२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपाने आपले बहुमत गमावले आहे. १० वर्षांपासून भाजपा स्वबळावर केंद्रातील सत्ता उपभोगते आहे. मात्र, आता या निवडणूक निकालानंतर भाजपाला आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला २४० जागा प्राप्त झाल्या असून, एनडीएला एकूण २९३ जागा प्राप्त झाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीने दमदार कामगिरी करीत एकूण २३२ जागांवर विजय मिळविला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ९९ जागा प्राप्त झाल्या आहेत.
हेही वाचा : अयोध्येत राममंदिर उभारूनही भाजपाचा पराभव; उत्तर प्रदेशवासीयांनी का सोडली भाजपाची साथ?
एकुणातच एनडीए आघाडीला २७२ हा बहुमताचा जादुई आकडा पार करता आलेला असला तरीही भाजपाला आपल्या सत्तेसाठी घटक पक्षांच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामध्ये तेलुगू देसम पार्टी, जनता दल (युनायटेड), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) या प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे. या घटक पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून, इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करू शकते का, हा प्रश्न कळीचा ठरतो. असे काही खरेच घडू शकते का आणि असे घडल्यास त्याचे एकूण राजकारणावर काय परिणाम होतील, यावर एक नजर टाकू या…
हा खेळ आकड्यांचा…
सध्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएला एकूण २९३ जागा प्राप्त झाल्या आहेत. म्हणजेच एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यापैकी भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला असून, जेडीयूने १२, टीडीपीने १६ जागा प्राप्त केल्या आहेत. या दोन्ही पक्षांना एकत्रितपणे २८ जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीमधील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि इतर सर्व घटक पक्षांनी मिळून २३२ जागा प्राप्त केल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसला ९९, समाजवादी पार्टीला ३७, तर तृणमूल काँग्रेसला २९ जागा प्राप्त झाल्या आहेत. जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार व टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू हे कधी काळी इंडिया आघाडीचाही भाग होते. त्यामुळे जरी या दोन्ही पक्षांनी (एकूण जागा २८) इंडिया आघाडीमध्ये येणे पसंत केले तरीही इंडिया आघाडी बहुमताचा आकडा पार करू शकत नाही. या दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन इंडिया आघाडीच्या जागा २६२ पर्यंतच जातात.
… तरीही भरपूर जागा
तरीही आकडे आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही आघाड्या आपापल्या परीने प्रयत्न करू शकतात. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये, इंडिया आघाडीने केंद्रातील सत्तेवर दावा करायला हवा, असे विधान केले आहे. ते म्हणाले, “सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने दावा करायला हवा. मी उद्या सायंकाळी दिल्लीमधील बैठकीसाठी निघतो आहे.” पुढे ते असेही म्हणाले, “भाजपाबरोबर आता असलेले सहकारी पक्ष हे भीतीमुळे त्यांच्याबरोबर आहेत. भाजपा चंद्राबाबू नायडू यांनाही त्रास देते आहे.”
हेही वाचा : मोदी सरकारच्या दशकभराच्या बहुमतातल्या सत्तेनंतर आता सांभाळावी लागणार का सहकारी पक्षांची मर्जी?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “भारतातील सामान्य जनतेने सामर्थ्यशाली, अहंकारी राजवटीला आपली शक्ती दाखवून दिली आहे. त्यांनी एका बोटाने हुकूमशाही राजवटीला सत्तेतून कशा प्रकारे बाहेर फेकून दिले जाऊ शकते, याचे उदाहारण जगाला जगासमोर ठेवले आहे. इंडिया आघाडीने केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करायला हवा. इंडिया आघाडीतील नेते उद्या दिल्लीमध्ये भेटतील आणि पुढील दिशा ठरवतील. मी उद्या सायंकाळी दिल्लीला बैठकीसाठी जात आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याचीही चर्चा उद्या बैठकीत होईल.” दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल मंगळवारी (४ जून) स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली होती. इंडिया आघाडीने विरोधात बसायचे की सत्तास्थापनेचा दावा करायचा याबाबतचा निर्णय आम्ही उद्या (५ जून) बैठकीत घेऊ, असे ते म्हणाले.