२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (४ जून) लागले. या अठराव्या लोकसभेमध्ये ७४ महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत. २०१९ च्या लोकसभेमध्ये ७८ महिला खासदारांची निवड झाली होती. त्यामुळे आधीच्या लोकसभेशी तुलना करता, महिला खासदारांची संख्या चारने घटली आहे. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त २२ महिला खासदारांची निवड झाली होती. त्या तुलनेत ही संख्या वधारली असली तरीही भारतासारख्या लोकशाही देशामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण इतके कमी असणे प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून चिंताजनक मानले जाते. कारण- एकूण ५४३ सदस्य संख्या असलेल्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या ७४ म्हणजे १३.६३ टक्के होते. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते लक्षात घेता, आताची महिला सदस्यसंख्या निश्चितच फार कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कधी इकडे, कधी तिकडे! नितीश कुमार यांना ‘पलटूराम’ संबोधन मिळण्याची ‘ही’ आहेत कारणे

हळुवार बदल

पहिल्या निवडणुकीत २२ महिला खासदार निवडून आल्यानंतर हळूहळू लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व वाढत गेले. मात्र, ही वाढदेखील फार हळुवार होत गेली. १९५२ मध्ये महिला सदस्यांची लोकसभेतील टक्केवारी ही फक्त ४.४१ टक्के होती. त्यानंतर १० वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही सदस्यसंख्या सहा टक्क्यांनी वाढली. मात्र, १९७१ च्या निवडणुकीमध्ये त्यात पुन्हा घट झाली आणि ही सदस्यसंख्या चार टक्क्यांवर आली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या काळात भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. त्यानंतर पुन्हा लोकसभेतील महिला सदस्यसंख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा १० टक्क्यांहून अधिक महिला सदस्य निवडून आल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक म्हणजे १४.३६ टक्के महिला सदस्य संसदेत निवडल्या गेल्या. मात्र, तरीही इतर देशांशी तुलना करता, भारतीय संसदेतील महिला सदस्यांचे प्रमाण फारच कमी आहे. इतर देशांच्या संसदेतील महिला सदस्यांचे प्रमाण पाहिले असता, दक्षिण आफ्रिकेमध्ये ४६ टक्के, युनायटेड किंग्डममध्ये ३५ टक्के, तर अमेरिकेमध्ये २९ टक्के महिला सदस्य संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात.

पक्षनिहाय वर्गवारी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये १४ राजकीय पक्षांच्या महिला खासदार संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करतील. त्यामध्ये भाजपाच्या महिला सदस्यांची संख्या (३१) सर्वाधिक आहे. त्याखालोखाल काँग्रेस (१३), तृणमूल काँग्रेस (११), समाजवादी पार्टी (५), द्रविड मुनेत्र कळघम (३) आणि त्याखालोखाल लोक जनशक्ती पार्टी (२) व संयुक्त जनता दलाचा (२) क्रमांक लागतो. तसेच सात पक्षांच्या प्रत्येकी एकेक महिला खासदार संसदेत निवडल्या गेल्या आहेत. भाजपा, काँग्रेस व तृणमूल काँग्रेस या पक्षांची महिला सदस्यसंख्या दोन अंकी आहे. या पक्षांच्या एकूण निवडल्या गेलेल्या सदस्यांपैकी महिलांच्या सदस्यसंख्येचे प्रमाण काढले असता, तृणमूल काँग्रेसच्या ३७.९३ टक्के, काँग्रेसच्या १३.१३ टक्के, तर भाजपाच्या १२.९२ टक्के महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा का दिला? देशात सरकार कसे स्थापन होते?

नवे आणि तरुण चेहरे

निवडल्या गेलेल्या ७४ महिला खासदारांपैकी ४३ सदस्य पहिल्यांदाच संसदेत जाणार आहेत. त्यापैकी राजदच्या मिसा भारती या आधी राज्यसभेच्या सदस्य होत्या. यावेळी पहिल्यांदाच संसदेत येणाऱ्या एकूण सदस्यांच्या टक्केवारीपेक्षा (५२ टक्के) पहिल्यांदाच संसदेत येणाऱ्या महिलांची टक्केवारी (५९) अधिक आहे. संसदेतील सदस्यांच्या वयाची सरासरी काढली असता, ती ५६ वर्षे निघते. तर, एकूण महिला सदस्यांच्या वयाच्या सरासरी काढली असता, ती ५० वर्षे निघते. एकूण महिला सदस्यांपैकी ७८ टक्के महिलांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

महिला उमेदवारांचे प्रमाण

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ८,३६० उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये फक्त १० टक्के महिला उमेदवार होत्या. निवडणुकीच्या रिंगणात महिलांनी उतरण्याचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त तीन टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीतील महिला उमेदवारांच्या संख्येने १० टक्क्यांचा आकडा पार केला आहे. संपूर्ण देशभरातील भाजपाच्या एकूण उमेदवारांपैकी १६ टक्के महिला उमेदवार होत्या. त्याच निकषावर काँग्रेसच्या १३ टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha gender composition number of women representation in lok sabha 2024 vsh