांगतात.