लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत ५४३ मतदारसंघांपैकी १८९ मतदारसंघांत मतदान झाले आहे. सध्या तरी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामधील मतदारसंघांचे मिळून एकूण किती मतदान झाले आहे. याचे एकूण अद्ययावत आकडे निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे मतदानाच्या टक्केवारीवर हा नकारात्मक परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? याबाबत ‘द हिंदू’ वृत्तपत्राने काही आकडेवारींच्या आधारावर विश्लेषण केले आहे.
प्रत्येक मतदारसंघामध्ये किती मतदान झाले आहे, याचे आकडे निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून असे लक्षात येते की, २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही टप्प्यांमधील मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट झाली आहे, हे निश्चित. गेल्या निवडणुकीशी तुलना करता, दोन्ही टप्प्यांतील १८९ मतदारसंघांपैकी फक्त ३२ मतदारसंघांमधील मतदानाचे प्रमाण आहे तसेच राहिले आहे किंवा ते वाढले आहे. बाकी इतर सर्व मतदारसंघांमधील मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६० मतदारसंघांमधील मतदानामध्ये वाढ झाली होती; तर १२९ मतदारसंघांमधील मतदानाचा टक्का घसरला होता.
हेही वाचा : देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?
या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमधील मतदानाचा टक्का इतका मोठ्या प्रमाणावर घसरण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचाही प्रभाव आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उष्णतेच्या लाटेची दखल घेतली असून, त्यावर काही उपाय काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारत हा प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय देश आहे. गंगा नदीचे खोरे, मध्य, पश्चिम, पूर्व मैदाने आणि द्वीपकल्पीय प्रदेशांमध्ये या वर्षी तुलनेने अधिक उष्णता अनुभवायला मिळते आहे.
दिवसा अधिक उष्णता असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील बहुसंख्य मतदारसंघांवर झाला आहे का? याचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. याआधी उल्लेख केलेल्या प्रदेशांमध्ये एकूण १७२ मतदारसंघांचा समावेश होतो. २०१९ च्या तुलनेत यापैकी ११८ मतदारसंघांमध्ये यंदा तापमानात वाढ झाली आहे; तर ५४ मतदारसंघांतील तापमानामध्ये घट झाली आहे. २०१९ च्याच तुलनेत २०१४ मध्ये १४२ मतदारसंघांतील तापमानामध्ये वाढ झाल्याचे; तर ३० मतदारसंघांमधील तापमानामध्ये घट झाल्याचे निदर्शनास येते.
या मतदारसंघांमधील तापमानात वाढ झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असेल का, या प्रश्नाचे उत्तर खरे तर नाही, असे येते. वरील प्रदेशांचा विचार केल्यास, २०१९ च्या निवडणुकीमधील आकडेवारीची तुलना यंदाच्या निवडणुकीतील आकडेवारीशी करता, तापमान आणि मतदानाची टक्केवारी यांच्यामधील तफावत ही अत्यंत नगण्य (०.०१६) असल्याचे दिसून येते आहे. अगदी तसेच २०१९ च्या निवडणुकीशी २०१४ च्या आकडेवारीची तुलना करता, ती आकडेवारीही नगण्यच (-०.०४८) असल्याचे दिसून येते.
छत्तीसगड आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये उष्णता वाढूनही मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येतो आहे; तर राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काही ठिकाणी तापमान घटलेले असूनही मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. त्यामुळे याही आकडेवारीचा विचार केल्यास, तापमान वाढल्याने मतदानावर त्याचा परिणाम होतो आहे, असा काही निर्णायक सहसंबंध प्रस्थापित करता येत नाही. निमशहरी आणि शहरी भागातील मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का अगदी थोडा वाढला आहे अथवा कमी झाला आहे.
हेही वाचा :कोव्हिशिल्डच्या दुष्परिणामांची कंपनीने दिली कबुली; नेमके प्रकरण काय आहे?
त्यामुळे फक्त वाढत्या तापमानामुळेच लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडत नसावेत, असे म्हणणे पुरेसे नाही. मतदानाबाबत इतकी उदासीनता लोकांमध्ये का दिसून येते आहे, याची उत्तरे कदाचित मतदानोत्तर सर्वेक्षणातूनच मिळू शकतील. मात्र, यंदाच्या निवडणुकीशी तुलना करता, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का अधिक होता, हे मान्य करावे लागते. निवडणूक आयोगाने मतदानाबाबत केलेली जागृती आणि भाजपा पक्षाची त्या काळात वाढलेली लोकप्रियता याचा परिणाम म्हणूनही मतदानाचा हा टक्का वाढला होता.