अनिश पाटील

काहीच दिवसांपूर्वी मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल मिळाला होता. विविध आस्थापनांना धमकीचे मेल येणे मिळणे, स्फोटके ठेवल्याच्या अफवा हे तसे नित्याचेच असले तरी संग्रहालयांना आलेल्या धमकीच्या ई-मेलचे प्रकरण हे काहीसे वेगळे आणि गंभीर आहे. एका बारा वर्षांच्या मुलाच्या आयडीवरून हा ई-मेल पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा मुलगा कोण, तो या प्रकरणात कसा अडकला हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी आणि कोणत्या संग्रहालयांना धमकीचे ई-मेल आले होते

कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्राला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ई-मेल ५ जानेवारीला मिळाले होते. त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला काहीही संशयास्पद आढळले नाही. संग्रहालयांत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून त्याचे कधीही स्फोट होतील, असे ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालयांच्या अवतीभवती बॉम्बशोधक पथकासह बंदोबस्त तैनात केला होता. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे तपासात मुंबईसह कोलकाता व कर्नाटक येथील संग्रहालयांनाही धमकीचे ई-मेल आल्याचे लक्षात आले. ते सर्व एकाच आयडीवरून पाठवण्यात आले होते. त्यामुळे या शहरांमधील पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.

हेही वाचा >>> जेएए, बीएलएफ, बीएलए दहशतवादी संघटना इराण-पाकिस्तान वादाच्या केंद्रस्थानी, कारण काय? वाचा…

तपासात काय निष्पन्न झाले?

तपासादरम्यान एकूण आठ धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. देशातील सर्व प्रमुख संग्रहालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्यामुळे सर्वच यंत्रणा या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कार्यरत होत्या. मुंबईतही याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे स्थानिक कुलाबा पोलिसांसह गुन्हे शाखा, सायबर पोलीसही याप्रकरणी समांतर तपास करत होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता संबंधीत ई-मेल आसाममधील एका व्यक्तीने पाठवल्याचे समजले. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक तातडीने आसामला रवाना झाले. एका १२ वर्षाच्या मुलाने संबंधीत ई-मेल आयडी तयार केल्याचे समजले. त्यामुळे त्याला वडिलांसह मुंबईला बोलावून त्याचा जबाब नोंदवण्यात आला.

बारा वर्षांचा मुलगा या प्रकरणात कसा अडकला?

मुलाने संबंधित ई-मेल आयडी तयार केला होता. पण धमकीचे ई-मेल त्याने पाठवले नसल्याचे सांगितले. व्हिडिओ गेम खेळताना आरोपी या मुलाच्या संपर्कात आला होता. डिस्कॉर्ट या व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्लॅटफॉर्मवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपीच्या व्हिडिओ गेम खेळण्याच्या प्रतिभेमुळे १२ वर्षांचा मुलगा प्रभावित झाला होता. त्याने अनेक वेळा या मुलाला हरवले. पण ती व्यक्ती जाण्याच्या तयारीत असताना मुलाने त्या व्यक्तीला थांबून आणखी खेळण्याची विनंती केली. आणखी एकदा खेळण्याच्या बदल्यात आरोपीने मुलाला एक ई-मेल आयडी व पासवर्ड तयार करून पाठवण्यास सांगितला. त्याच्या सांगण्यावरून मुलाने त्याला ई-मेल आयडी व पासवर्ड तयार करून पाठवला. त्यावेळी या १२ वर्षाच्या मुलाला संशय कोणताही संशय आला नाही. पण त्याच ई-मेल अॅड्रेसवरून आरोपीने देशातील प्रमुख संग्रहालयांना धमकीचे ई-मेल पाठवले.

हेही वाचा >>> अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

गेमिंग प्लॅटफॉर्म अथवा संबंधित मेसेंजरच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते का?

फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारख्या प्रचलित समाज माध्यम असल्यामुळे अवैध कारवायांमध्ये सक्रिय व्यक्ती डार्क वेब अथवा कमी प्रचलित समाज माध्यमांवर अधिक सक्रिय असतात, असे जाणकारांचे मत आहे. विशेष करून करून विविध ऑनलाईन खेळांची संकेतस्थळे अथवा त्याच्याशी संबंधीत मेसेंजरवर अल्पवयीन मुलेही सक्रीय असल्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. यापूर्वीही दहशतवाद विरोधी पथकाच्या एका प्रकरणामध्ये तपासात संशयीत दहशतवादी अशाच गेमिंग प्लॅटफॉर्मवरून त्याच्या हस्तकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीवर कधीही विश्वास ठेऊ नये, त्याद्वारे आपली फसवणूक होऊ शकते. विशेष करून पालकांनी मुलांना असलेल्या अशा धोक्यांबाबत आधीच सतर्क करणे आवश्यक असल्याचे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्ते केले. संग्रहालयांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेल प्रकरणातही अल्पवयीन मुलाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून ई-मेल व आयडी मागण्यात आला होता. त्याच्या परिणाम काय होऊ शकतात, त्याचा अंदाज मुलाला नसल्यामुळे त्याने ई-मेल व आयडी तयार करून दिला. त्याचा गैरवापर करण्यात आला.

फसवणूक झाल्यास काय करता येईल?

समाज माध्यम अथवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर सायबर फसवणूक झाल्यात तात्काळ मुंबई सायबर पोलिसांच्या १९३० क्रमांकाची हेल्पलाईन दूरध्वनी करू शकता. याशिवाय स्थानिक पोलिसांकडेही तक्रार करता येऊ शकते. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवरही याप्रकरणी तक्रार करता येते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis 12 year old gamer send bomb threat email to mumbai museums print exp zws